नवी दिल्ली : वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) आता नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय)’च्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंतची बोली लावता येणार आहे, असे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने मंगळवारी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैयक्तिक गुंतवणूकदारांना दलाली मंच, डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी), भागविक्रीचे निबंधक, समभाग हस्तांतरण एजंट यांच्याकडे समभाग विक्रीसाठी अर्ज करताना बोलीसह पैशांचा भरणा करण्याचा पर्याय म्हणून ‘यूपीआय आयडी’ सादर करता येतो. तथापि या माध्यमातून गुंतवणुकीची कमाल मर्यादा सध्याच्या दोन लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. येत्या १ मेपासून आणि त्यानंतर बाजारात येणाऱ्या आयपीओसाठी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील, असे सेबीने त्यांच्या परिपत्रकात म्हटले आहे.

सध्या ‘यूपीआय’मार्फत व्यक्तिगत ग्राहकांना प्रति दिन निधी हस्तांतरणासाठी कमाल एक लाख रुपयांचीच मर्यादा आहे. मात्र, आयपीओसाठी अर्ज करताना प्रति व्यक्ती आता ती पाच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या पाच लाख रुपयांपर्यंत लावलेली बोलीची पूर्तता करण्यासाठी सर्व प्रणाली सक्षम असल्याचे ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एनपीसीआय) स्पष्ट केले आहे. यूपीआय प्रक्रिया हाताळणाऱ्या या संस्थेने सरलेल्या ३० मार्च २०२२ अखेर सर्व बाजार मध्यस्थांच्या यंत्रणा आणि प्रणालींची तपासणी पूर्ण केली असून, वाढीव मर्यादेत निधी हस्तांतरणांच्या स्वीकृतीसाठी ८० टक्के यंत्रणा सक्षम बनल्याचा ‘एनपीसीआय’नेही निर्वाळा दिला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up to rs 5 lakh bidding possible for ipo through upi zws
First published on: 07-04-2022 at 02:50 IST