झोमॅटोच्या शेअरच्या किमतीत मंगळवारी सकाळी घट झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीत झोमॅटोचा शेअर २७% आपटला होता. त्यात आणखी ५ टक्क्यांची भर पडली आहे. एका आठवड्यात झोमॅटोचा शेअर एकूण ३२ टक्क्यांनी आटपला आहे. ओपनिंग बेलवर, झोमॅटोच्या शेअरची किंमत ८४.१ रुपये प्रति शेअर या नवीन ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होती. कोटक सिक्युरिटीजच्या विश्लेषकांनी गुंतवणुकदारांना झोमॅटोचा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

“झोमॅटोच्या शेअर्सच्या किमतीत तीव्र घसरण हे जागतिक तंत्रज्ञान शेअर्सच्या किमतीतील घसरणीला ट्रॅक करत असल्याचं दिसतंय. झोमॅटोवरील आमच्या मूलभूत दृष्टिकोनात कोणताही बदल झालेला नाही आणि आम्ही BUY रेटिंग कायम ठेवतो,” असं कोटक सिक्युरिटीजने म्हटलंय. त्यांनी झोमॅटोवर प्रति शेअर १७० रुपये किंमत ठेवली आहे.

फायनेन्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी जुलैमध्ये स्टॉक एक्स्चेंजवर आलेल्या झोमॅटो या फूड-टेक कंपनीला आतापर्यंत गुंतवणूकदारांमध्ये पसंती मिळाली आहे आणि ती अजूनही प्रति शेअर ७२ ते ७६ रुपयांच्या IPO किंमतीच्या वर आहे. कोटक सिक्युरिटीजचा असा विश्वास आहे, की कंपनीचा स्टॉक जसा आहे तसा कमी होण्याचे कोणतेही विशिष्ट कारण नाही. यामागे जागतिक टेक राउट हे प्रमुख कारण असल्याचं म्हटलं गेलंय. या वर्षी आतापर्यंत, Nasdaq चे शेअर्स १५.७% पर्यंत घसरले आहे, तर  एक सॅन फ्रान्सिस्कोमधील ऑनलाइन फूड डिलिव्हरी फर्म DoorDash चे शेअर्स २४.९% घसरली आहे, Delivery Hero कंपनीत ३०.३% आणि Deliverooचे शेअर्स २४.१% पर्यंत घसरले आहेत.

कोटक सिक्युरिटीजने सांगितले की, झोमॅटोच्या व्यवसायाकडे पाहता ते चांगल्या आणि मजबूत स्थितीत आहे. बाजारात कोणतीही नवीन कंपनी दाखल न झाल्याने, झोमॅटोने मजबूत बाजारपेठेची स्थिती कायम ठेवली आहे असे मत ब्रोकरेज फर्मने नोंदवले आहे.