मुख्यमंत्री फडणवीस यांची दावोसमध्ये घोषणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक आर्थिक परिषदेने जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दावोस येथे सांगितले.

अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्कोप्रमाणेच देशाच्या आर्थिक राजधानीत हे केंद्र असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहकार्याने हे केंद्र विकसित करण्यात येणार आहे. ‘जागतिक आर्थिक परिषदे’मध्ये उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस तीन दिवसांच्या दावोस दौऱ्यावर गेले आहेत.

परिषदेच्या केंद्र विस्ताराच्या निर्णयाचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विविध तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या परिषदेच्या मुंबईतील या नव्या केंद्रातून ज्ञानाचे आदानप्रदान करण्याबरोबरच विज्ञान—तंत्रज्ञानाधारित धोरणांची अंमलबजावणी करणे अधिक सुकर होईल. या केंद्राच्या माध्यमातून रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेतीसाठी ड्रोनसारख्या तंत्राच्या वापरावर भर देण्यात येणार आहे.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी परिषदेचे अन्नसुरक्षा विषयक विभागाचे प्रमुख सीन डी. क्लिन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मूल्य साखळी, शेतीसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, नवीन संशोधनांचा उपयोग आणि सकस अन्नाची गरज अशा अनेक विषयांवर यावेळी व्यापक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

क्लिन यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सार्वजनिक—खाजगी भागिदारीतून मूल्य साखळीला अधिक चालना देऊन राज्यातील २५ लाख शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच शेती क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर, बँकांसोबत व्यापक भागीदारी, प्रत्यक्ष पीकपद्धतीवर आधारित अर्थपुरवठा आणि सुयोग्य विम्याच्या सुविधा या विषयांवरही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. ही चर्चा अन्न सुरक्षा, शाश्वत पर्यावरण आणि आर्थिक संधीतून शाश्वत शेतीकडे अधिक उत्तम पद्धतीने वाटचाल करण्यासाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी दावोस येथील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र सेंटर’ला यावेळी भेट दिली. ग्रामीण भाग माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्याकरण्याची व्यापक योजना आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीसंदर्भातील अनेक मुद्दय़ांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली. अ‍ॅसिड हल्लय़ातील पीडितांच्या मदत व पुनर्वसनासाठी मीर फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करणाऱ्या अभिनेता शाहरुख खानला परिषदेचा ‘क्रिस्टल’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्याचे अभिनंदन केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wef centre for fourth industrial revolution proposed in mumbai says devendra fadnavis
First published on: 24-01-2018 at 02:18 IST