पादत्राणांची अग्रेसर नाममुद्रा असलेल्या बाटा इंडियाने आपल्या किरकोळ विक्री यंत्रणेला आणखी मजबूत करण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे. आगळेपण म्हणून स्त्रियांसाठी पादत्राणांची विशेष दालनेही लवकरच देशात काही ठिकाणी प्रयोग स्वरूपात कंपनीकडून सुरू केली जाणार आहेत.
चालू आर्थिक वर्षांत आपल्या विक्री व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी करणार असून, यातून विक्रीमध्ये २० टक्के वाढीचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास बाटा इंडियाचे अध्यक्ष उदय खन्ना यांनी मंगळवारी येथे आयोजित ८० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित भागधारकांपुढे बोलताना व्यक्त केला.
बाटाच्या स्त्रियांच्या पादत्राणांचे सब-ब्रॅण्ड्स मेरी क्लेअर आणि सनड्रॉप्स यांच्या एकूण विक्री महसुलातील २५ टक्के असा उमदा वाटा पाहता, कंपनीने या ग्राहक वर्गासाठी विशेष विक्री दालनांची योजना बनविली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव गोपालकृष्णन यांनी स्पष्ट केले. बाटा प्रॉपर्टीज लि. आणि कोस्टल कमर्शियल अॅण्ड एक्झिम लि. या उपकंपन्यांना मूळ कंपनीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समभाग विभाजन, बक्षीस समभागाचा निर्णय लांबणीवर
बाटा इंडियाच्या व्यवस्थापनाने आखलेला वृद्धीपथ म्हणजे योग्य दिशेने पडलेली कालसुसंगत पावले असल्याचा निर्वाळा आघाडीच्या दलाल पेढय़ांनी दिला आहे. पादत्राणांच्या क्षेत्रातील अग्रेसर असलेली ही कंपनी येत्या काळात उन्हापासून संरक्षक चष्मे, स्त्रियांसाठी दुपट्टे (स्काव्र्हज्)आणि खास स्त्री-पादत्राणांची दालने सुरू करण्याच्या बेतात आहे. या शिवाय सध्याच्या बडय़ा आकाराच्या विक्रीकेंद्रांऐवजी छोटय़ा आकारांच्या विक्री दालनांवरही तिचा आगामी काळात भर राहील. मुंबई शेअर बाजारात बाटाचा समभाग मंगळवारी रु. ८६४.१५ या भावावर बंद झाला. कालच्या तुलनेत त्याने ५३.५५ रुपयांची म्हणजे ६.६१ टक्क्यांची कमाई केली. गेल्या काही दिवसात पडत्या बाजारातही या समभागाने १७ टक्क्यांनी उसळी मारली आहे. भागधारकांना समभागांच्या विभाजनासह बोनसची बक्षिसीही मिळेल, अशी बाटाबाबत बाजारात वदंता होती. तथापि बाटाने आपल्या अन्य उपकंपन्यांना मूळ कंपनीत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याचे घोषित केले आहे. मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज् या दलाल पेढीने बाटाच्या समभागाच्या खरेदीची शिफारस केली असून, नजीकच्या काळात ९७५ रुपये असा अपेक्षित भाव सांगितला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jun 2013 रोजी प्रकाशित
‘बाटा’कडून लवकरच स्त्रियांसाठी पादत्राणांची विशेष दालने
पादत्राणांची अग्रेसर नाममुद्रा असलेल्या बाटा इंडियाने आपल्या किरकोळ विक्री यंत्रणेला आणखी मजबूत करण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन आखले आहे. आगळेपण म्हणून स्त्रियांसाठी पादत्राणांची विशेष दालनेही लवकरच देशात काही ठिकाणी प्रयोग स्वरूपात कंपनीकडून सुरू केली जाणार आहेत.
First published on: 05-06-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Very soon special gallery for womens foot ware by bata