पीटीआय, नवी दिल्ली : सेमीकंडक्टर चिपच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे मंदावलेल्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत निरंतर घसरण सुरूच आहे. सरलेल्या मार्चमध्ये प्रवासी वाहनांची एकूण विक्रीत ४ टक्क्यांची घट होत ती २.७९ लाख वाहनांवर घरंगळली आहे. मार्चमध्ये सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत गेल्या वर्षांशी तुलना करता घट झाली आहे. सरलेल्या महिन्यात २,७९,५०१ वाहनांची विक्री करण्यात आली, तर गेल्या वर्षी याच महिन्यात (मार्च २०२१) २,९०,९३९ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती, अशी माहिती वाहन उद्योगाची नेतृत्वदायी संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स’ने (सियाम) बुधवारी दिली.

दुचाकींच्या विक्रीतही मार्च महिन्यात घसरण झाली आहे. या महिन्यात दुचाकींची विक्री २१ टक्क्यांनी घसरून ११,८४,२१० वाहनांवर आली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १४,९६,८०६ नोंदली होती. सर्व श्रेणीतील वाहन विक्री सरलेल्या आर्थिक वर्षांत मंदावली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण १,७५,१३,५९६ वाहनांची विक्री झाली. तर त्याआधीच्या वर्षांत म्हणजेच २०२०-२१ मध्ये १,८६,२०,२३३ वाहनांची विक्री झाली होती.

वाणिज्य वाहनांच्या विक्रीत वाढ

तीनचाकी वाहनांच्या विक्रीत मात्र वाढ झाली असून सरलेल्या वर्षांत २,६०,९९५ तीनचाकी विकल्या गेल्या आहे. तर त्याआधीच्या वर्षांत २,१९,४४६ तीनचाकी वाहने विकली गेली होती. याचबरोबर वाणिज्य वाहनांच्या विक्रीतदेखील मोठी वाढ नोंदली गेली. देशभरात करोना निर्बंध शिथिल झाल्याने अर्थचक्राला पुन्हा गती प्राप्त झाल्याने वाणिज्य वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येते. सरलेल्या आर्थिक वर्षांत ७,१६,५६६ वाणिज्य वाहनांची विक्री झाली आहे. त्या आधीच्या वर्षांत ती ५,६८,५५९ इतकी होती.

वाहननिर्मिती क्षेत्रासाठी सरलेले वर्ष अनपेक्षित घटनांनी भारलेले होते. करोना संकटामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेला सेमीकंडक्टर चिप अपुरा पुरवठा, सुटय़ा घटकांच्या वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ आणि वाहनांच्या किमतवाढीवर नियंत्रण, त्याचबरोबर सरकारच्या धोरणांशी सुसंगत राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक अशा एकाच वेळी विविध आव्हाने समोर होती. त्यांचा सामना करण्यासाठी वाहन कंपन्यांनी कठोर परिश्रम घेतले. सरकारकडून राबविण्यात आलेल्या उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) वाहननिर्मिती क्षेत्र लाभार्थीही ठरला आहे. 

– केनिची आयुकावा, अध्यक्ष, सियाम