28 October 2020

News Flash

थेंबे थेंबे तळे साचे : गुंतवणुकीचा भूगोल बदलूया!

व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीमुळे कुठल्याही गुंतवणूक पर्यायाची प्रसिद्धी फटाफट होते.

तृप्ती राणे

जिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन अर्थात गुंतवणुकीचं भौगोलिक विविधीकरण महत्त्वाचेच, परंतु पुरेशा काळजीनेच..

काही महिन्यांआधी जेव्हा करोनामुळे जागतिक बाजार कोसळले होते, तेव्हा माझ्या एका क्लायंटने त्याचा पोर्टफोलिओचा आढाव्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारला – मॅडम! आपण अमेरिकेत गुंतवणूक करूया का? त्यांचा बाजारपण पडला आहे. शिवाय काही ठिकाणी मी जाहिरात वाचली की, फक्त भारतापुरते मर्यादित न राहता जागतिक पातळीवर जर डायव्हर्सिफिकेशन म्हणजेच विविधीकरण केल्याने जास्त फायदा होईल!

त्यांचा हा प्रश्न अतिशय योग्य वाटला. गुंतवणूक ही गुंतवणूक असते, मग ती आपल्या देशात केली काय किंवा अन्यत्र कुठेही केली काय! काय फरक पडतो? जोवर आपल्याला अपेक्षेनुसार परतावे मिळत आहेत तोवर चालतंय की! काय, बरोबर ना? आजच्या लेखातून भारताबाहेरील गुंतवणुकीबाबत काही गोष्टी समजून घेऊया.

गुंतवणुकीतील विविधीकरण आपण मुळात का करतो, तर जोखीम व्यवस्थापनासाठी! याचं सर्वात सोपं उदाहरण म्हणजे, समभाग आणि रोखे संलग्न म्युच्युअल फंड. शेअर बाजारातील चटके सुसह्य़ करण्यासाठी बॅलन्स्ड फंडांचा वापर म्हणजेच विविधीकरण! कोणत्याही एका प्रकारच्या गुंतवणुकीवर अवलंबून न राहता, जेव्हा आपण रोखे, समभाग, स्थावर मालमता, इत्यादी पर्यायांची सांगड घालतो, तेव्हा आपण विविधीकरण करून पोर्टफोलिओचे जोखीम व्यवस्थापन करतो.

भौगोलिक विविधीकरण म्हणजे, इतर देशातील गुंतवणूक पर्यायांचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये समावेश. मग ते समभाग असोत, किंवा म्युच्युअल फंड, किंवा जमीनजुमला! अमेरिकन/युरोपियन/जपानी कंपन्यांचे शेअर्स, लंडनमध्ये घर, नॅसडॅकवर आधारित इंडेक्स फंड, इतर देशातील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणारे भारतीय फंड (फंड ऑफ फंड्स) हे सगळे गुंतवणूक पर्याय भौगोलिक विविधीकरण म्हणून वापरले जातात. आपल्याकडे तर काही म्युच्युअल फंडसुद्धा इतर देशातील समभाग त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतात.

एक उदाहरण म्हणून आपण अमेरिकेतील समभागातील गुंतवणुकीचे घेऊया. आपल्याला अमेरिकेतील बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करता येते. यासाठी वेगळे प्लॅटफॉर्म बाजारात उपलब्ध आहेत. ज्यांना थेट गुंतवणूक करायची नसेल, ते म्युच्युअल फंडांचा वापर करू शकतात. यामध्ये मग निर्देशांक (एस अँड पी ५००, नॅसडॅक, इ. ), किंवा समभाग निगडित गुंतवणूक होऊ शकते. समभाग निगडित गुंतवणुकीमध्येसुद्धा प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे आयसीआयसीआय प्रु. यूएस ब्लूचिप फंड – अग्रेसर अमेरिकी कंपन्यांचा फंड. दुसरा प्रकार म्हणजे फ्रँकलिन इंडिया फीडर फंड – या फंडाची गुंतवणूक फ्रँकलिन यूएस अपॉच्र्युनिटीज फंडामध्ये आहे. या दोन प्रकारच्या फंडांची यादी (१०० कोटी रुपयांच्या वर मालमत्ता असणारे फंड) खालील तक्त्यामध्ये दिलेली आहे.

