मुंबईस्थित आघाडीची निधी हस्तांतरण व देयक भरणा सुविधा असलेल्या सुविधा इन्फोसव्‍‌र्हने पॉइंट ऑफ सेल (पीओएस) उपकरणांच्या निर्मितीतील संपूर्ण स्वदेशी नवउद्यमी कंपनी ‘आसानपे’वर ताबा मिळविल्याची घोषणा केली. आसानपेच्या तंत्रज्ञानाने सध्याच्या प्रचलित असलेल्या पारंपरिक पीओएस मशिन्सऐवजी स्मार्ट फोनद्वारे कार्डद्वारे विनिमयाचे व्यवहार पार पाडता येतील. या अधिग्रहणामागील आर्थिक बाबी मात्र उभयतांकडून स्पष्ट करण्यात आल्या नाहीत.
अभियांत्रिकीचे शिक्षण परिस्थितीमुळे अर्धवट सोडावे लागलेल्या साईनाथ गुप्ता, पृथ्वी सब्बू आणि शशांक साहनी या तरुणांनी २०११ मध्ये आसानपे या तंत्रज्ञान कंपनीची पायाभरणी केली. दुकान, उपाहारगृहे या ठिकाणी असणाऱ्या क्रेडिट व डेबिट कार्डाद्वारे विनिमय व्यवहार पूर्ण करण्यासाठी असणाऱ्या पीओएस उपकरणांना अधिक सोयीस्कर व प्रगत पर्याय आसानपेने निर्माण केला आहे.
देशभरात ८०,००० केंद्रांतून विविध देयकांचा भरणा ते निधी हस्तांतरणाचे व्यवहार पार पाडणाऱ्या सुविधासाठी आसानपेकडून विकसित हे नवीन तंत्रज्ञान सोयीस्कर तसेच खर्चाच्या दृष्टीने किफायतशीरही ठरणार आहे. सुविधाकडून सध्या वर्षांला तब्बल ८० अब्ज रुपयांच्या निधीची उलाढाल केली जात असते.
विशेषत: भारत सरकारकडून जनधन योजनेंतर्गत वितरित १५ कोटी कार्डाद्वारे विनिमय व्यवहारांसाठी आसानपेच्या तंत्रज्ञानाचा वापर खूपच उपयुक्त ठरेल, असा विश्वास सुविधाचे संस्थापक परेश राजदे यांनी व्यक्त केला. सरकारचा भर हा अधिकाधिक रोखरहित व्यवहारांना चालना देणारा असून, ग्रामीण भागात अगदी छोटय़ा विक्रेत्या-दुकानदाराला कार्डाद्वारे व्यवहार करणे यातून शक्य बनेल, असे त्यांनी सांगितले. सुविधामार्फत सध्या दरमहा १५ कोटी रुपयांचे कार्डाद्वारे व्यवहार पार पाडले जातात, त्याचे प्रमाण यातून लवकरच ५०० कोटी रुपयांपर्यंत वधारतील, असे त्यांनी सांगितले.
भारतात सध्याच्या घडीला ६५ कोटींच्या घरात डेबिट-क्रेडिट कार्डे वापरात आहेत, त्या तुलनेत केवळ २ लाखांच्या घरात एटीएम आणि १० लाख पीओएस आस्थापने आहेत. या समस्येच्या समाधानात आसानपेच्या तंत्रज्ञानाने अत्यंत किफायतशीर व सहज स्वीकारला जाणारा समर्थ पर्याय दिला आहे. नवीन पेमेंट बँक परवानाधारकांसाठीही हे तंत्रज्ञान जलद विस्तारासाठी उपयुक्त ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvidhaa infoserve
First published on: 16-09-2015 at 06:41 IST