कंपन्यांचे तिमाही निकाल व पावसाळी अधिवेशनात तड लागणारी अर्थसुधारणा विधेयकांबाबत अनिश्चिततेच्या चिंतेतून भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी घसरण दाखविली. परिणामी सेन्सेक्स २८,२०० तर निफ्टीने तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची ८,६००ची पातळी सोडून खाली उतरला.
व्यवहारात २८,५१८.०६ पर्यंत मजल मारणारा मुंबई निर्देशांक दिवसअखेर २३७.९८ अंश घसरणीसह २८,१८२.१४ वर येऊन ठेपला. तर ७४ अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५२९.४५ पर्यंत घसरला. ८ जुलैनंतरची ही निर्देशांकांत झालेली मोठी घसरण होती. दोन्ही प्रमुख निर्देशांकांत जवळपास एक टक्क्याची घसरण नोंदली गेली. चिंतेची बाब म्हणजे आघाडीच्या समभागांबरोबरच, मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात तर प्रत्येकी दीड टक्क्यांहून अधिक मोठय़ा घसरणीने मंगळवारी झालेली पडझड ही सर्वव्यापी असल्याचा प्रत्यय दिला. शिवाय बाजारातील मंगळवारच्या घसरणीने यापूर्वीच्या सलग तीन व्यवहारांतील तेजीला चाप दिला आहे. ही तेजी तब्बल ५०० हून अधिक अंशांची होती.
औषधी क्षेत्रातील सन फार्माच्या समभाग मूल्याची तीव्र हालचाल बाजारात नोंदली गेली. हा समभाग सेन्सेक्समध्येही सर्वाधिक आपटी राखणारा समभाग ठरला. कंपनीने तिमाहीत नफ्यात फटका सहन करण्याचा परिणाम समभागावर दिसला. पण आगामी वर्षभरात खर्चात वाढ झाल्याने विक्री उत्पन्नातील कामगिरीही प्रभावित होईल, अशा कंपनीकडून आलेल्या निर्देशांनी सन फार्मा व्यवहारात १६ टक्क्यांपर्यंत घसरला.
इन्फोसिस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर यांनी गेल्या तिमाहीत नफ्याच्या माध्यमातून केलेल्या दमदार आर्थिक कामगिरीने मुसंडी मारली. तथापि युनिलिव्हर, एचडीएफसी बँक समभागांमध्येही शेवटच्या क्षणी नफेखोरी दिसून आली.
महसूलवाढ प्रमाणात स्पर्धक टीसीएसला मागे टाकणाऱ्या इन्फोसिसचा समभाग व्यवहारात १५ टक्क्यांपर्यंत वाढला. इन्फोसिससह विप्रोचाही समभाग दिवसअखेर वाढला. एकूण माहिती तंत्रज्ञान निर्देशांक ४.६ टक्क्यांनी वाढला.