News Flash

अर्थ वल्लभ : अस्थिर काळातील भरवशाचा सोबती

रोखे काय किंवा समभाग काय, दोन्ही साधनांबाबत सुरक्षिततेची चिंता आहे.

संग्रहित छायाचित्र

वसंत माधव कुळकर्णी

बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड

करोना साथीच्या आजारामुळे जगभरातील भांडवली गुंतवणुकीवरील परताव्याला ओहोटी लागली आहे. मागील वर्ष-दोन वर्षांत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या बाबतीत घडलेल्या घटनांनी नव्याने गुंतवणूक करू इच्छिणारे गुंतवणूकदार चिंताक्रांत झाले आहेत. रोखे काय किंवा समभाग काय, दोन्ही साधनांबाबत सुरक्षिततेची चिंता आहे. रोखे गुंतवणुकीत नवगुंतवणूकदारांना मुख्यत्वे दोन प्रकारची भीती असते. पहिली व्याज आणि मुद्दल वेळेवर परत मिळण्याची आणि दुसरी व्याजदर वाढण्याची. पहिल्या प्रकाराला ‘क्रेडिट रिस्क’ असे म्हणतात, तर दुसऱ्या प्रकाराला ‘डय़ुरेशन रिस्क’ असे म्हणतात. यापैकी केंद्र सरकारचे रोखे ज्याला ‘जी-सेक’ असे म्हणतात ते सर्वात सुरक्षित समजले जातात. या प्रकारच्या रोखे गुंतवणुकीत क्रेडिट रिस्क नसते. मागील वर्ष-दोन वर्षांत रोखे गुंतवणुकीशी संबंधित घटना या क्रेडिट रिस्कसंबंधित होत्या; परंतु असासुद्धा एक फंड प्रकार आहे ज्यात बँका  आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यांच्या रोख्यांत गुंतवणूक केली जाते जे रोखे ‘जी-सेक’इतकेच सुरक्षित असतात. या रोख्यांवर देय असलेले व्याज आणि रोख्यांच्या मुदतीअंती मुद्दल परत करण्याची जबाबदारी या कंपन्यांचे मालक या नात्याने केंद्र सरकारची असल्याने या प्रकारच्या रोख्यांना आभासी सरकारी रोखे (क्वासी जीसेक) असेही म्हटले जाते. त्यामुळे पत घसरण किंवा वेळेवर व्याज आणि मुदतीअंती मुद्दल परत न मिळण्याचा धोका नसलेला फंड प्रकार म्हणजे ‘बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड’ होय. त्यामुळे ‘माझ्या गुंतवणुकीची अवस्था क्रेडिट रिस्क फंडांतील गुंतवणुकीसारखी होईल,’ अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. अन्य रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंड गटांच्या तुलनेत बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंड सर्वोच्च पत असलेल्या आणि रोकडसुलभ रोख्यांत गुंतवणूक करतात. मे २०२०च्या म्युच्युअल फंडांची विवरणिका (फंड फॅक्ट शीट) असे दर्शविते की, पत गुणवत्तेची तुलना केली असता बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांनी गुंतवणूक असलेल्या रोख्यांची सरासरी मुदत (अ‍ॅव्हरेज मॅच्युरिटी) एका वर्षांपेक्षा अधिक राखली आहे. बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांची सर्वोच्च पत असलेल्या रोख्यांत (रोकड + रेपो गुंतवणूक + जी-सेक आणि एसडीएल + ‘एएए’ पत असलेले सार्वजनिक मालकीच्या कंपन्यांचे रोखे) गुंतवणुकीचे प्रमाण ९२ टक्के आहे. बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांनी सर्वोच्च पत असलेल्या रोख्यांत केलेल्या गुंतवणुकीचे प्रमाण मीडियम डय़ुरेशन, डायनॅमिक बाँड, मीडियम अ‍ॅण्ड शॉर्ट डय़ुरेशन, शॉर्ट डय़ुरेशन या फंड गटातील फंडांनी सर्वोच्च पत असलेल्या रोख्यांत केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणापेक्षा खूपच अधिक आहे.

