रग्गड नफा कमावणाऱ्या कंपन्यांचा गुंतवणूक व ग्राहकसेवेत सुधारास मात्र नन्नाचा पाढा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या चार-पाच खासगी कंपन्यांनी दुष्ट हेतूने कंपू बनवून आपल्या अब्जावधी ग्राहकांची प्रतारणा चालवली आहे. दिवसाला २५० कोटी रुपयांची या कंपन्या कमाई करतात, पण सेवेत सुधारणेसाठी गुंतवणूक मात्र त्या करीत नाहीत, असा गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून दावा करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात कॉल ड्रॉप प्रकरणी सुनावणीत दूरसंचार नियामक ‘ट्राय’ची बाजू मांडणारे अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी दूरसंचार कंपन्यांच्या कंपूबाजीवर प्रहार केला. कॉल ड्रॉप प्रकरणी या कंपन्यांवर लादलेल्या दंडांत्मक कारवाईही योग्य असल्याचे सांगताना, अत्यंत वेगाने भरभराट सुरू असलेल्या या कंपन्यांना सेवा गुणवत्तेत सुधारणा करावीशी वाटत नाही, त्यासाठी पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी नाही, असे त्यांनी सांगितले.
न्यायमूर्ती कुरियन जोसेफ आणि आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठापुढे सुरू असलेल्या सुनावणीत, वार्षिक एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या कंपन्यांसाठी सेवा कुचराईसाठी २७० ते २८० कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम खूप नाही, असा युक्तिवादही रोहतगी यांनी केला.
वर्ष २००९ ते २०१५ या काळात दूरसंचार कंपन्यांच्या ग्राहकवर्गात ६१ टक्के दराने वाढ सुरू आहे, पण कंपन्यांनी उपलब्ध ध्वनीलहरींचा वापर हा संभाषण सुविधेत सुधारणेऐवजी अधिक लाभ देणाऱ्या मोबाईल डेटा सेवांसाठी केल्याचे रोहतगी म्हणाले. कॉल ड्रॉपच्या समस्येसाठी ध्वनीलहरींच्या (स्पेक्ट्रम) तुटवडय़ाचे कारण दूरसंचार कंपन्या एकीकडे देतात, तर नुकत्याच झालेल्या लिलावात ७०० मेगाहर्ट्झ ध्वनीलहरी धारेसाठी कोणी बोलीच लावली नसल्याचे आढळून आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे जर तुमच्याकडे पुरेसे स्पेक्ट्रम नसेल, तर ग्राहकसंख्येचा विस्तारावर एक तर तुम्ही मर्यादा घालायला हवी अथवा तंत्रज्ञानावर गुंतवणूक तरी वाढविली पाहिजे. पण असे कोणीच करताना दिसत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
गत पाच वर्षांत भारतात दूरसंचार कंपन्यांनी पाच अब्ज रुपयांची गुंतवणूक केली तर याच काळात चीनमध्ये झालेल्या गुंतवणुकीचे प्रमाण ५० अब्ज रुपयांचे आहे, याकडे रोहतगी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. कुठे व किती गुंतवणूक करावी हे ‘ट्राय’ने दूरसंचार कंपन्यांना सांगणे हे त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण ठरेल. परंतु ग्राहकहित पाहता तशीही वेळ आली असल्याचे त्यांनी सूचित केले. पुरेसे मोबाईल मनोरे टाकण्याला वाव नसल्याचा दूरसंचार कंपन्यांचा युक्तिवाद खोडून काढताना, रोहतगी यांनी न्यूयॉर्क आणि आइसलँडमध्ये एकही मोबाईल मनोरा नसताना दर्जेदार मोबाईल सेवा आहे, कारण तेथे तंत्रज्ञानात गुंतवणूक केली गेली आहे, असा प्रतिवाद केला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trai attacks telecom firms for call drops
First published on: 23-04-2016 at 03:34 IST