दी इन्स्टिटय़ुट ऑफ कम्प्युटर अकाउट्स’ अर्थात आयसीएने २०१३ साठी करिअर शिष्यवृत्ती जाहिर केली आहे. संस्थेच्या पश्चिम आणि उत्तर केंद्रातून ती उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी संस्था ३१ ऑक्टोबपर्यंत संस्थेच्या ३०० केंद्रातून शिष्यवृत्ती परिक्षा घेणार आहे. संगणकीकृत अकाउंट, फायनान्स, बँकिंग आणि टॅक्सेशन विषयातील कौशल्याधारित प्रशिक्षण देणारी आयसीए ही संस्था आहे. लेखी परिक्षा आणि बारावीच्या गुणांवर आयसीए देशभरातील ४० हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देणार आहे. संस्था या क्षेत्रात रोजगाराभुमिख व्यक्ती बनविण्यासाठी ही शिष्यवृत्ती देऊ करते, असे आयसीएचे अध्यक्ष एन. के. श्यामसुखा यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी ९८३०९२९२९२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीएमसी बँकेची ‘आधार’समर्थित रेमिटन्स सेवा
मुंबई : अनोख्या आधार क्रमांकावर ‘मोबाईल रेमिटन्स सुविधा’ सुरू करण्याचा देशातील पहिला मान पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेने पटकावला आहे. खातेदाराला या सुविधेअंतर्गत मोबाईलद्वारे अन्य कुणाही व्यक्तीला केवळ तिचा आधार क्रमांक नोंद करून पैसे पाठवू शकेल. इतकेच नाही टॅक्सी भाडे व अन्य छोटी-मोठी खरेदी व पैशांचा विनिमयही मोबाईलवरील लघुसंदेश (एसएमएस) द्वारे करता येईल. अलीकडेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनद्वारे आयोजित समारंभात पीएमसी बँकेचा या अभिनव सुविधेसाठी ‘सीसीएफएस’चे अध्यक्ष नचिकेत मोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यूआयईडीएआयचे अध्यक्ष नंदन निलेकणीही उपस्थित होते.
सिंडिकेट बँकेकडून गृह-वाहन कर्जावर पाऊण टक्क्यांपर्यंत कपात
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने स्थापना दिनाचे तसेच येत्या सणासुदीच्या दिवसांचे निमित्त साधून गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी कर्जावरील व्याजदरात घसघशीत कपात केली आहे. बँकेने कितीही रकमेचे घरासाठीचे कर्ज हे नव्या तसेच विद्यमान ग्राहकांना १०.२५ टक्के या किमान आधार दरावर देऊ केले आहे, तर बँकेच्या गृह कर्जदारांना दुचाकी वाहनासाठी कर्ज हे १२.२५ टक्क्यांवरून ११.५० टक्क्यांवर, तर अन्य ग्राहकांना १२ टक्के दराने दिले जाईल. बँकेच्या गृह कर्जदारांना चार चाकी वाहनांसाठीच्या कर्जाच्या व्याजदरातही १०.९० टक्क्यांवरून १०.४० टक्के अशी कपात केली गेली आहे. अन्य ग्राहकांसाठी हा दर १०.७५ टक्क्यांवर आणला गेला आहे. याच पद्धतीने ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी कर्जाचा व्याजदर १५ टक्क्यांवरून ११.७५ टक्के  (बँकेच्या गृह कर्जदारांसाठी) आणि १२.७५ टक्के असा सुधारण्यात आला आहे. वाणिज्य वाहनांसाठी कर्जाचा व्याजदर १२.७५ टक्क्यांवरून ११.५० टक्के करण्यात आला आहे.