गेल्या महिनाभरापासून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्वस्त हवाई प्रवास मोहिमेत स्पाइसजेटने काहीशी उशिरा उडी घेत बार उडवून दिला आहे. व्यवसाय रुळावर आणण्यासाठी निधी उभारणीच्या प्रक्रियेत गुंतलेल्या या कंपनीनेही अखेर या प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.
अन्य कंपन्यांच्या पावलावर पाऊल टाकत या कंपनीने सवलतीच्या दरात विमान प्रवासासाठीची तिकीट नोंदणी बुधवारपासून सुरू केली. अवघ्या १,४९९ रुपयांपासून पाच लाख तिकिटे उपलब्ध केली आहेत.
या मोहिमेंतर्गत बुधवारपासून तीन दिवसांसाठी कंपनीच्या हवाई प्रवासासाठीची नोंदणी सुरू झाली असून प्रवाशांना १५ फेब्रुवारी ते ३० जून दरम्यानच प्रवास करता येणार आहे.
गेल्याच आठवडय़ात एअर एशियाने सवलतीच्या दरात आठवडय़ासाठी तिकीट नोंदणी प्रक्रिया राबविली, तर जेट एअरवेज, गो एअरनेही सवलतीच्या दरात विमान प्रवास यापूर्वीच उपलब्ध करून दिला आहे. यंदाच्या हंगामात कमी दरातील विमान प्रवास क्षेत्रातील दरयुद्ध सरकारी मालकीच्या एअर इंडियाने छेडले.
भारतात हवाई प्रवासासाठी जानेवारी ते मार्च तसेच जुलै ते सप्टेंबर हा कालावधी कमी गर्दीचा, कमी मागणीचा म्हणून गणला जातो. म्हणूनच विमानांच्या फेऱ्यांदरम्यानची आसनक्षमता पूर्ण करण्यासाठी कमी दरातील तिकीट उपलब्धततेच्या मार्गाचा कंपन्यांकडून अवलंब झाला आहे.
सवलतीतील हा विमान प्रवास रेल्वे अथवा रस्ते मार्गापेक्षाही स्वस्त असल्याचा दावा यानिमित्ताने स्पाइसजेटचे मुख्य वाणिज्यिक अधिकारी कनेश्वरन अविली यांनी केला. या द्वारे आकर्षक दरांमध्ये विमान प्रवासासाठी आगाऊ नोंदणी करण्याची संधी आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicejet back with discount sale
First published on: 29-01-2015 at 01:25 IST