टपाल विभागाशी सामंजस्यातून विस्ताराचीही योजना
देशात नवउद्यमींचा जागर आणि लघु व मध्यम उद्योगांची वेगाने वाढ सुरू असली तरी कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या दळणवळणाचा पैलू मात्र अजूनही मुजोर मालवाहतूकदार आणि पारंपरिक अंगाडियांवर अवलंबून आहे. या सेवेचा चेहरामोहरा बदलून, तिला अधिक गतिमान, सुबद्ध आणि किफायती रूप देणारा नवउद्यमी उपक्रम ‘वामाशिप’च्या रूपाने पुढे आले आहे.
वस्तू व उत्पादनांची हवाई, जल तसेच भूतल वाहतूक करणाऱ्या सर्व सेवा प्रदात्यांना एका मंचावर आणून त्यांचा ग्राहकांशी दुवा सांधणारी सेवा वामाशिपने सुरू केली आहे. आरामेक्स, ब्लू डार्ट, डीएचएल व फेडेक्सपासून ते शिपिंग कंपन्यांपर्यंत तब्बल ५० सेवाप्रदात्यांचे व्यासपीठ वामाशिपने नोव्हेंबर २०१५ पासून सुरुवात आजवर बनविले आहे, अशी माहिती तिचे मुख्याधिकारी भाविन चिनाई यांनी दिली. छोटय़ा-मोठय़ा एसएमई आणि ई-व्यापारातील १०० कंपन्यांचा नियमित ग्राहकवर्ग अल्पावधीत मिळविण्यात आला आहे. भारतातून जगभरात सहा देशांमध्ये तर देशांतर्गत जवळपास ८,००० पिनकोड क्रमांकांपर्यंत मालवाहतूक सध्या वामाशिपच्या माध्यमांतून शक्य झाली आहे. भारतीय टपाल विभागाबरोबर सामंजस्यासाठी अंतिम टप्प्यातील बोलणी सुरू असून, ते झाल्यास लाखभराहून अधिक ठिकाणांपर्यंत सेवा विस्तार साधता येऊ शकेल, असे चिनाई यांनी सांगितले.
सेवा प्रदात्यांशी वामाशिपने केलेल्या घाऊक दररचनेचा लाभ थेट लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे धोरण वापरात आल्याने, छोटय़ा उद्योजकांना वामाशिपमार्फत मालवाहतूक करून खर्चात ५ टक्क्यांपासून ते ७० टक्क्यांपर्यंत सहज बचत करता येईल, असा चिनाई यांनी दावा केला.
आपले निम्मे ग्राहक हे ई-व्यापारातील कंपन्या असण्यामागेही हेच कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगदी फेसबुक, इन्स्टाग्राम या जनमाध्यमांच्या आधारे वस्तू विक्रय करणाऱ्या व्यक्ती-कारागीरांनाही वामाशिपचा मंच उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.