या फंड गटाच्या गुंतवणुकीचे अधिक सखोल विश्लेषण केले असता असे दर्शविते की, पतनिश्चिती संस्थांनी ‘नकारात्मक’ किंवा ‘संभाव्य नकारात्मक’ असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या रोखे प्रकारात कमीत कमी गुंतवणूक आहे. या प्रकारचे सर्वाधिक रोखे ‘क्रेडिट रिस्क फंड’ आणि ‘लाँग टर्म डेट फंड’ या फंड प्रकारात आढळले. सामान्य स्थितीत फारसे महत्त्व नसलेल्या परंतु अस्थिरतेच्या कालावधीत रोकड सुलभता फारच महत्त्वाची असते. सामान्यपणे रोखे निधी व्यवस्थापक असे मानतात की, रोख्यांच्या परताव्याच्या दरात (वायटीएम) रोकड सुलभतेचा मोठा वाटा असतो. अधिक विस्तृतपणे सांगायचे तर सध्याच्या अस्थिर वातावरणात रोकडसुलभ रोख्यांत गुंतवणूक असलेल्या फंडाचा परतावा अधिक निश्चित असतो. ‘लोकसत्ता – कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीसाठी विकसित केलेल्या गुंतवणुकीच्या रोकडसुलभतेचे विश्लेषण करणाऱ्या प्रणालीनुसार अन्य फंड गटांच्या रोकडसुलभ रोख्यांच्या ८४.९५ टक्के सरासरीच्या तुलनेत बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडातील रोकडसुलभ रोख्यांचे सरासरी प्रमाण ९४.२९ टक्के आहे. साहजिकच रोकडसुलभ रोख्यांना मिळणाऱ्या अधिमूल्याचा फायदा या फंड गटाला होत राहील. तेव्हा ‘क्रेडिट रिस्क’ ही भीती या फंड प्रकारातील गुंतवणूकदारांना बाळगण्याचे करण नाही.

रोखे गुंतवणुकीतील दुसरा धोका म्हणजे व्याजदर वर जाण्याचा. रोखे निधी व्यवस्थापक ‘डय़ुरेशन रन डाऊन’ या रणनीतीचा अवलंब करतात. या रणनीतीची विस्तृत चर्चा अर्थवृत्तान्त, २२ जूनच्या लेखात केली आहे. महिन्यांगणिक रोख्यांची उर्वरित मुदत कमी होत असल्याने आणि हे रोखे मुदतपूर्तीआधी विकत नसल्याने व्याजदर वाढल्यामुळे बाजारमूल्य कमी होण्याचा धोका नसतो. मीडियम डय़ुरेशन, डायनॅमिक बाँड, मीडियम अ‍ॅण्ड शॉर्ट डय़ुरेशन, शॉर्ट डय़ुरेशन या फंड गटापेक्षा ३० जूनच्या ‘एनएव्ही’नुसार १, ३, ५, आणि ७ वर्षे कालावधीसाठीचा बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांचा परतावा उत्साहवर्धक आहे. अधिक खोलात जाऊन विश्लेषण केले असता हे फंड व्याजदर कपातीचे लाभार्थी ठरले असले तरी गत काळातील भांडवली लाभाला न भूलता मुदलाची सुरक्षितता आणि कर कार्यक्षमतेचा विचार करून मुदलाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत भरवसा ठेवता येईल अशा बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांची आजची शिफारस आहे.

रोखे गुंतवणुकीत उच्च धनसंपदा बाळगणारे गुंतवणूकदार अधिक असतात. रोखे फंडांच्या बाबतीत घडलेल्या अनियमिततेने उच्च धनसंपदा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना फंड भेद (प्रॉडक्ट डिफरन्सिएशन) शिकवला. रोखे गुंतवणुकीतसुद्धा लिक्विड फंडांसारखे सुरक्षित आणि क्रेडिट रिस्क फंडांसारखे साहसी फंड प्रकार असतात. गुंतवणूक करताना हा भेद लक्षात न घेतल्याने अपेक्षाभंगाचे दु:ख या गुंतवणूकदारांच्या वाटय़ाला आले. मागील वर्षभरातील कर्जफेडीतील अनियमितता आणि पत खालावण्याच्या प्रसंगांमुळे गुंतवणूकदार रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या वाटेला जाण्याच्या मन:स्थितीत नसले तरी, चाणाक्ष गुंतवणूकदारांनी हा फंड भेद लक्षात घेऊन आधीपासून बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडात मोर्चेबांधणी केली आहे.  याच भूमिकेतून या आधी तीन वेगवेगळ्या बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांची शिफारस केली होती. मागील वर्षभराच्या अस्थिर वातावरणात ज्या कोणी शिफारस केलेल्या बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडात गुंतवणूक केली असेल ते या गुंतवणुकीची रसाळ फळे नक्कीच चाखत आहेत. मागील वर्षभरात रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांना हादरे बसले तरी बँकिंग अ‍ॅण्ड पीएसयू डेट फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) सातत्याने वाढ झाली आहे. ‘सेबी’ने निश्चित केलेल्या फंड गटांपैकी या वर्गात सर्वाधिक मालमत्ता वाढ झाल्याचे आकडेवारी सांगत आहे. या फंड गटातील व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा वृद्धिदर अन्य रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या वृद्धिदरापेक्षा दुप्पट आहे. सध्याच्या अस्थिर कालखंडात या गुंतवणूक साधनाची नव्याने शिफारस.

shreeyachebaba@gmail.com

*   म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:55 am

Web Title: article on reliable companion in volatile times banking and psu debt fund abn 97
Next Stories
1 क.. कमॉडिटीचा : विक्रमी खरीप पेरण्या धोकादायक वळणावर
2 बंदा रुपया : संरक्षण सज्जतेत खारीचा वाटा
3 कर बोध : पुन्हा मुदतवाढ..
Just Now!
X