आशीष ठाकूर

मंदीच्या वणव्यात होरपळलेल्या गुंतवणूकदारांच्या जखमेवर हळूवार फुंकर घालण्यासाठी, गेल्या शुक्रवारी तेजीची झुळूक अवतरली. ही तेजी क्षणिक की दीर्घकालीन याचा आढावा तर  घ्यायचा आहेच.पण तत्पूर्वी सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाचा साप्ताहिक बंद जाणून घेऊया.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स: २९,९१५.९६

निफ्टी : ८,७४५.४५

सरलेल्या सप्ताहातील गुरुवापर्यंत चालू असलेल्या घातक उताराच्या दहशतीमुळे, गेल्या लेखात उल्लेख केलेले जानेवारी २०२१ चे निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर २२,९४५ आणि निफ्टीवर ६,६१७ हे अगदी हाकेच्या अंतरावर, या महिनाअखेरीस नक्की गाठले जातील अशी सर्वाची समजूत झालेली. त्याच वेळेला मंदीच्या वातावरणातील सुखद तेजीची झुळूक सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी अवतरली. जिचे विश्लेषण करणे काळाची गरज बनली आहे. ज्याचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांना होईल आणि गळ्यात पडलेल्या समभागातून कधी बाहेर पडता येईल त्याचा अंदाज बांधण्यास हे विश्लेषण उपयोगी पडेल.

येणाऱ्या दिवसात या तेजीचा पाया हा सेन्सेक्सवर २६,७१४ आणि निफ्टीवर ७,८३२ असा असेल. तर निर्देशांकाचा ‘महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर’ हा सेन्सेक्सवर २८,८७५ आणि निफ्टीवर ८,३०० असेल. भविष्यात या स्तराला अनन्यसाधारण महत्त्व असेल. याचा नेमका अर्थ काय? तर हा स्तर काढण्यासाठी मंदीची जननी असलेल्या २००८ च्या नीचांकाचा आधार घेतला आहे आणि २० जानेवारी २०२०चा उच्चांक गृहीत धरला आहे. या तब्बल बारा वर्षांच्या तेजी-मंदी चक्राचा आधार यासाठी घेतला आहे. ज्यायोगे निष्कर्ष अचूक राहील, अशी खात्रीही आहे. यात २००८ सालच्या तेजीचा उच्चांक सेन्सेक्सवर २१,२०६ आणि निफ्टीवर ६,३५७ असा होता. या स्तरावरून जागतिक मंदी सुरू झाली व ऑक्टोबर २००८ ला सेन्सेक्सवर ७,६९७ आणि निफ्टीवर २,२५२ चा नीचांक नोंदवून मंदी संपली. येथे मंदीची दाहकता लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण आताच्या मंदीची तुलना ही सतत २००८ च्या मंदीशी होत असल्याने तत्कालीन उच्चांक व नीचांकाची नोंद घेणे गरजेचे आहे. हा नीचांक मारून नंतर जी तेजी सुरू झाली तिने २००८ चा उच्चांक पार करत २० जानेवारीला सेन्सेक्सवर ४२,२७३ आणि निफ्टीवर १२,४३०चा उच्चांक नोंदवला. यामागचा मुख्य हेतू वाईटातील वाईट घटनेची दाहकता ही २००८ च्या नीचांकाच्या किमतीत / भावात परावर्तित झाली. तर आनंदाचा परमोच्च क्षण हा २० जानेवारीच्या उच्चांकाच्या किमतीत परावर्तित झाला. हे सर्व नोंदविण्यामागचा मुख्य हेतू बाजाराचे सुभाषित.. ‘आनंदाच्या परमोच्च क्षणी बाजार उच्चांक नोंदवतो तर हवालदिल वातावरणात बाजार नीचांक मारतो!’

गत बारा वर्षांतील २००८ ची भीती नीचांकात, तर आनंदाचा परमोच्च क्षण हा २०२० च्या उच्चांकात परावर्तित झाल्याचे आपण पाहिले. या बारा वर्षांच्या गाभ्याचाच आधार घेतल्याने विश्लेषणातील अचूकता अधिक. आता हे उच्चांक आणि नीचांक हे ‘लाँग आलेखा’वर (लाँग चार्ट) मांडले असता उच्चांकापासूनची शंभर टक्के घसरण ही सेन्सेक्सवर २८,८७५ आणि निफ्टीवर ८,३०० अशी येते. आता गंमत पाहा, सरलेल्या सप्ताहातील पूर्वार्धातील गुरुवापर्यंत हा स्तर काही केल्या पार होत नव्हता. पण जेव्हा शुक्रवारी हा स्तर पार केला आणि सुखद तेजी अवतरली. भविष्यात हा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्यास या तेजीचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३२,६५१ / ३४,४९० / ३६,३३० आणि निफ्टीवर ९,५८४ / १०,१२६ / १०,६७० असे असेल.

याच्याही पुढे निर्देशांक – सेन्सेक्सवर ३६,३३० आणि निफ्टीवर १०,६७० च्या स्तरावर पंधरा दिवस सातत्याने टिकल्यास या तेजीच्या झुळूकीचे रूपांतर शाश्वत तेजीत होईल.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.