उद्योग समूह ताबा व्यवहारानंतर इंधन खोऱ्यातही स्वारस्य

व्हिडीओकॉन समूह ताब्यात घेणाऱ्या वेदांताने कंपनीच्या तेल व वायू खोरे व्यवसायातील भागीदार होण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. वेदांताने व्हिडीओकॉनच्या कृष्णा गोदावरी खोऱ्यातील रावा तेल व वायू साठा व्यवसाय खरेदी करण्याचे निश्चित केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या नव्या व्यवहारापोटी वेदांता समूह व्हिडीओकॉनला ४ कोटी डॉलर (२९२ कोटी रुपये) देईल, असे अब्जाधीश उद्योजक अनिल अगरवाल यांच्या वेदांताने बुधवारी स्पष्ट केले. केंद्र सरकारविरोधातील कर तगादा याचिका वेदांता समूहाने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकली आहे. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठापुढे सुरू असलेल्या दिवाळखोर प्रक्रियेंतर्गत वेदांताच्या व्हिडीओकॉन समूहावर ताबा घेण्याच्या प्रस्तावावर मंगळवारी मंजूर झाला. यानंतर व्हिडीओकॉनला कर्ज देणाऱ्या व्यापारी बँकांना मात्र १० टक्के कर्जावर पाणी सोडावे लागणार आहे.

तेल, वायू तसेच पोलाद क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेदांताने २००१ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बाल्को आणि पुढच्याच वर्षांत हिंदुस्थान झिंक कंपनी खरेदी केली होती. तसेच दिवाळखोरीतील इलेक्ट्रॉस्टील, फेरो अ‍ॅलोइज कॉर्पोरेशनही खरेदी केली होती. भारतातील सेसा गोवा, केर्न इंडियाही वेदांताच्याच ताब्यात आहेत.

व्हिडीओकॉनच्या ताब्यातील रावा इंधन साठय़ातून दिवसाला २२,००० प्रति पिंप उत्पादन होते. या क्षेत्राव्यतिरिक्त व्हिडीओकॉन समूह स्थावर मालमत्ता तसेच विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रात आहे. २०१७ मध्ये दिवाळखोरीत निघालेल्या पहिल्या १२ कंपन्यांमध्ये या समूहाच्या ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती व्यवसायाचा समावेश होता.

Web Title: Videocon to give anil agarwals group majority stake in ravva oilfield zws
First published on: 10-06-2021 at 03:31 IST