सलग सात सत्रांतील घसरणीला अखेर खंड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जागतिक स्तरावर करोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असताना जीवघेण्या संकट तडाख्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी उपाय योजण्याच्या भारतातील रिझव्‍‌र्ह बँकेच्या संकेताने भांडवली बाजारांनी मंगळवारी उभारी घेतली.

गुंतवणूकदारांनी सत्राच्या सुरुवातीपासूनच समभाग खरेदीचा सपाटा लावल्याने सेन्सेक्ससह निफ्टीतील गेल्या सलग सात व्यवहारांतील घसरणही थांबली. व्यवहारअखेर दोन्ही प्रमुख निर्देशांक सप्ताहारंभाच्या तुलनेत सवा टक्क्याहून अधिक वाढले.

मुंबई निर्देशांकातील एकाच व्यवहारातील ४७९.६८ अंशवाढीने सेन्सेक्सला सत्रअखेर ३८,५०० च्या पुढे मजल मारताना ३८,६२३.७० पर्यंत पोहोचता आले, तर १७०.५५ अंशवाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११,३०३.३० वर स्थिरावला.

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकातील ३० पैकी आयटीसी व एचडीएफसी बँक हे केवळ दोनच समभाग घसरणीच्या यादीत राहिले. याउलट टाटा स्टील, ओएनजीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी, पॉवरग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक, एचसीएल टेक आदी वाढले. औषधनिर्माण क्षेत्रातील सन फार्माचे मूल्य सर्वाधिक, ६.६४ टक्क्यांनी झेपावले.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये सर्व, १९ निर्देशांक वाढले. त्यातही पोलाद निर्देशांक ५.६७ टक्क्यांपर्यंत वाढले. यातील टाटा स्टील, वेदांताच्या मूल्यवाढीचा हा परिणाम होता. बहुपयोगी वस्तू, आरोग्य निगा, तेल व वायू, ऊर्जा, वाहन, स्थावर मालमत्ता आदी निर्देशांक जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

रुपयाची सलग दुसरी, ४७ पैशांनी आपटी

मंगळवारी भांडवली बाजार सावरला असला तरी स्थानिक चलन म्हणजे रुपयातील डॉलरच्या तुलनेत मूल्य घसरण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. परकीय चलन विनिमय मंचावर रुपया मंगळवारी थेट ४७ पैशांनी खाली येत ७३ च्या तळात विसावला. दिवसअखेर तो ७३.२३ या टप्प्यावर स्थिरावला. रुपया सप्ताहारंभी ७२ च्या खाली बंद झाला होता. त्याचा मंगळवारचा ७२.५० पासून सुरू झालेला प्रवास सत्रात ७३.३४ पर्यंत खाली आला होता. व्यवहारअखेर तो प्रति डॉलर ७३ पुढेच बंद झाला.  गेल्या सलग तीन व्यवहारांत रुपयाचे मूल्य १६० पैशांनी रोडावले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunsex niefty index resrve bank of india share market akp
First published on: 04-03-2020 at 00:53 IST