‘सिगाची’ अडीच पट लाभासह सूचिबद्ध ; ‘पॉलिसीबझार’कडून २३ टक्के अधिमूल्य, एसजेएसकडून निराशा

दिवसअखेर हा समभाग २२.६८ टक्के अधिमूल्यासह १,२०२.३० रुपये पातळीवर स्थिरावला.

मुंबई : औषध निर्मितीसह अन्य औद्योगिक वापरासाठी उपयुक्त महत्त्वाचा घटक असलेल्या मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोजच्या (एमसीसी) उत्पादनांतील प्रमुख कंपनी सिगाची इंडस्ट्रीजच्या समभागांनी सोमवारी भांडवली बाजारात दमदार पर्दापण केले. आठवडय़ापूर्वी पार पडलेल्या कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागी होऊन यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना या समभागाने सूचिबद्धतेलाच अडीच पटीहून अधिक परतावा दाखविला आहे.

सोमवारी सिगाचीच्या समभागाने मुंबई शेअर बाजारात ५७५ रुपयाच्या पातळीवरून व्यवहारास सुरुवात केली. प्रति समभाग १६३ रुपये किमतीला प्रारंभिक भागविक्रीतून हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला असून, त्याने बाजारात पहिले पाऊलच २५२.७६ टक्के अधिमूल्यासह टाकले. दिवसभरातील व्यवहारात या समभागाने ६०३.७५ रुपयांचा किमतीतील उच्चांकही  गाठला. दिवसअखेर तो प्रति समभाग ४३५.५० रुपयांच्या लाभासह ५९८.५० रुपये पातळीवर स्थिरावला.

दुसरीकडे विम्याच्या ऑनलाइन विक्रीचे व्यासपीठ असलेल्या पॉलिसीबझार आणि पतपुरवठय़ाचे तौलनिक मंच पैसाबझारची प्रवर्तक पीबी फिनटेक लिमिटेडच्या समभागाने सोमवारी भांडवली बाजारात १,१५० रुपयांच्या पातळीवरून केली. म्हणजेच प्रारंभिक भागविक्रीत प्रत्येकी ९८० रुपये किमतीला गुंतवणूकदारांनी मिळविलेल्या या समभागाने सूचिबद्धतेला १७.३४ टक्के अधिमूल्य मिळविले. दिवसअखेर हा समभाग २२.६८ टक्के अधिमूल्यासह १,२०२.३० रुपये पातळीवर स्थिरावला.

भांडवली बाजारात सोमवारी सूचिबद्ध झालेला तिसरा समभाग एसजेएस एंटरप्राइजेसने मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. महिन्याच्या प्रारंभी जेमतेम भरणा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेल्या या कंपनीच्या समभागाने ५४२ रुपयांच्या विक्री किमतीच्या तुलनेत सूचिबद्धतेला ५०८.७५ रुपये पातळीवरून म्हणजे ६.१३ टक्के घसरणीसह सुरुवात केली. पुढे ही घसरण वाढून समभागाचा भाव ५०५.६० रुपयांपर्यंत खाली आला.

सेन्सेक्स-निफ्टीत माफक वाढ

मुंबई : जगभरातील भांडवली बाजार व्यवहारांचे सकारात्मक संकेतांमुळे प्रारंभी मोठय़ा फरकाने मुसंडी मारणाऱ्या स्थानिक बाजारातील प्रमुख निर्देशांक दिवसअखेर मात्र शुक्रवारच्या तुलनेने माफक वाढीसह बंद झाले. घाऊक महागाई निर्देशांकाच्या चिंताजनक दोन अंकी स्तराने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने, ‘सेन्सेक्स’ ३२.०२ अंशांची भर घालत दिवसअखेरीस ६०,७१८.७१ पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी निर्देशांक अवघ्या ६.७० अंशांच्या कमाईसह १८,१०९.४५ या पातळीवर बंद झाला. मिडकॅप निर्देशांक तुलनेने सरस ०.४१ टक्के वाढीसह बंद झाला, त्या उलट अधिक व्यापक सहभाग असलेला स्मॉलकॅप निर्देशांकात ०.१९ टक्क्य़ांची नाममात्र घसरण दिसून आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sigachi industries makes bumper market debut zws

Next Story
सुबीर गोकर्ण यांच्या वारसदाराचा शोध सुरू व्यापार
ताज्या बातम्या