औषधनिर्मिती सुविधेवरून वॉखार्टला पुन्हा एकदा दणका बसला आहे. कंपनीच्या दमणमधील प्रकल्पातून दर्जाविषयक मानदंडांना बगल देऊन औषध उत्पादन घेतल्याचा ठपका ब्रिटनने ठेवला आहे.
ब्रिटनच्या औषधे आणि आरोग्य निगा उत्पादन नियामक संस्थेने कंपनीचे औषध निर्मितीबाबतचे प्रमाणपत्र माघारी घेतल्याचे कंपनीनेच मंगळवारी मुंबई शेअर बाजाराला कळविले. कंपनीच्या नानी दमण येथील कडाईया या प्रकल्पात निर्मित होणाऱ्या औषधाबद्दल हा बडगा उगारण्यात आला आहे.
ब्रिटनमार्फत कंपनीवर होणारी ही तिसरी कारवाई आहे. गेल्याच आठवडय़ात कंपनीच्या महाराष्ट्रातील प्रकल्पाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. यानुसार औरंगाबादनजीकच्या चिखलठाणा प्रकल्पाचे निर्मिती प्रमाणपत्र मागे घेण्यात आले होते. तर याच भागातील वाळुज येथील प्रकल्पाला जुलैमध्ये आयातीबाबत सावध करण्यात आले होते. कंपनी या प्रकल्पातून निर्यातीसाठीची विविध १६ औषधे तयार करते. नानी दमण प्रकल्पातून मात्र कंपनी अमेरिकेसाठी कोणतेही निर्यात उत्पादन घेत नाही.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही मेमध्ये कंपनीला औषध गुणवत्तेवरून आयातीविषयी सावध केले होते. मध्यंतरी रॅनबॅक्सीलाही अमेरिकेच्या औषध नियामक यंत्रणेचा फटका बसला होता. विकसित देशांमार्फत भारतीय औषध निर्मिती कंपन्यांवर गुणवत्तेचा दंडक वापरून कारवाईच्या गेल्या काही महिन्यांपासून अनेक घटना पुढे आल्या आहेत.
भारतीय औषध निर्मिती कंपन्यांवर उचलल्या जाणाऱ्या कारवाईच्या बडग्याचा मोठा परिणाम होणार नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात तुमची आम्हाला गरज नाही, असे विकसित देशांकडून म्हटले जाण्याची शक्यता तशी कमीच. अमेरिकादेखील भारत, चीन, जपानसारख्या देशांवर औषध निर्मितीसाठी मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही. गुणवत्तेबाबत चुका होत असतील त्या नक्कीच दुरुस्त केल्या जातील.
प्रवीण हेर्लेकर,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ओंकार स्पेशालिटी केमिकल्स