मुंबई : ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे जगातील प्रमुख भांडवली बाजारांमध्ये नकारात्मक कल असतानाही, स्थानिक भांडवली बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा जोर कायम दिसून आला. उत्साहदायी अर्थ-आकडेवारीच्या परिणामी गुंतवणूकदारांचा मूडही पालटला असून, गुरुवारी त्या परिणामी प्रमुख निर्देशांकांनी एक टक्कय़ांहून अधिक उसळी घेतली. दोन दिवसांतील सकारात्मकतेने गुंतवणूकदारांच्या मत्तेत ५.४७ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

सेन्सेक्समध्ये एचडीएफसीचा समभाग ३.९२ टक्कय़ांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ पॉवर ग्रिड, सन फार्मा, टाटा स्टील, टेक महिंद्र, एचसीएल टेक आणि बजाज ऑटोचे समभाग सर्वाधिक वधारले. एकंदर मूल्यात्मक समभाग खरेदीचा परिणाम म्हणून दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७७६.५० अंशांनी वधारून ५८,४६१.२९ पातळीवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २३४.७५ अंशांची वाढ झाली. दिवसाचे व्यवहार थंडावले तेव्हा हा निर्देशांक १७,४०१.६५ पातळीवर स्थिरावला.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेताकडे दुर्लक्ष करत, देशांतर्गत पातळीवर वस्तू आणि सेवा कराचे वाढलेले संकलन आणि ‘जीडीपी’च्या समाधानकारक आकडेवारीमुळे गुंतवणूकदारांनी बाजारात आशेने खरेदी सुरू केली आहे. मुख्यत: माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि धातू कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरकस मागणी नोंदविली आहे.

याच्या नेमके उलट वातावरण जगात अन्यत्र आहे. अमेरिकेत ‘फेड’कडून नजीकच्या कालावधीत रोखे खरेदी कार्यक्रम गुंडाळण्यासह व्याजदर वाढीबाबत निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या चिंतेमुळे जागतिक पातळीवर समभाग विक्रीला चालना दिली आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत वाढ

गुरुवारच्या सत्रात भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल ३.२८ लाख कोटींनी वाढून २६२.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या मत्तेत २.१९ लाख कोटींची भर पडली होती. ‘सेन्सेक्स’ने मागील दोन सत्रात जवळपास १,४०० अंशांची कमाई केल्याने गुंतवणूकदारांच्या मत्तेत एकूण ५.४७ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.