रुपयाला सावरण्यासाठी कर-उपाय; सोने आयात कर वाढून १५ टक्क्यांवर

केंद्र सरकारने शुक्रवारी सोन्यावरील मूळ सीमा शुल्क ७.५ टक्के आकारण्यात येत होते.

as gold
संग्रहित छायाचित्र

पीटीआय, नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुक्रवारी सोन्यावरील मूळ सीमा शुल्क ७.५ टक्के आकारण्यात येत होते. ते आता वाढवून १२.५  टक्के करण्यात आले आहे. याचबरोबर २.५ टक्के कृषी पायाभूत विकास उपकर (एआयडीसी) लागू करण्यात आल्यामुळे सोन्यावरील एकूण आयात कर १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयांची नीचांकी लोळण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

 केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात थेट ५ टक्क्यांनी वाढ केल्याने नजीकच्या काळात सोन्याची किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत हा जगातील दुसरा मोठा सोन्याचा आयातदार असून खनिज तेलानंतर देशाच्या आयात खर्चात सोन्याचा मोठा वाटा आहे. यामुळे सोने आयातीवर खर्ची  पडणारी परकीय गंगाजळीची बचत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू वर्षांत मे महिन्यात १०७ टन सोन्याची आयात करण्यात आली होती. तर जूनमध्येदेखील हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोने हजार रुपयांनी महागले

केंद्राने सोन्यावर आयात कर वाढवल्याने त्याने प्रति दहा ग्रॅममागे १,०८८ रुपयांची उसळी घेत नवी दिल्लीत ५१,४५८ रुपयांची पातळी गाठली. गुरुवारी सोने ५०,३७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले होते. तर चांदीच्या भावात मात्र किलो मागे ४११ रुपयांनी घसरण होत तिचा दर ५८,१५९ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला.

सोने आयातीवर कर का?

भारतीयांचे सोन्यावरील प्रेम जगजाहीर असून दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने भारतीय खरेदी करतात. यामुळे सोने आयातीवर मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन खर्च होत असते. वस्तूंवरील आयात कर वाढवणे हा आयातीला आळा घालण्याचा एक मार्ग आहे. यामुळे आयात करण्यात येणारी वस्तू अधिक महाग होत असल्याने त्याची मागणी कमी होण्यास मदत होते. सरलेल्या मे महिन्यात देशाची व्यापार तूट २४.२९ अब्ज डॉलरच्या उच्चांकी पोहोचली आहे. भारताने मे महिन्यात ६.०३ अब्ज किमतीचे सोने आयात केले, जे गेल्या वर्षांच्या तुलनेत नऊ पटीने अधिक आहे.

प्रत्यक्षात सोन्याची तस्करी कमी करण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क ७.५ टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणण्याची विनंती चालू वर्षांच्या सुरुवातीला सराफांच्या संघटनांनी केली होती. चीन, अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांनी देशांतर्गत बाजारपेठ मजबूत करण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे.

तेल कंपन्यांचे समभाग घसरले

‘विंडफॉल टॅक्स’च्या घोषणेमुळे भांडवली बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, मंगळूर रिफायनरी, ऑइल इंडिया आणि चेन्नई पेट्रोलियम कंपन्यांच्या समभागात घसरण झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ७.१४ टक्के घसरणीसह २४०८.९५ रुपयांवर बंद झाला. त्यापाठोपाठ ओएनजीसीचा समभाग १३.५३ टक्के १३१.०५ रुपयांवर, ऑइल इंडियाचा समभाग १५ टक्के घसरून २१३.९५ रुपयांवर, तर चेन्नई पेट्रोलियमचा समभाग ५.२३ टक्के घसरणीसह २९७.२० रुपयांवर स्थिरावला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tax measures recover rupee gold import tax hiked limit charges ysh

Next Story
जीएसटी संकलन जूनमध्ये १.४५ लाख कोटींवर; गेल्या वर्षांच्या तुलनेत ५६ टक्क्यांची वाढ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी