अजय वाळिंबे
या स्तंभातून नियमित येत असलेल्या आपल्या पोर्टफोलियोच्या दुसऱ्या तिमाहीचा अथवा एकंदर सहामाहीचा आढावा घेतला तर एकूण २६,२३८ रुपयांची गुंतवणूक (प्रत्येकी एक समभाग खरेदी केल्याचे धरल्यास) आठ टक्क्य़ांच्या नफ्यासह २८,३४३ रुपयांवर गेली आहे. तर याच कालावधीत आपल्या पोर्टफोलियोचा ‘आयआरआर’ ३८.३४ टक्के आहे. म्हणजे सध्याच्या कालावधीत ही कामगिरी तशी सरसच म्हणावी लागेल. गंमत म्हणजे मार्च महिन्यापासून सुचविलेले सर्वच शेअर्स एखादा अपवाद वगळता नफ्यातच आहेत.
खरं तर नवीन आर्थिक वर्षांची (२०२०-२१) सुरुवात ही करोना आपत्तीसह झाल्याने अत्यंत खडतरच राहिली आहे. मात्र तरीही शेअर बाजारात गेले काही दिवस उत्साहाचेच वातावरण आहे. हे वातावरण अजून किती टिकेल हे येणारा काळच ठरवेल. नवीन आर्थिक वर्षांची पहिली तिमाही टाळेबंदीत गेल्याने जुलै महिन्यात जाहीर होणारे निकाल निराशाजनकच असणार आहेत. करोना आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर देशाचे सार्वभौम मानांकन घसरले आहेच; परंतु त्याच बरोबर बेरोजगारी, अनुत्पादित कर्जे आणि आजारी बँका, वाढत्या वित्तीय तुटीचे आव्हान, भारताची खालावलेली आर्थिक परिस्थिती आणि आता सीमेवर असलेले युद्धसदृश वातावरण यामुळे आपली आर्थिक घडी बसायला बराच काल जावा लागणार आहे. त्यामुळे विद्यमान आणि आगामी वर्षही बिकट असणार आहे. यंदा आपल्या आर्थिक प्रगतीचा दर उणे दोन टक्क्य़ांपर्यंत अपेक्षित असून सध्या जागतिक मंदीच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच परिस्थितीचे भान ठेवून गुंतवणूक करणे अभिप्रेत आहे.
आतापर्यंत सुचविलेले सगळेच शेअर्स राखून ठेवण्यासारखे किंवा अजूनही खरेदी करण्यासारखेच आहेत. मात्र पोर्टफोलियोतून सातत्याने सुचविल्याप्रमाणे खरेदी/ विक्री टप्प्याटप्प्याने चालू ठेवा. शेअर बाजाराचे हेलकावे पाहता अल्पावधीत १५-२० टक्के परतावा मिळत असल्यास फायदा पदरात पडून घेऊन तेच शेअर्स पुन्हा खालच्या भावात खरेदी करण्याचे धोरण अनुभवी आणि जाणकार गुंतवणूकदारांना फायद्याचे ठरू शकते. व्याजदर कमी होत असतानाच लाभांशाचा परतावा तपासणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, सध्या पीटीसी इंडियाचा शेअर ५० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे, कंपनीने नुकताच ५५ टक्के (प्रति शेअर ५.५० रुपये) लाभांश जाहीर केला आहे. म्हणजेच ५,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन महिन्यांत लाभांशाद्वारे ५५० रुपये (११ टक्के) परतावा मिळेल. शेअर बाजारात खरेदीची संधी येतच असते आणि संयम हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे लक्षात ठेवा.
पोर्टफोलियोचा जून २०२० अखेपर्यंत सहामाही आढावा