धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. मात्र देशातील आघाडीची वाहन निर्मात्या मारुती सुझुकीने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी वाहनांची विक्री केली, तर टाटा मोटर्सने मंगळवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ९४ टक्के अधिक वाहनांची विक्री केली.

जगभर वाहन निर्मिती क्षेत्रात निर्माण झालेल्या सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे मारुती सुझुकीने गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी म्हणजे देशभरात एकूण १३,००० वाहनांची विक्री मंगळवारी झाल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते. प्रत्यक्षात बाजारात मागणी असूनदेखील एसयूव्ही, कॉम्पॅक्ट- एसयूव्ही आणि लक्झरी श्रेणीतील वाहनांची मोठी कमतरता निर्माण झाली, असे मत फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनने (फाडा) अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी व्यक्त केले. सेमीकंडक्टर चिपच्या तुटवड्यामुळे कंपन्यांकडून मिळणाºया प्रवासी वाहनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.