07 July 2020

News Flash

कर बोध : विवरणपत्र कोणी-कोणता फॉर्म भरावा?

२०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी (२०२०-२१ करनिर्धारण वर्षांसाठी) विवरणपत्राचे फॉर्म १ ते ७ सूचित करण्यात आलेले आहेत.     

संग्रहित छायाचित्र

प्रवीण देशपांडे

करदात्याने आर्थिक वर्षांत केलेल्या व्यवहारांची माहिती देण्याचे साधन म्हणजे विवरणपत्र. यामध्ये प्रामुख्याने मिळालेले उत्पन्न, तोटा, वजावटी, उत्पन्नावर भरावा लागणारा कर, कर परतावा (रिफंड) वगैरेंची माहिती करदात्याला विवरणपत्रात द्यावी लागते. करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या प्रकारानुसार, उत्पन्नाच्या रकमेनुसार किंवा इतर निकषाच्या आधारे कोणत्या फॉर्ममध्ये विवरणपत्र दाखल करावयाचे हे ठरवावे लागते. २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी (२०२०-२१ करनिर्धारण वर्षांसाठी) विवरणपत्राचे फॉर्म १ ते ७ सूचित करण्यात आलेले आहेत.

*  विवरणपत्र कोणी भरावे :

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांचे (एचयूएफ) एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. करदात्यांच्या प्रकारानुसार कमाल करमुक्त मर्यादा अशी आहे : १) वैयक्तिक करदात्याचे वय ६० वर्षांपेक्षा कमी / एचयूएफ – २,५०,००० रु. २) वैयक्तिक करदात्याचे वय (निवासी भारतीय) २०१९-२० आर्थिक वर्षांमध्ये केव्हाही ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आणि ८० वर्षांपेक्षा कमी – ३,००,००० रु. आणि ३) वैयक्तिक करदात्याचे वय (निवासी भारतीय) २०१९-२० आर्थिक वर्षांमध्ये केव्हाही ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त – ५,००,००० रुपये.

बऱ्याच करदात्यांची समजूत असते की कोणताही कर देय नसेल तर विवरणपत्र भरले नाही तरी चालते. हे बरोबर नसून विवरणपत्र भरण्यासाठी निकष उत्पन्नाचा आहे, देय कराचा नाही. करदात्यांनी आपले उत्पन्न तपासून बघावे, करदात्याचे एकूण उत्पन्न, कलम ८०सी, ८०डी, ८०जी, ८०टीटीए वगैरे कलमांच्या वजावटी घेण्यापूर्वी वर दर्शविलेल्या कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. ज्या करदात्यांनी संपत्तीची विक्री करून भांडवली नफा झाल्यानंतर ५४, ५४बी, ५४डी, ५४ईसी, ५४एफ वगैरे कलमानुसार गुंतवणूक करून वजावट घेतली असल्यास आणि या वजावटींपूर्वीचे उत्पन्न वरील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या करदात्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

ज्या करदात्यांचे उत्पन्न वर दर्शविलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्याने विवरणपत्र भरणे अनिवार्य नाही अशा निवासी भारतीयांची भारताबाहेर संपत्ती असेल किंवा भारताबाहेरील संपत्तीत फायदेशीर मालकी असेल किंवा भारताबाहेरील खात्यात सही करण्याचा अधिकार असेल तर त्या करदात्याला विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० पासून विवरणपत्र भरण्याच्या निकषांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ज्या करदात्यांचे उत्पन्न वर दर्शविलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे विवरणपत्र भरणे अनिवार्य नाही, परंतु त्यांनी आर्थिक वर्षांत खालील व्यवहार केलेले असतील तर त्यांना विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

१. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या चालू खात्यात रोखीने जमा केली असल्यास, किंवा

२. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या परदेश प्रवासासाठी खर्च केले असल्यास (या प्रवासात सूचित केलेल्या शेजारी देशात किंवा तीर्थयात्रेसाठी प्रवासाचा समावेश नाही), किंवा

३. एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वीज बिलापोटी खर्च केली असल्यास.

जे करदाते केवळ या नवीन निकषानुसार विवरणपत्र भरणार असतील त्यांना विवरणपत्रात या व्यवहाराची रक्कमसुद्धा भरावी लागेल. करदाता जर उत्पन्नाच्या निकषानुसार विवरणपत्र भरत असेल तर त्याला या व्यवहारांची रक्कम  विवरणपत्रात भरणे गरजेचे नाही.

