सहा वर्षांपूर्वी कंपनीसाठी जेवढी गुंतवणूक केली तीवर अक्षरश: पाणी फेरले गेले. निर्मिती प्रकल्पात २०१६ अखेरीस पुराचे पाणी साचून अतोनात नुकसान झाले होते. तर पुढे नुकसानभरपाईची प्रक्रियाही केवळ तांत्रिक कारणास्तव खोळंबली. दोन वर्षांनंतर सारे काही सुरळीत होऊ  पाहत होते, तोच पुन्हा टाळेबंदीच्या रूपात नवीन आव्हान उभे राहिले. त्यातून सावरायला पुन्हा तेवढाच विलंब लागला. आता मात्र उद्योग रुळावर येण्याची चिन्हे प्रत्यक्षात दिसू लागली आहेत.

अ‍ॅपेक्स पेपीयर या पुण्यातील कंपनीच्या संस्थापिका मेघना हालभावी म्हणतात तसे, ‘‘ये हौसला कैसे रूके..’’

अ‍ॅपेक्स पेपीयर ही त्यांची कंपनी कागदाचे कोरे, कागदाच्या नळ्या, कागदी कॅन, संमिश्र कॅन, पेपर पॅलेट तयार करते. पेपर टय़ूब उत्पादनेदेखील बनवते. कागदाच्या नळ्या वेगवेगळ्या आकारांत, रंगांमध्ये आणि शैलींमध्ये, तयार प्रिंट आणि लेबल करू देते. सारांशात प्लास्टिकला पर्याय देऊन ही कंपनी इको फ्रेंडली पेपर टय़ूब्स बनवते. यात विविध औद्योगिक गरजांची पूर्तता असते आणि टेक्स्चरायझिंग/ट्विस्टिंग, पीओवाय बॉबिन्स, ओपन एंड स्पिनिंग, डेनिमचे पॅकिंग, कारपेट, फर्निशिंग फॅब्रिक्स, बीओपीपी फिल्म्स, मल्टी-प्लाय फिल्म, अ‍ॅल्युमिनियम फॉइल, सबमर्सिबल पंप पॅकिंग वगैरे. निर्मिती प्रक्रियेस कच्च्या मालापासून वेष्टन आणि प्रेषण यंत्रापर्यंतचे सर्व काही कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेद्वारे परीक्षित आहे.

अ‍ॅपेक्सच्या मेघना यांचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते; परंतु आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय प्रवेश टाळला आणि स्वत:ची पॅथॉलॉजी लॅब सुरू करण्याच्या मनीषेने मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आर्थिक अडचणींवर मात करीत ते शिक्षण पूर्ण केले. लॅब असिस्टंट, वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काही काळ नोकरी केली. प्रसूतीनंतर खासगी रोजगार कार्यालयात नोकरी मिळाली. फिजिकल फिटनेस अभ्यासक्रमाच्या आधारावर जिम ट्रेनर म्हणून व्यायामशाळेत नोकरी केली. पतीच्या व्यवसायात सेल्स को-ऑर्डिनेटरही म्हणून काम केले. नंतर राजीनामा देऊन विपणन विषयात एमबीए केले. नियमित शिक्षणानंतर जवळपास एका तपानंतर हे पुढचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर दोन कंपन्यांमध्ये विपणन कार्यकारी म्हणून काम केले. मात्र स्वत:ची ओळख निर्माण करण्याची ओढ, अधुऱ्या राहिलेल्या स्वप्नाने पुन्हा अस्वस्थ केले. स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे निश्चित केले. पती विवेक यांनी कच्चा माल म्हणून आवश्यक असलेल्या पेपर टय़ूब तयार करण्याचे सुचविले. मेघना सांगतात, ‘‘मी पेपर टय़ूब मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला. पेपर टय़ूबबद्दल, कच्च्या मालाबद्दल, यंत्रणाबद्दल, उत्पादन प्रक्रियेबद्दल, बाजाराबद्दल माहिती घेतली. माल खरेदी, यंत्र आदींसाठी प्राइम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम (पीएमईजीपी) अंतर्गत पुण्याच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या मदतीने मार्च २०१० मध्ये युनिट सुरू केले.

