scorecardresearch

विजय मल्याची लंडनच्या घरातून हकालपट्टी

भारतातून फरार बँकांचा कर्जबुडव्या विजय मल्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लंडनमधील आलिशान घरातून बाहेर काढण्याचे आदेश ब्रिटनच्या न्यायालयाने मंगळवारी दिले.

वृत्तसंस्था, लंडन

भारतातून फरार बँकांचा कर्जबुडव्या विजय मल्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला लंडनमधील आलिशान घरातून बाहेर काढण्याचे आदेश ब्रिटनच्या न्यायालयाने मंगळवारी दिले. स्विस बँक यूबीएसकडून मल्याच्या घराचा ताबा घेतला जाणार आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी गेल्या आठवडय़ात मल्ल्याच्या कोटय़वधी पौंडांच्या आलिशान घराचा ताबा देण्याच्या आदेशाला स्थगिती द्यायची की नाही यावर निर्णय राखून ठेवला होता. त्यावर मंगळवारी सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने विजय मल्यासह त्याचा मुलगा सिद्धार्थ आणि आई ललिता यांना लंडनमधील हे घर ताबडतोब सोडण्याचे आदेश दिले.

भारतातून फरमर झाल्यापासून मल्या लंडनमधील याच घरात वास्तव्याला असून, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड येथे नोंदणीकृत कंपनीची या घरावर मालकी आहे. २०१२ मध्ये हे घर मल्या याने पाच वर्षे मुदतीचे २.०४ कोटी पौंडाचे कर्ज मिळविण्यासाठी यूबीएसकडे गहाण ठेवले होते. २५ मार्च २०१७ रोजी कर्जाची मुदत उलटूनही परतफेड न झाल्याने यूबीएसने न्यायालयात दावा दाखल केला होता. अनेक प्रकारच्या दिरंगाईनंतर अखेर यूबीएसच्या बाजूने कौल आला आहे. भारतातही बँकांचे सुमारे ९,००० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा मल्यावर आरोप असून, ब्रिटनमधून त्याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी अडसर ठरणाऱ्या ज्या काही बाबी होत्या त्यात या न्यायप्रविष्ट प्रकरणाचाही समावेश होता. मल्या याला घराबाहेर काढले जाणे हे त्याच्या भारतातील प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेस मदतकारकच ठरणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay mallya evicted london home ysh