अशा प्रकारच्या तरतुदी ३१ मार्च २००५ पूर्वीही लागू होत्या. त्या वेळी ठरावीक क्षेत्रफळापेक्षा जास्त क्षेत्रफळाची स्थावर मालमत्ता, चारचाकी असल्यास किंवा परदेश प्रवास केल्यास विवरणपत्र भरण्याच्या तरतुदी होत्या. नवीन तरतुदींमुळे विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत यंदा वाढ होईल.

ज्या करदात्याला वरील तरतुदींमुळे विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे आणि त्याने ते मुदतीत भरले नाही तर त्याला विलंब शुल्क भरावे लागते.

विवरणपत्र कोणत्या फॉर्ममध्ये भरावे :

करदात्यांनी योग्य विवरणपत्राच्या फॉर्मची निवड करणे गरजेचे आहे. विवरणपत्र कोणत्या फॉर्ममध्ये भरावे हे करदात्याच्या उत्पन्नावरून, निवासी दर्जा, कंपनीत संचालक आहे का, नोंदणीकृत नसलेल्या कंपनीचे शेअर्स असणे यावर अवलंबून असते. करदात्याने त्याच्या दर्जानुसार, उत्पन्नानुसार योग्य तो फॉर्म निवडावा. वैयक्तिक करदात्यांना भराव्या लागणाऱ्या फॉम्र्ससंबंधीची माहिती खालीलप्रमाणे :

* फॉर्म १ :

०   कोणाला भरता येतो : हा फॉर्म वैयक्तिक निवासी भारतीय करदात्यांसाठी आहे. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि फक्त वेतन किंवा निवृत्तिवेतनाचा, एका घरापासूनच्या उत्पन्नाचा आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे अशांना या फॉर्ममध्ये विवरणपत्र भरता येते. ज्या करदात्याच्या उत्पन्नात इतर व्यक्तींचे उत्पन्न मिसळले जात असेल तर (उदा. पती/पत्नी, अजाण मुलगा/ मुलगी वगैरे) त्याचे उत्पन्नसुद्धा वरील उत्पन्नाच्या स्रोतापासूनच असले पाहिजे.

०   कोणाला भरता येत नाही : करदाता कोणत्याही कंपनीत संचालक (डायरेक्टर) असेल किंवा त्याच्याकडे २०१९-२० या आर्थिक वर्षांत कधीही सूचिबद्ध नसलेल्या कंपन्याचे शेअर्स असतील किंवा भारताबाहेर संपत्ती किंवा भारताबाहेरील संपत्तीत आर्थिक स्वारस्य असेल किंवा करदाता भारताबाहेरील खात्यात अधिकृत सही करणारा असेल किंवा करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असेल तर त्या करदात्यांना विवरणपत्राचा फॉर्म १ हा भरता येत नाही.

०   कोणत्या उत्पन्नासाठी भरता येत नाही : ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश आहे, एकापेक्षा जास्त घरांपासून उत्पन्न आहे, भांडवली नफ्यापासून उत्पन्न आहे, इतर उत्पन्नांत लॉटरीचे उत्पन्न किंवा शर्यतीच्या घोडय़ांची मालकी आणि देखभाल यापासून उत्पन्न आहे किंवा पाच हजार रुपयांपेक्षा जास्त शेतीचे उत्पन्न असेल तर त्या करदात्यांना विवरणपत्राचा फॉर्म १ हा भरता येत नाही. याशिवाय करदात्याचा कोणत्याही प्रकारचा मागील वर्षांचा तोटा किंवा या वर्षीचा तोटा पुढील वर्षांत ‘कॅरी फॉरवर्ड’ करावयाचा असल्यास हा फॉर्म भरता येत नाही.

०  जे करदाते घरामध्ये संयुक्त मालक आहेत त्यांना विवरणपत्राचा फॉर्म १ आणि फॉर्म ४ भरता येत नाही असे जानेवारी २०२० मध्ये सूचित केले होते. अशा करदात्याला हा सोपा फॉर्म भरता यावा म्हणून ही अट आता शिथिल करण्यात आली आहे. तसेच २०१९-२० पासून लागू करण्यात आलेल्या नवीन निकषानुसार (एक कोटी पेक्षा जास्त रक्कम  बँकेच्या चालू खात्यात जमा किंवा दोन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च परदेश प्रवास किंवा एक लाख रुपयांपेक्षा वीज बिलावर खर्च) जे करदाते विवरणपत्र दाखल करणार आहेत अशांना विवरणपत्राचा फॉर्म १ आता भरता येईल.