मिटकॉनकडून महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अन्नपूर्णा परिवारचा राज्यशास्त्र पुरस्कार, फलटणच्या जैन सोशल, लायन-लायनेस ग्रुपकडून महिला उद्योजक पुरस्कार, इनोव्हेशन ग्रुप, पुणेकडून उद्योजक पुरस्कार, फलटणमधील तेजस्विनी पुरस्कार, प्रवीण मसालेचा उद्योग जानी कमल पुरस्कार असे आपल्या उद्यम कर्तबगारीसाठी मेघना यांनी विविध बहुमान पटकावले आहेत. कंपनीला पुन्हा पूर्वपदावर आणण्यापेक्षा पुढे नेणे, निर्यातीबरोबरच अन्य उत्पादन क्षेत्रात शिरकाव करण्याचे ध्येय मेघना बाळगून आहेत.

मेघना सांगतात, ‘‘शून्य अनुभव आणि शून्य ज्ञानाने सुरुवात झाली होती. पण मला माझ्याबद्दल खूप विश्वास होता. शून्य माझ्यासाठी संधी आहे. माझा पहिला ग्राहक माझ्या पतीचीच कंपनी होती, शून्याला भेदून पुढे नेणारी. आता अ‍ॅपेक्स २० ग्राहकांना साहित्य पुरवीत आहे. स्थापनेच्या पहिल्याच वर्षांत कंपनीची उलाढाल ३७.५६ लाख रुपये झाली. तिसऱ्या वर्षांत तिने एक कोटी रुपयांचा टप्पा गाठला. सुप्रीम इंडस्ट्रीज, प्रेसिजन कॅमशाफ्ट्स, कल्याणी फोर्ज, बजाज ऑटो आदी अ‍ॅपेक्सच्या ग्राहक कंपन्या आहेत.’’

‘‘आम्हा सर्वासाठी आमच्या कामातूनच प्रेरणा आणि विश्वास मिळत गेला आहे,’’ असे मेघना भालीवाल अभिमानाने नमूद करतात. कौशल्य आणि यंत्रांच्या साहाय्याने आम्ही केवळ दर्जेदार पेपर टय़ूब बनवत नाही तर आम्ही व्यवसायाच्या गरजेनुसार उच्च प्रतीचे, प्रभावी पेपर टय़ूबिंग सोल्यूशन्स देतो. आम्ही स्वस्त किमतीत सुसंगत गुणवत्तेची उत्पादने वितरित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. अ‍ॅपेक्समध्ये संशोधन आणि विकास ही एक सततची प्रक्रिया आहे. त्यात वारंवार अभिप्राय आणि मूल्यवान ग्राहकांकडून येणारे अभिप्राय आणि टिप्पण्या यावर लक्ष केंद्रित केले जाते, असे त्या सांगतात.

मेघना यांनी आलेल्या कटू अनुभवांनाही उजाळा दिला. त्या सांगतात, ‘‘यातून नेमके कळले की आपले कोण ते. अपयशी ठरले म्हणून काहींनी माझा उद्योग हिसकावण्याचा, तो ठप्प पाडण्याचा प्रयत्नही केला. पण मला माझ्या फिनिक्स भरारीवर विश्वास होता. आणि मी ठाम होते. अगदी ‘मेरी झाँसी नही दूंगी’सारखी.. माझ्या कुटुंबाने, काही मित्र, बँक-वित्त संस्थांचे अधिकारी, नियामक यंत्रणा, अगदी स्पर्धकांनीही मला यादरम्यान साथ दिली.’’

मेघना यांच्या मते, ‘‘माणसाने स्वत:वर विश्वास ठेवावा. अनेकदा अपेक्षितांकडून सहकार्य मिळेलच असे नाही. पण आपण आपल्या मतांवर ठाम राहून तशी पावले टाकायला हवीत.’’

मेघना यांच्या ब्रीदानुसार, परिस्थिती    बदलता येत नसेल तर मन:स्थिती बदलावी.. प्रत्येक रात्रीनंतर पहाट ही येणारच असते.   प्रवास नेहमीच पहाटेच्या दिशेने सुरू राहायला हवा.

मेघना हालभावी संस्थापक, मुख्याधिकारी, अ‍ॅपेक्स पेपीयर

* व्यवसाय  :  स्पायरल पेपर टय़ूब निर्मिती

* कार्यान्वयन  :  २०१० साली

* प्राथमिक गुंतवणूक : १५  लाख रुपये

* सध्याची उलाढाल     : वार्षिक  ८० लाख रुपये

* कर्मचारी संख्या  :  १५ ते २०  नियमित

– वीरेंद्र तळेगावकर

* लेखक ‘लोकसत्ता’चे मुंबईस्थित व्यापार प्रतिनिधी

veerendra.talegaonkar@expressindia.com

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल : arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.