सेन्सेक्स ऐतिहासिक ५५ हजारांवर; निफ्टी १६,५०० पुढे

मुंबई : अर्थव्यवस्था करोनाच्या विळख्यातून सुटत असल्याचे आणि जोमदार वाढीच्या आशा जागविणाऱ्या पुढे आलेल्या आकडेवारीचा भांडवली बाजारावर शुक्रवारी चांगलाच सुपरिणाम दिसून आला. गेल्या  काही दिवसातील निरंतर सकारात्मकतेला गुंतवणूकदारांच्या उत्साही खरेदीने आणखीच बळ दिल्याने, सेन्सेक्सने ऐतिहासिक ५० हजारांपुढे तर निफ्टी या अन्य प्रमुख निर्देशांकानेही १६,५०० या पातळीपुढे पहिल्यांदाच मजल मारली.

दोन्ही निर्देशांकांमध्ये वजनदार स्थान असलेल्या टीसीएस, रिलायन्स, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड या आघाडीच्या समभागांतील मूल्य वाढीचे शुक्रवारच्या बाजाराच्या मुसंडीत ठसठशीत योगदान राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ५९३.३१ अंशांची नव्याने भर घालून ५५,४३७.२९ अशी अभूतपूर्व पातळी त्यामुळेच शुक्रवारअखेर नोंदवू शकला. बरोबरीने १६४.७० अंशांच्या कमाईसह निफ्टी निर्देशांक १६,५२९.१० या पातळीवर दिवसअखेर विसावला. दोन्ही निर्देशांक त्यांच्या दिवसांतील उच्चांक स्तरावरच बंद झाले आणि त्यांनी एक टक्क्य़ांहून मोठी वाढ साधली.

गुरुवारी बाजारातील व्यवहार आटोपल्यावर, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर ५.५९ टक्क्य़ांवर नरमल्याची आकडेवारी जाहीर केली. आधीच्या महिन्यात हा महागाई दर चिंताजनक ६.२६ टक्क्य़ांपर्यंत कडाडला होता. बरोबरीने जून महिन्यातील औद्योगिक उत्पादन निर्देशांकही १३.६ टक्क्य़ांच्या वाढीसह सकारात्मक नोंदला गेला. अर्थचक्र पुन्हा गती पकडू लागल्याचे निर्देश म्हणजे निर्मिती क्षेत्र, वीजनिर्मिती आणि खाणकाम क्षेत्राची कामगिरी लक्षणीय सुधारल्याचे या आकडेवारीने दाखवून दिले. शुक्रवारचा बाजारातील द्विगुणित झालेला उत्साह या आकडेवारीचाच परिणाम होता, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रावर आढावा घ्यायचा झाल्यास, बीएसई टेलीकॉम, टेक, कॅपिटल गुड्स, आयटी, एनर्जी आणि ग्राहकोपयोगी वस्तू हे निर्देशांक १.८० टक्क्य़ांपर्यंत वधारताना दिसून आले. स्थावर मालमत्ता, आरोग्यनिगा आणि औषधी उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारे निर्देशांक मात्र घसरणीत राहिले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप या व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकातही फार मोठी नसली तरी घसरण दिसून आली. याचा अर्थ बाजारात खरेदीचा भर हा काही निवडक समभागांवरच केंद्रित होता.

भांडवली बाजारात खरेदीचा बहर राहिल्याने, आंतरबँक चलन बाजारात प्रारंभिक व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गळपटलेल्या रुपयानेही बळ मिळविले आणि दिवस संपत असताना प्रति डॉलर ७४.२४ या गुरुवारच्या स्तरावरच रुपयाचे मूल्य स्थिरावले.

उत्साही उधाण कशामुळे ?

अर्थचक्र पुन्हा गती पकडू लागल्याचे निर्देश म्हणजे निर्मिती क्षेत्र, वीजनिर्मिती आणि खाणकाम क्षेत्राची कामगिरी लक्षणीय सुधारल्याचे या गुरुवारच्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीने दाखवून दिले. शिवाय जुलै महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर ५.५९ टक्क्य़ांवर नरमल्याचा दिलासा बाजारासाठी उत्साहदायी ठरला. आधीच्या महिन्यात हा महागाई दर चिंताजनक ६.२६ टक्क्य़ांपर्यंत कडाडला होता.