हिंदुस्तान युनिलीव्हरमध्ये भांडवली हिस्सा ७५% पर्यंत वाढविण्याच्या मूळ विदेशी प्रवर्तकांच्या ताज्या खेळीचे दीर्घकालीन परिणाम ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअरच्या मूल्यांकनावर होऊ घातले आहेत. त्यापैकीच कोलगेट ही नाममुद्रा ग्राहकांच्या मनात इतकी ठसली आहे, की नव्याने दाखल झालेल्या प्रतिस्पर्धी ‘ओरल बी’ची सदिच्छादूत माधुरीच काय पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा ग्राहकांच्या मनातील ‘टूथपेस्ट म्हणजे म्हणजे कोलगेट’ हे समीकरण बदलू शकणार नाही. मौखिक आरोग्यनिगेच्या ५,२०० कोटींच्या बाजारपेठेत ५२.२% वाटा असणारा कोलगेट खचितच आपल्या गुंतवणुकीचा भाग हवा.

निळ्या खाडीच्या कांठाला
माझा हिरवाच गांव
जगात मी मिरीवितो
त्याचे लाऊनिया नांव
भाग्य भूषण वाटते
शांता दुग्रेच्या नांवाचे
उभ्या गावाच्या जाईने
तिचे मंदीर मढते
जाल तेव्हा चुकु नका
तिच्या पूजा नवेद्याला
गोव्यातला माझा गांव
असा ओव्यातून गावा
तेथे जाऊन राहून
डोळे भरून पाहावा
’ बा. भ. बोरकर
 गोव्यावर अतोनात प्रेम. गोव्याच्या मांडवी झुवारी या नद्या, दुधसागर हा धबधबा तिथले माड चांदणे समुद्र व त्यातील मासे गोव्याचा पाऊस, तिथली मंगेश शांतादुग्रेची देवळे, हे सगळे म्हणूनच बोरकर एका कवितेत म्हणतात –
‘तिखट कढीने जेऊन घ्यावे मासळीचा स्वाद दुणा इतुक्या लवकर येई न मरणा’.
विमानतळावर उतरून यथावकाश झुवारी नदीवरचा पूल ओलांडून बोरी गावात प्रवेश केला की लगेचच उजव्या हाताला कवी बोरकरांचे घर लागते. प्रथम या श्रेष्ठ सारस्वताची मनोमन भेट घेऊनच शांतादुग्रेच्या धूळभेटीला जायचे. मंगेशाच्या देवळापासून फर्लाग – दीड फर्लाग अंतरावर कुंडईमचा घाट सुरु होतो. हा घाट पार करत असतानाच उजव्या बाजूला डोंगरात टुमदार इमारती दिसू लागतात. हीच कुंडईम औद्योगिक वसाहत. इथे युनिलिव्हर, कोलगेट, झायडस कॅडिला यांचे कारखाने आहेत. कोलगेटचा हा कारखाना भारतातील टूथपेस्ट निर्मितीचा सर्वाधिक क्षमता असणारा कारखाना आहे. बोरकरांचा आज स्मृतिदिन. म्हणून आजची सुरवात बोरकरांच्या गोव्यावरील या कवनाने.  
या कंपनीची स्थापना विल्यम कोलगेट यांनी १८०६ मध्ये केली. जगातील २०० देशात कारभार असलेली ही कंपनी केवळ अमेरिका व भारत या दोनच देशातील शेअर बाजारात सूचिबद्ध आहे. कोलगेट पामोलिव्हने भारतात आपल्या व्यवसायास १९३७ मध्ये प्रारंभ केला. अमेरिकेच्या कोलगेट कंपनीची कोलगेट पामोलिव्ह इंडिया ही भारतात उपकंपनी असून मूळ कंपनीचा भांडवली हिस्सा ५१% आहे. आज भारतातील टूथपेस्टची बाजारपेठ ५२०० कोटींची असून या बाजारपेठेचा ५३.२% हिस्सा कोलगेटकडे आहे. तर शेिव्हग क्रीमची बाजारपेठ २८० कोटींची असून या बाजारपेठेत ‘पामोलिव्ह’ या नाममुद्रेने विकल्या जाणाऱ्या शेिव्हग क्रीमचा वाटा २२% आहे. कोलगेटची इंडियाची ९६% विक्री कोलगेट या नाममुद्रेने विकल्या जाणाऱ्या टूथपेस्टमुळे होते. तर उर्वरित ४% विक्री अन्य उत्पादनातून होते. कंपनीने आपला व्यवसाय चार प्रकारात विभागला आहे. मौखिक आरोग्य, वैयक्तिक निगेची उत्पादने, गृहस्वच्छतेची उत्पादने व दंतवैद्यकांनी वापरावयाची उत्पादने. कोलगेट ही नाममुद्रा मौखिक आरोग्यासाठी तर पामोलिव्ह ही नाममुद्रा वैयक्तिक निगराणीसाठीच्या उत्पादनासाठी वापरली जाते. मौखिक आरोग्यगटात कोलगेट या प्रमुख नाममुद्रेअंतर्गत, कोलगेट डेंटल क्रीम, कोलगेट जेल, कोलगेट टोटल, कोलगेट सेन्सेटिव्ह, कोलगेट सेन्सेटिव्ह प्रो, लहान मुलांसाठी कोलगेट स्माईल, कोलगेट प्रोव्हिडेंट ही औषधी टूथपेस्ट असे एकूण १४ उपप्रकार आहेत. वेगवेगळे टूथब्रश, कोलगेट प्लँक्स या नाममुद्रेने खाणे खाल्यानंतर चूळ भरण्यासाठीचे द्रावण या उत्पादनाचा समावेश होतो. वैयक्तिक निगराणीसाठी वापरावयाच्या उत्पादनात शेिव्हग क्रीम व्यतिरिक्त पामोलिव्ह शॉवर जेल, हातांची स्वच्छता करणारे साबणाचे द्रावण, मॉइश्चरायिझग बॉडी वॉश, पामोलिव्ह चार्मीस हे क्रीम आदी उत्पादनांचा समावेश होतो. स्वच्छतेसाठी वापरावयाच्या गटात केवळ अ‍ॅक्झॉन हे स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरावयाचे एकच उत्पादन आहे. तर चौथ्या गटात दंतवैद्यांसाठी एकूण सात उत्पादने आहेत.