तिसऱ्या प्रकारामध्ये भारतीय म्युच्युअल फंडांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये भारतातील कंपन्यांबरोबर इतर देशातील कंपन्या बाळगता येतात. उदाहरण म्हणजे – पराग पारिख लाँग टर्म इक्विटी फंड. हे सर्व प्रकार वेगळे असल्यामुळे गुंतवणूकदाराला त्याबाबतीत व्यवस्थित माहिती मिळवून त्यानुसार निर्णय घ्यायला हवा.

कोणतीही गुंतवणूक करताना आपण तिचे चार पैलू तपासतो – सुरक्षितता (सेफ्टी), रोकड सुलभता (लिक्विडिटी), जोखीम (रिस्क), कर कार्यक्षमता (टॅक्स एफिशियन्सी). आपल्या देशात जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपल्याला बरीच माहिती सहज मिळत असते. परंतु जेव्हा आपण इतर देशातील गुंतवणुकीबद्दल विचार करतो तेव्हा हे चार पैलू तपासताना परदेशी अर्थव्यवस्थेचासुद्धा विचार करावा लागतो. तिथे असणारे व्याज दर, सरकारची धोरणे, महागाई, शिवाय विनिमय दर या सर्व बाबींकडे लक्ष द्यायला लागतं. शिवाय, या गुंतवणुकीसाठी आपल्याला कोणते कर नियम लागू होतात – आपल्या देशात आणि दुसऱ्या देशात हेसुद्धा नीट ध्यानात घ्यायला हवं. या सर्व गोष्टींमुळे अशा प्रकारच्या गुंतवणुकीतून नक्की किती परतावे मिळतील याचा अंदाज बांधणं जरा जास्त क्लिष्ट होतं. आणि म्हणून ही गुंतवणूक जास्त जोखमीची वाटते. शिवाय फेमा आणि प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीसुद्धा नीट समजून मग हे व्यवहार झाले तर ठीक. नाही तर चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला व्हायचं!

आज डिजिटायझेशनमुळे गुंतवणूक करणं खूप सोपं झालं आहे. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार आला दिवस आपल्याला मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर दिसत असतात. शिवाय व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीमुळे कुठल्याही गुंतवणूक पर्यायाची प्रसिद्धी फटाफट होते. तेव्हा, या भडिमारातून बाहेर पडून, जरा शांत चित्ताने विचार करून मग निर्णय घेणं गरजेचं झालं आहे. मुळात किरकोळ गुंतवणूकदाराने या फंदात पडू नये असं माझं मत आहे. परंतु जर जोखीम समजून आणि नियम राखून गुंतवणूक करता येत असेल तर यातून चांगल्या प्रकारे जोखीम व्यवस्थापन होऊन परतावे मिळू शकतात. तेव्हा नीट समजून मगच गुंतवणूक करा.

महत्त्वाची सूचना : या लेखामध्ये कोणत्याही म्युच्युअल फंडाची शिफारस केलेली नाहीये. वाचकांनी गुंतणवूक करण्यापूर्वी स्वत:ची आर्थिक ध्येयं ठरवून, जोखीम क्षमता तपासून, गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन मगच निर्णय घ्यावा.

लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

trupti_vrane@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2020 12:03 am

Web Title: article about investment information zws 70
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : दीर्घावधीसाठी धारणेचे उमदे व्यवसाय क्षेत्र
2 माझा पोर्टफोलियो : मुबलक तरलता, अनावर उत्साह!
3 अर्थ वल्लभ : उदयोन्मुख मल्टिकॅप
Just Now!
X