तृप्ती राणे

गेल्या आठवडय़ात एका जुन्या आणि नामवंत म्युच्युअल फंड घराण्याने त्यांच्या ६ फंडां संदर्भात अतिशय धक्कादायक अशी बातमी दिली. बातमीनुसार त्यांच्या या ६ फंडांमध्ये गुंतवणूदारांचे सगळे व्यवहार, म्हणजेच खरेदी, विक्री, हस्तांतरण ((STP, Switch) बंद केले जाऊन, फंडांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला गेला.

आता फंडातून पैसे तेव्हाच मिळणार जेव्हा त्यातील गुंतवणूक विकली जाईल किंवा तीची परतफेड होईल. रोखे संलग्न म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक अशी अडकू शकते याचा अनुभव या घटनेमुळे जाणवला.

रोकड सुलभतेचं महत्त्व पटवून देणारं ज्वलंत उदाहरण म्हणून मी या घटनेचं विश्लेषण वाचकांसमोर करायचं ठरवलं. विलीनीकरणाच्या नोटीसनुसार, फंडांमध्ये रोकडसुलभता कमी होत होती आणि बरेच पैसे फंडातून काढण्यात येत होते. त्यामुळे परिस्थिती अशी झाली की फंडांना गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार पैसे परत करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं.

नियमानुसार कर्ज काढूनसुद्धा त्यांना पैसे परत देता येत नव्हते. म्हणजेच एकीकडे फंडाला गुंतवणूकदाराला पैसे द्यायचे आहेत; परंतु दुसरीकडे त्याच्याकडून पैसे वसूल होत नव्हते किंवा वसुली कमी होत होती आणि बाजारामध्ये त्यांच्या गुंतवणुकीला मागणी कमी होती म्हणून असलेली गुंतवणूक विकणंसुद्धा अशक्य होतं.

साधारणपणे, कुठलाही फंड गुंतवणूकदाराच्या गरजेसाठी पैसे देण्याची तयारी बाळगून असतो. तेव्हा जोवर मागणी रास्त असते तोवर फंड तिची पूर्तता करू शकतो. परंतु काही परिस्थितींमध्ये फंडाला मागणी पूर्ण करता येत नाही. याला दोन गोष्टी कारणीभूत असतात : जेव्हा गुंतवणूकदार नेहमीपेक्षा जास्त पैसे काढतात किंवा म्युच्युअल फंडाने केलेली गुंतवणूक ही अपेक्षेपेक्षा कमी मिळते किंवा ठरवलेल्या वेळेवर परत मिळत नाही. या सहा फंडामधील गुंतवणूक तपासल्यानंतर असं लक्षात आलं की इथे बऱ्याच ठिकाणी जास्त परतावे देणाऱ्या गुंतवणुका होत्या.

असे पोर्टफोलिओ पाहिल्यावर मनात या गुंतवणुकीच्या परतफेडीबद्धल साशंकता येणं साहजिकच आहे. म्हणून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे फंडाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. विलीनीकरणामुळे फंडाला गुंतवणुकीतून पैसे परत मिळवायला वेळ मिळतो आणि येणाऱ्या काळात जर परिस्थिती सुधारली तर कमीत कमी नुकसान होऊ न मुद्दल परत मिळू शकते.

आपण जेव्हा दुसऱ्याला पैसे देतो तेव्हा त्या पैशाचं पुढे काय होतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला हवे तेव्हा पैसे परत मिळण्यासाठी, ज्या ठिकाणी पैसे गुंतवले गेले आहेत तिथे जर रोकड सुलभता नसेल तर आपले पैसे अडकून बसतात.

रोकड सुलभतेची दुसरी बाजू अशी आहे की, जिथे जास्त रोकड सुलभता असते तिथे किमती लवकर बदलतात म्हणजेच मागणी वाढली की किंमत वाढणार आणि मागणी कमी झाली की किंमत कमी होणार. जेव्हा गुंतवणूकदारांना पैसे हवे होतात तेव्हा फंडांना त्यांच्याकडे असलेली गुंतवणूक विकावी लागते.

अशा वेळी जर विक्री नेहमीपेक्षा जास्त होताना दिसली की मागणी कमी झाल्याने गुंतवणुकीची किंमत कमी होते. शिवाय चांगल्या प्रतीची गुंतवणुकीची किंमत कमी पडेल; परंतु जास्त जोखीम असणारी गुंतवणूक जास्त पडते. कोरोनासारख्या जागतिक संकटासमोर उभे राहण्याकरता मोठय़ा प्रमाणात पैसा उभारणं कठीण आहे. शिवाय आहे तो पैसा जपायचा असल्यामुळे सर्वच गुंतवणूकदार जोखीम कमी करत आहेत. मग अशा वेळी काय होतं हे आपण सर्वांनी गेले महिनाभर पाहिलं आणि अनुभवलं. शेअर बाजार, रोखे, सोने सगळेच पडले. कारण पैसे सगळीकडून काढले गेले.

शेअर बाजाराच्या बाबतीत सांगायचं तर लार्ज कॅप शेअर्समध्ये, मिड आणि स्मॉल कॅप शेअर्सपेक्षा रोकड सुलभता जास्त असते आणि म्हणून गुंतवणूकदार त्यांना जास्त पसंत करतात. परंतु, विक्रीच्या वेळी हेच शेअर लवकर विकलेही जातात. रोकड सुलभतेची किंमत ही गुंतणूकदाराला मोजावीच लागते. जिथे रोकड सुलभता जास्त तिथे परतावे कमी आणि जोखीमसुद्धा कमी. पण जिथे रोकड सुलभता कमी तिथे जोखीम जास्त आणि म्हणून परताव्याची अपेक्षादेखील जास्त असते.

एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या पोर्टफोलिओच्या रोकड सुलभतेकडे नियमित लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. बाजारात जेव्हा तेजी चालू असते तेव्हा कुणाच्याही ध्यानीमनी ही गोष्ट येत नाही. परंतु पैशाची गरज जेव्हा जास्त होते तेव्हा जे असेल, जसं असेल तसं विकून गुंतवणूकदार बाहेर पडतो. आणि जेव्हा असे अनेक गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक विकायला काढतात तेव्हा बाजारात घसरण सुरु होते.

सजग गुंतवणूकदाराने खालील प्रमाणे गोष्टी केल्या तर त्याला नक्कीच विद्यमान बिकट परिस्थितीला सामोरं जाता येईल :

१.  किती पैसे हाताशी नेहमी असावेत – ६ महिने ते एक वर्षांतील खर्च.

२.  हाताशी असलेले पैसे थोडे बचत खात्यात, थोडे मुदत ठेवीत, थोडे म्युच्युअल फंड असं करून ठेवावेत.

३.  रोखे संलग्न म्युच्युअल फंडाने कुठे गुंतवणूक केली आहे हे वेळोवेळी तपासावं. प्रत्येक महिन्याला फंडाची  Factsheet येते. ती नीट तापसली तर आपल्याला तो चालू ठेवावा की बाहेर पडावं हे समजतं.

४.  ढंल्ल्रू म्हणजेच घबराट परिस्थितीमध्ये चुकीचे निर्णय घेतले जाऊ  शकतात. तेव्हा एकतर वादळापूर्वीचे संकेत जाणून घेऊन हालचाल करायची नाहीतर वादळ थोडं शांत झाल्यावर मग निर्णय घ्यायचा.

५.  किती परताव्यासाठी किती जोखीम घेऊ  शकतो हे प्रत्येकाने तपासणं आवश्यक आहे. एखादा टक्का जास्त परतावा मिळणार म्हणून २०% मुद्दल कमी मिळायची शक्यता होऊ  शकते हे लक्षात ठेवा.

६.  सगळे खाचखळगे समजून मग गुंतवणूक करा.