मागील आíथक वर्षांत कोलगेटची विक्री १८.३%ने वाढली तर विकलेल्या उत्पादनाच्या वजनानुसार १२% वाढ झाली. २००८-१३ या पाच वर्षांच्या काळात कोलगेटला वाढीचा दर १८% राखण्यात यश आले आहे. भारतात प्रति माणशी टूथपेस्टचा खप १३७ ग्रॅम आहे. पाच वर्षांपूर्वी हा खप १२५ ग्रॅम होता. हे प्रमाण उभरत्या ब्रिक्स अर्थव्यवस्थांतील सरासरीपेक्षा निम्याने आहे. अर्थव्यवस्था विकसित होताना हे प्रमाण वाढेल व त्याचा सर्वात मोठा लाभार्थी कोलगेट असेल. भारतात शाळेपासून दोनदा दात घासण्याची शिकवण दिली जाते. ही आजची उमलती पिढी वयात येईल तेव्हा हा खप कितीतरी वाढलेला असेल. टूथपेस्ट विक्रीत कोलगेटचा निकटचे स्पर्धक एचयुएल व डाबर कोलगेटच्या जवळपास जाऊसुद्धा शकत नाही. मागील वर्षांत कोलगेटने टूथपेस्ट विक्रीत आपला हिस्सा १.५६% वाढवून ५५.४% वर नेला आहे. यात सर्वात मोठे योगदान आहे ते कोलगेट डेन्टल क्रीमचे. बाजारात कोलगेट टूथब्रशचा वाटा ४३.५% आहे. कोलगेट ज्या व्यवसायात आहे तिथे नावीन्य हाच यशाचा मार्ग आहे. दरवर्षी कोलगेट एक – दोन नवीन उत्पादने बाजारात आणत असते. यावर्षी कोलगेट प्रो गम व कोलगेट व्हिजिबल व्हाईट ही दोन उत्पादने आणली. कोलगेट ३६० बॅटरी टूथ ब्रश हेसुद्धा एक नवीन उत्पादन या वर्षी बाजारात आणले. व्यवसायातील नतृत्व करत असल्यामुळे कोलगेटच्या उत्पादनाच्या किंमती स्पर्धकांच्या पेक्षा ६-८% अधिक असतात. कोलगेट व्हिजिबल व्हाईटला १०० ग्रॅमसाठी रु. ७९ तर ५० ग्रॅमसाठी रु. ४० ग्राहकांना मोजावे लागणे हे याचीच ग्वाही देतात. नफ्याचे प्रमाण जास्त असलेली कोलगेट टोटल ही नाममुद्रा कोलगेटच्या भारतातील नाममुद्रा संचातील सर्वात किफायतशीर म्हणून उदयाला येत आहे. जगाच्या तुलनेत कोलगेटचे भारतातील नफ्याचे प्रमाण ७-८% अधिक आहे. हिमाचल प्रदेशातील बड्डी कारखान्याच्या नफा करमुक्त असण्याचा काळ यावर्षी संपतो आहे. त्यामुळे आता कोलगेटला जास्त कर भरावा लागेल. कोलगेटने नवीन कारखान्यासाठी नफा करमुक्त असलेल्या जागेचा शोध सुरु केला आहे.
कोलगेटने आत्तापर्यंत सहा वेळा बक्षीस समभागांची खैरात केल्यामुळे नवगुंतावणूकदारांना कोलगेटकडून बोनसची अपेक्षा असते. कोलगेटने बाजारात १९७८ मध्ये नोंदणी झाल्यापासून पाच वेळा १:१ तर एकदा ३:५ या प्रमाणात बक्षीस समभाग दिले आहेत. एकूण भाग भांडवलात बक्षीस समभागांचे प्रमाण ९७% आहे. कोलगेटने शेवटचे बक्षीस समभाग १९९३ मध्ये १:१ या प्रमाणात दिले. मागच्या आठवडय़ात शिफारस केलेला जिलेट आणि आजची कोलगेट ही दुक्कल नेहमीच महाग वाटते. ग्राहक आपल्या सवयी सहजतेने बदलत नाहीत या कारणाने एफएमसीजी (ग्राहक उपयोगी) उद्योगातील कंपन्यांचा पीई नेहमीच जास्त असतो. म्हणूनच हे शेअर गुंतवणुकीत पाच ते सात वर्ष ठेवण्याच्या उद्देशाने विकत घ्यायचे असतात. कोलगेटच्या २०१४ ची समभाग मिळकत ४०.५० तर २०१५ ची ४७.२० असणे अपेक्षित आहे. आजच्या भावाचे २०१५ च्या मिळकतीशी गुणोत्तर ३० पडते. म्हणून हा शेअर बिलकुल महाग नाही. कोलगेट ही नाममुद्रा ग्राहकांच्या मनात इतकी ठसली आहे की प्रत्यक्ष ब्रह्मदेवसुद्धा ग्राहकांच्या मनातील ‘टूथपेस्ट म्हणजे कोलगेट’ हे समीकरण बदलू शकणार नाही. म्हणूनच ‘कोलगेट दा जबाब नहीं’ हेच खरे!