लक्ष्मीपूजनाला मुहूर्ताच्या सौद्यासाठी भांडवली बाजार सज्ज होत असतानाच मावळत्या संवत्सराची अखेर मात्र शेअर बाजारात सोमवारी घसरणीने झाली. ऑक्टोबरमधील वाढती व्यापारी तूट, महागाई आणि सप्टेंबरमधील कमी औद्योगिक उत्पादन या चिंतेने गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्याने ‘सेन्सेक्स’ १३ अंशांनी रोडावून १८,६७०.३४ पर्यंत खाली आला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’२.५५ अंश घसरणीसह ५,६८३.७० वर आला आहे. ‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी १९ समभाग आज घसरलेले राहिले. त्यामध्ये सर्वाधिक टाटा स्टीलचा समभाग १.९३ टक्क्यांनी खाली आला तर आयटीसी, रिलायन्स, एचडीएफसी बँक, स्टेट बँक, टीसीएस, भारती एअरटेल यांनीही घसरणीत भर टाकली. डिआजियोच्या यशस्वी व्यवहारामुळे युनायटेड स्पिरिटचा समभाग सोमवारी तब्बल ३४.९३ टक्क्यांनी उंचावला होता. आज तो एकदम १,८३४.६० वर जाऊन पोहचला.
नव्या संवत्सराला भांडवली बाजारात यंदा प्रथमच मोठय़ा कालावधीसाठी व्यवहार होणार आहेत. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सव्वा तास मुहूर्ताचे सौदे होणार आहेत. दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५ या वेळेत हे सौदे होतील. यासाठी मुंबई शेअर बाजाराच्या दलाल स्ट्रीटवरील इमारतीत जोरदार तयारी सोमवारी सुरू होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहासह इतर ब्रोकरांची दालनेही सजविण्यात आली आहेत. मंगळवारी मुहूर्ताचे सौदै झाल्यानंतर बुधवारी भांडवली बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत.