उत्पादन घटणार म्हणजे तर भाव वाढणार आणि उत्पादन जास्तीचे आल्यास भाव कमी होणार हे ओघानेच घडणार. शेतकऱ्यांसाठी हे एक अटळ चक्रच बनले आहे. परंतु येत्या काळात ज्या दोन प्रमुख जिनसांबाबत हे घडू घातले आहे, त्यांचे भाव काय असतील याची पूर्वकल्पना सध्या वायदे बाजार देत आहे. तर त्याही पुढे जाऊन त्यात चांगली संधी कशी दडली आहे हेही ते खुणावत आहे..

बघता बघता मोसमी पावसाचे दोन महिने निघून गेले आणि आतापर्यंतची पाऊस पाण्याची परिस्थिती पाहता चिंता वाटण्यासारखी आहे. म्हणजे पहिल्या दोन महिन्यात पावसाची एकंदरीत तूट फार नसली तरी तो बरसण्याच्या प्रमाणात प्रचंड विषमता असल्यामुळे देशातील कित्येक शेतीबहुल भागांमध्ये सरासरीच्या ३०-४० टक्के एवढाच पाऊस झाला आहे. तर कोकण, विदर्भासारख्या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळी पिके धोक्यात आली असून काही ठिकाणी तर पुढील आठवडय़ात पाऊस झाला नाही तर फेरपेरणी करावी लागण्याची शक्यता आहे.  ऑगस्टमध्ये फेरपेरणी खरिपाच्या एकूण उत्पादनावर निश्चितच परिणाम करू शकते.

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
wheat India wheat production estimated at 1120 lakh tonnes this year
यंदा गव्हाचे उच्चांकी उत्पादन? तापमान वाढीची झळ कमी; ११२० लाख टन उत्पादनाचा अंदाज

उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्रामधील मराठवाडय़ाचे देता येईल. सरकारी आकडेवारीच तेथील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १३ टक्के कमी असल्याचे सांगते. प्रत्यक्षात बीड, जालना, औरंगाबाद आणि बुलढाणा या जिल्’ांमध्ये २५ ते ३० टक्क्य़ांची तूट आहे. गुजरातमध्ये तर विचित्र परिस्थिती आहे. हे राज्य एकाचवेळी ओला आणि सुक्या दुष्काळाशी सामना करताना दिसत आहे. निदान हवामान खात्याची आकडेवारी तरी तसे दर्शवत आहे. म्हणजे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये पूर परिस्थिती असताना कच्छमध्ये पावसाची तूट ७५ टक्के एवढी प्रचंड आहे. अहमदाबादमध्ये ही तूट ५६ टक्के, सुरेंद्रनगरमध्ये ५८ टक्के, पाटण आणि मेहसाणामध्ये ती अनुक्रमे ५२ आणि ४८ टक्के एवढी प्रचंड आहे. आंध्र प्रदेशातील कापूस उत्पादन आणि व्यापारपेठ यासाठी प्रसिद्ध असलेल्या अदोनी प्रांतात अशीच परिस्थिती आहे, तर केरळवगळता दक्षिण भारतात काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. हवामान खात्याने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अंदाजाप्रमाणे देशातील एकंदरीत पाऊस सरासरीपेक्षा थोडाच कमी असेल असे म्हटले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या पुढील दोन महिन्यात पावसाची विभागणी बऱ्यापैकी समप्रमाणात असेल असेही म्हटले आहे. गेल्या १५ वर्षांतील अचूकता पाहता हवामान खात्याचे अंदाज खरे ठरो अशी आपण केवळ प्रार्थनाच करू शकतो.

या परिस्थितीत पुढील दोन आठवडे कृषिक्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नगदी पिकांपैकी कापूस पिकासाठी सध्याची परिस्थिती नकारात्मक दिसत आहे. दुष्काळात बारावा महिना म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या आहेत. गेल्या वर्षी या किडीने राज्यातील आणि तेलंगणामधील २५ ते ३० टक्के एवढे कापूस उत्पादन खाऊन टाकल्यामुळे शेतकरी परत एकदा चिंताग्रस्त होणे साहजिकच आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात असल्याची ग्वाही सरकारी यंत्रणांनी तसेच विविध जिल्’ातील व्यापारी सूत्रांनी दिली आहे. असे असले तरी कापूस उत्पादनामध्ये यावर्षी निदान १० टक्के तरी तूट येणार हे नक्की. महाराष्ट्रामध्ये कापसाखालील क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के घटले आहे. शिवाय कमी पावसामुळे पेरलेले क्षेत्र देखील प्रति हेक्टरी किती उत्पादन देईल याबद्दल शंकाच आहे. तीच परिस्थिती गुजरातमध्ये आहे. आंध्र आणि कर्नाटकमधील उत्पादन देखील कमी होऊ शकते. आणि बोंडअळीचा जास्त प्रादुर्भाव झाला तर उत्पादनातील घट वाढूही शकते.

या उलट सोयाबीनचे क्षेत्र गेल्या वर्षीपेक्षा खूप वाढल्यामुळे आणि आपल्याकडे विदर्भ तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सोयाबीनबहुल प्रदेशात चांगला पाऊस झाल्यामुळे उत्पादन चांगले येऊ शकते. आता उत्पादन घटणार म्हणजे कापसाचे भाव वाढणार आणि उत्पादन वाढणार म्हणजे सोयाबीनचे भाव कमी होणार हे ओघानेच आले. पुढील काळामध्ये या दोन कमॉडिटींचे काय भाव असतील याची पूर्वकल्पना आपल्याला वायदा बाजारामध्ये मिळते.

यावर्षी उशीरा पेरणी झाल्यामुळे कापसाचे उत्पादन बाजारात निदान दोन-तीन आठवडे उशिरा येणार आहे. आता जागतिक बाजारामध्ये या वर्षी कापसाची मागणी विक्रमी असणार आहे असा अंदाज नुकताच आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने प्रसिद्ध केला आहे. शिवाय अमेरिकेमध्ये देखील कापूस उत्पादन घटणार असल्याचे अंदाज आहेत. या परिस्थितीत भारतातील कापूस निर्यातदार आणि गिरण्या सध्या धास्तावले आहेत. देशांतर्गत पुरवठय़ाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आणि त्यामुळे होऊ शकण्याऱ्या भाववाढीमुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याकरता होणाऱ्या आगाऊ  निर्यात सौद्यांमध्ये शिथिलता आली आहे. त्यामुळे निदान नोव्हेंबरपर्यंत कापसाचे भाव चढेच राहणार आहेत. त्यानंतर नवीन पिकाचा पुरवठा वाढल्यामुळे भावात थोडी घसरण होऊ शकते. मात्र त्यामुळे परत जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून कापसात दीर्घकालीन तेजी येईल असा अंदाज आहे. या परिस्थितीचे प्रतिबिंब वायदे बाजारात दिसून येते.

वायदा बाजारामध्ये सध्या ऑक्टोबर महिन्याच्या वायद्याचे भाव २४,००० रुपये प्रति गांठ या विक्रमी पातळीवर आहेत. २५,००० रुपयांची पातळी लवकरच दिसू शकेल अशी चिन्हे आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या कंपन्यांनी प्रायोगिक तत्वावर निदान १०० गाठी वायदा व्यवहारात विकून टाकाव्यात. उद्या भाव पडले तरी आपल्या सदस्य शेतकऱ्यांना सध्याचा विक्रमी भाव मिळण्याची १०० टक्के खात्री यामुळे देता येईल.

ऑक्टोबरअखेरीस जेव्हा डिलिव्हरी द्यायची वेळ येईल तेव्हाचे भाव आपल्या विक्री व्यवहारापेक्षा अधिक असतील तर डिलिव्हरी द्यावी, आणि खूप कमी असतील तर डिलिव्हरी देण्याऐवजी आज विकलेल्या १०० गाठींचीच तेव्हा पुनर्खरेदी करावी. यामध्ये विक्रमी विक्रीभाव आणि पडलेला बाजारभाव यामध्ये जेवढा फरक असेल तेवढा नफा शेतकऱ्यांना ताबडतोब मिळेल. शिवाय भाव जेव्हा परत वर जातील तेव्हा तोच कापूस परत वायदे बाजारात विकावा. यामुळे वायदेबाजाराचे फायदे कसे करून घ्यावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षणही मिळेल आणि भविष्यात हाच प्रयोग इतर पिकांसाठी देखील केल्यास, शेतकऱ्यांना रास्त भावांसाठी सरकारच्या कृपेकडे डोळे लावून बसायची आवश्यकता राहणार नाही.

सोयाबीनच्या बाबतीत देखील असेच करता येऊ शकते. पुढील दोन-चार आठवडय़ात सोयाबीनच्या भावाने ३,५००-३,६०० ची पातळी गाठली तर शेतकरी संस्थांमार्फत विक्री करून नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष पीक आले की, डिलिव्हरी द्यावी किंवा भाव पडले असल्यास पुनर्खरेदी करून विक्री आणि पुनर्खरेदीच्या भावातील फरक आपल्या खात्यात आणावा. मात्र प्रत्यक्ष सौदे करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यामुळे वायदा बाजारात अचूक ‘टायमिंग’ साधण्यास मदत होईल.

श्रीकांत कुवळेकर

ksrikant10@gmail.com

(लेखक वस्तू बाजार  विश्लेषक )