सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन पिढीच्या स्मरणात राहील असा हा आठवडा! शुक्रवारी, बारा वर्षांनंतर बाजाराला खालचे सर्किट लागले (निर्देशांक एका सत्रात दहा टक्क्यांहून जास्त खाली आल्याने) आणि ४५ मिनिटांसाठी बाजार बंद ठेवावा लागला. आठवडय़ाची सुरुवातच मोठय़ा आपटीने झाली आणि सप्ताहअखेरचे व्यवहारही त्याच वळणावर सुरू झाले. तेल उत्पादक राष्ट्रांमधील मतभेदांमुळे सौदी अरेबियाने उत्पादनात वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे खनिज तेलाच्या किमती ३० टक्क्यांनी खाली आल्या. आधीच करोनाचा धसका घेतलेल्या जागतिक बाजारात एक नवे संकट निर्माण होऊन सर्व बाजार कोसळले. बरोबरीने भारतीय भांडवली बाजारही एका दिवसात पाच टक्क्यांनी खाली आला. दुसऱ्याच दिवशी बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला पण जागतिक आरोग्य परिषदेने करोना ही जागतिक महासाथ असल्याचे जाहीर केले तसेच चीनबाहेर अन्य देशांत त्याच्या वाढत्या प्रादुर्भावाने गुंतवणूकदारांना भयग्रस्त केले. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स ३,४७३ अंश तर निफ्टी १,०३४ अंश विक्रमी साप्ताहिक घसरणीसह बंद झाले.

येस बँकेवर घातलेले निर्बंध व बँकेला सावरण्यासाठी केलेली उपाययोजना खातेदारांना दिलासा देणारी आहे. येस बँकेचे समभाग एवढय़ा मोठय़ा घसरणीतही सध्याची पातळी टिकवून आहेत. परंतु स्वस्त मिळतात म्हणून त्यामध्ये खरेदी करण्याचा मोह टाळायला हवा. कारण बँकेला पूर्वपदावर येण्यास काही वर्षे लागतील आणि सध्याच्या घसरलेल्या बाजारात अनेक नामवंत बँकांचे (आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआय) समभाग आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. त्यामधील गुंतवणूक निश्चितच कमी जोखमीची व दीर्घकालीन फायद्याची ठरेल.

तेलामधील जवळजवळ ३० टक्के घसरणीमुळे आणि रुपयाचा विनिमय दर साधारणपणे आटोक्यात राहिल्याने परकीय चलनाच्या गंगाजळीत वाढ होऊन वित्तीय तूट काबूत ठेवण्यासाठी भारताला मदत होणार आहे. नजीकच्या काळात झालेली महागाई निर्देशांकांतील वाढ अल्पजीवी ठरण्याचे संकेत फेब्रुवारी महिन्याच्या महागाई निर्देशांकावरून मिळत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेला व्याज दर कमी करणे अनिवार्य ठरेल. घटणारे व्याज दर उत्पादन वाढीला व पर्यायाने भांडवल बाजाराला पूरक ठरतील.

बाजाराची एवढी मोठी घसरण ही अनेक वर्षांतून एकदा येणारी संधी आहे. त्याचा पुरेपूर फायदा गुंतवणूकदारांनी घेतला पाहिजे. कुठले समभाग घ्यावेत हा म्हटले तर खूप सोपा प्रश्न आहे. कारण सर्वच समभाग घसरले आहेत. निफ्टीमधील कुठल्याही समभागांची खरेदी वर्षभरात फायद्याची ठरेल. किंवा गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे निफ्टीआधारित इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करता येईल. पण जगाला व व्यापार-उद्योगाला आलेल्या संकटाचा किती दिवस सामना करावा लागेल याचा सध्या तरी तर्क करता येत नाही, त्यामुळे गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी व टप्प्याटप्प्याने करणेच जरुरीचे आहे. येत्या सोमवारी एसबीआय कार्ड्सचे समभाग बाजारात सूचिबद्ध होतील. बाजाराच्या या अवघड वळणावर त्यांचे बाजारमूल्य विक्री किमतीपेक्षा कमी राहिले तर ती दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीची संधी असेल. करोना विषाणूचा प्रसार व त्याचा सामना करण्यासाठी व उद्योगांना साहाय्य करण्यासाठी सरकारच्या धोरणांकडे बाजाराचे पुढील सप्ताहात लक्ष असेल.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekly stock market report stock market analysis reports zws
First published on: 14-03-2020 at 02:23 IST