* फॉर्म २ :

हा फॉर्म वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब या करदात्यांसाठी आहे. ज्या करदात्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असेल तर हा फॉर्म भरता येत नाही. ज्या करदात्यांना फॉर्म १ लागू होत नाही असे करदाते फॉर्म २ भरू शकतात. म्हणजेच करदाता कोणत्याही कंपनीत डायरेक्टर असेल किंवा करदात्याकडे २०१९-२० या आर्थिक वर्षांत कधीही सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा करदात्याकडे भारताबाहेर संपत्ती किंवा त्याला भारताबाहेरील संपत्तीत आर्थिक स्वारस्य असेल किंवा करदाता भारताबाहेरील खात्यात अधिकृत सही करणारा असेल तर किंवा करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असेल तर ते हा फॉर्म भरू शकतात.

* फॉर्म ३ :

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश होतो त्या करदात्यांना फॉर्म ३ मध्ये विवरणपत्र भरावे लागेल.

*  फॉर्म ४ :

कोणाला भरता येतो : हा फॉर्म वैयक्तिक, हिंदू अविभक्त कुटुंब, भागीदारी संस्था (एलएलपी सोडून) ज्यांचा निवासी दर्जा भारतीय आहे अशा करदात्यांना भरता येतो. ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि फक्त वेतन किंवा निवृत्तिवेतनाचा, एका घरापासूनच्या उत्पन्नाचा आणि इतर उत्पन्नाचा समावेश आहे आणि धंदा-व्यवसायातील उत्पन्नावर अनुमानित कर भरत असेल तर हा फॉर्म भरता येतो. ज्या करदात्याच्या उत्पन्नात इतर व्यक्तींचे उत्पन्न मिसळले जात असेल तर (उदा. पती/पत्नी, अजाण मुलगा/मुलगी वगैरे) त्यांचे उत्पन्नसुद्धा वरील उत्पन्नाच्या स्रोतापासूनच असले पाहिजे.

कोणाला भरता येत नाही : करदाता कोणत्याही कंपनीत संचालक (डायरेक्टर) असेल किंवा २०१९-२० या आर्थिक वर्षांत कधीही सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे शेअर्स असतील किंवा करदात्याकडे भारताबाहेर संपत्ती किंवा भारताबाहेरील संपत्तीत आर्थिक स्वारस्य असेल किंवा करदाता भारताबाहेरील खात्यात अधिकृत सही करणारा असेल किंवा करदात्याचे भारताबाहेर उत्पन्न असेल तर त्या करदात्यांना विवरणपत्राचा फॉर्म ४ भरता येत नाही.

कोणत्या उत्पन्नासाठी भरता येत नाही : ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश आहे (अनुमानित कराव्यतिरिक्त), एकापेक्षा जास्त घरांपासून उत्पन्न आहे, भांडवली नफ्यापासून उत्पन्न आहे, इतर उत्पन्नात लॉटरीचे उत्पन्न किंवा शर्यतीच्या घोडय़ांची मालकी आणि देखभाल यापासून उत्पन्न आहे किंवा पाच हजार रुपयांपेक्षा जास्त शेतीचे उत्पन्न असेल तर त्या करदात्यांना विवरणपत्राचा फॉर्म ४ भरता येत नाही.

याशिवाय करदात्याचा कोणत्याही प्रकारचा मागील वर्षांचा तोटा किंवा या वर्षीचा तोटा पुढील वर्षांत ‘कॅरी फॉरवर्ड’ करावयाचा असल्यास हा फॉर्म भरता येत नाही.

विवरणपत्र भरण्याची मुदत नोव्हेंबरअखेपर्यंत

आर्थिक वर्ष २०१९-२० साठी (२०२०-२१ करनिर्धारण वर्षांसाठी) विवरणपत्राचे फॉर्म १ ते ७ सूचित करण्यात आलेले असले तरी फॉर्म १ आणि फॉर्म ४ हेच ई-फायलिंगसाठी उपलब्ध आहेत. करोनाच्या टाळेबंदीमुळे करदात्यांना फॉर्म १६ किंवा १६ए मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी २०१९-२० आर्थिक वर्षांचे विवरणपत्र भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२० ही करण्यात आलेली आहे.

ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९ या वर्षांचे विवरणपत्र अद्याप भरले नाही किंवा ज्यांना या वर्षांचे सुधारित विवरणपत्र भरावयाचे आहे त्यांना मात्र ते ३० जून २०२० पर्यंत दाखल करावे लागणार आहे.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 12:12 am

Web Title: article on statement who should fill which form abn 97
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी!
2 नावात काय : विंडफॉल
3 अर्थ वल्लभ : आषाढस्य प्रथमदिवसे..
Just Now!
X