ंमुख्य प्रवर्तकाला तुरुंगाचा रस्ता दाखविणाऱ्या सेबीने सहारा समूहातील फंड व्यवसायाचा व्यवसाय परवानाही रद्द केला आहे. सहारा म्युच्युअल फंडची नोंदणी रद्द करताना निधी व्यवस्थापन अन्य कंपनीकडे देण्याचे बजाविण्यात आले आहे. सहारा म्युच्युअल फंड व्यवसाय करण्यास पात्र नसल्याचा ठपका याबाबत ठेवण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांची २४,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम परस्पर अन्य योजनांमध्ये वळविल्याच्या प्रकरणात सहारा समूह अध्यक्ष सुब्रता रॉय हे २०१४ पासून तुरुंगात आहेत. त्यांच्या जामिनासाठी १०,००० कोटी रुपयांची रक्कम उभारण्यात अपयश आले असतानाच फंड र्निबधाद्वारे सेबीने समूहाविरुद्धची कारवाई कठोर केली.
सहारा समूहाच्या वित्त व्यवसायांतर्गत येणाऱ्या सहारा म्युच्युअल फंडाच्या नोंदणी प्रमाणपत्राची मुदत येत्या सहा महिन्यात संपुष्टात येणार असतानाच सेबीने फंड व्यवसायाचा परवानाच रद्द केला आहे. फंड व्यवसाय अन्य कंपन्यांकडे हस्तांतर करण्यासह सहारा म्युच्युअल फंड व सहारा अ‍ॅसेट मॅनेजमेन्ट कंपनीला तिच्या विद्यमान तसेच नव्या गुंतवणूकदारांकडून योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे.
सहारा इंडिया फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड ही सहाराची प्रायोजक तसेच सहारा अ‍ॅसेट मॅनेजमेन्ट कंपनीतील व्यवहार अन्य कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यासही बजाविण्यात आले आहे. फंडाच्या विश्वस्ताने योजनेतील गुंतवणूकदारांचे हित जपून मंडळाची पुनर्रचना करण्याच्या सूचना केल्या आहेत. पाच महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास गुंतवणूकदारांना योजनेतील युनिट देऊन निधी गुंतवणूकदारांच्या नावे जमा करण्यास सांगितले आहे. जून २०१५ अखेर सहाराच्या फंडातील मालमत्ता १३४ कोटी रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Sharara mutual fund license cancelled
First published on: 29-07-2015 at 06:56 IST