पीटीआय, नवी दिल्ली : नव्या युगाच्या रोकडरहित, कार्डरहित आणि संपर्करहित देयक व्यवहाराचा आधुनिक पर्याय अर्थात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून मे महिन्यात ५.९५ अब्जांहून अधिक व्यवहार पार पडले आहेत. एप्रिलच्या तुलनेत अशा व्यवहारांमध्ये झालेली ही ६.६३ टक्क्यांची वाढ आहे.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे संचालित ‘यूपीआय’ व्यवहारांना २०१६ मध्ये सुरुवात झाली आहे. सरलेल्या मे महिन्यात ‘यूपीआय’ मंचावर एकूण १० लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले, जो त्यांचा आजवरचा अत्युच्च टप्पा आहे. एप्रिलमध्ये या माध्यमातून ९.८३ लाख कोटी रुपये मूल्याचे व्यवहार पार पडले होते, म्हणजे महिनागणिक ते ५.९१ टक्क्यांनी वाढले आहेत.

१० लाख कोटी डॉलरची संधी

रोकडरहित देयक व्यवहारात अर्थात ‘यूपीआय’मार्फत होणाऱ्या डिजिटल व्यवहारांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत असून, २०२६ पर्यंत त्यांच्याकडून १० लाख कोटी डॉलरचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. सध्या त्या माध्यमातून ३ लाख कोटी डॉलरचे व्यवहार होत आहेत. एकूण देयक व्यवहारात त्यांचा सध्याचा ४० टक्क्यांचा वाटा २०२६ पर्यंत ६५ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज सल्लागार कंपनी बीसीजी आणि फोनपे पल्स यांनी संयुक्तरीत्या गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने व्यक्त केला आहे. अहवालात विक्रेत्यांच्या देयकांमध्ये (र्मचट पेमेंट) येत्या चार वर्षांच्या काळात सात पटींनी वाढ होऊन ते २.५ ते २.७ लाख कोटी डॉलरवर पोहोचण्याचा कयास व्यक्त केला आहे. सध्या त्याचे आकारमान ३० ते ४० हजार कोटी डॉलर इतके आहे.