घाऊक महागाई दर डिसेंबरमध्ये १३.५६ टक्क्यांवर

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमधील किरकोळ महागाई दरातदेखील चिंताजनक वाढ दिसून आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि त्यापरिणामी देशांतर्गत उत्पादित किमतीतील वाढीतून घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर डिसेंबरमध्ये १३.५६ टक्के नोंदविला गेला. नोव्हेंबरच्या तुलनेत तो काहीसा घसरला असला तरी सलग नवव्या महिन्यात दोन अंकी स्तरावर कायम आहे.

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमधील किरकोळ महागाई दरातदेखील चिंताजनक वाढ दिसून आली आहे. मात्र घाऊक महागाई दराने किंचित दिलासा दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात हा दर १४.२३ टक्के असा मागील १२ वर्षांतील उच्चांकावर होता. गत वर्षांत याच काळात तो (डिसेंबर २०२०) १.९५ टक्क्यांपर्यंत खाली होता.

मुख्यत: खनिज तेल, मूलभूत धातू, अन्नधान्य, इंधन व नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आदींच्या किमती मागील वर्षांच्या याच महिन्याच्या तुलनेत वाढल्या आहेत. ज्याचा निर्मिती उद्योगाच्या खर्च आणि उत्पादनाच्या किमतीत वाढीचा डिसेंबरमध्ये घाऊक महागाई निर्देशांकावर वृद्धी दर्शविणारा परिणाम दिसून आला आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.

अन्नधान्य घटकात दुपटीने वाढ

चालू आर्थिक वर्षांत एप्रिलपासून घाऊक महागाई दर सातत्याने दोन अंकी पातळीवर टिकून आहे. अन्नधान्याचा महागाई दर नोव्हेंबर महिन्यातील ४.८८ टक्क्यांवरून सरलेल्या महिन्यात ९.५६ टक्क्यांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एकूणच अन्नधान्याच्या महागाई दरात वाढ झाली. डिसेंबरमध्ये भाज्यांच्या किमती ३१.५६ टक्क्यांनी वाढल्या, तर नोव्हेंबरमध्ये ही वाढ ३.९१ टक्के होती, असे आकडेवारी सांगते. मात्र यादरम्यान बटाटय़ाचे भाव (-)४२.१० टक्क्यांनी तर कांद्याचे भाव (-)१९.०८ टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचबरोबर उच्च प्रथिनेयुक्त आहार अर्थात अंडी, मांस आणि मासे यांची डिसेंबरमधील किंमतवाढ ही ६.६८ टक्के अशी राहिली. त्याचप्रमाणे डाळींच्या किमतीतही ५.१० टक्के दराने वाढ नोंदली गेली. बरोबरीने पेट्रोलचे दर ७२.११ टक्क्यांनी, एचएसडी (हाय-स्पीड डिझेल) ६८.०५ टक्क्यांनी आणि एलपीजीच्या किमती ५३.२८ टक्क्यांनी वाढल्या.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wholesale inflation rises to 13 56 percent in december zws

Next Story
निर्देशांकांत किरकोळ घसरण; मात्र सलग चौथी साप्ताहिक वाढ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी