श्रीकांत कुवळेकर

भारतात कमॉडिटी वायदे बाजाराचा पुनर्जन्म २००३ साली झाला तो संपूर्णपणे नवीन अवतारात. म्हणजे संपूर्णत: इलेक्ट्रॉनिक ऑनलाइन पद्धतीने. संपूर्ण जगात ८० टक्के वायदे व्यापार हा ओपन आउटक्राय अथवा विशिष्ट वेळामध्ये ब्रोकर्सचे प्रतिनिधी एका मोठय़ा दालनात एकत्र येऊन बोली लावून करायचे आणि फक्त १० ते २० टक्के व्यापार हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असताना १०० टक्के इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कमॉडिटी एक्स्चेंज चालवण्याचा भारतीय नियंत्रकांचा निर्णय धाडसाचा होता. जगातील सर्वात मोठय़ा शिकागो र्मकटाइल एक्स्चेंजने तर २००७ मध्ये असेही म्हटले की, हा निर्णय चुकीचा असून त्यामुळे वायदे बाजार पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरेल. परंतु घडले उलटेच. उत्तरोत्तर संपूर्ण जगात इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंगची लाट पसरू लागली. त्यामुळे जागतिक वायदे बाजाराच्या कक्षा अगदी देशाबाहेरदेखील चांगल्याच रुंदावल्या. कमॉडिटी व्यापार आणि किमती मागील दशकात आणि या दशकाच्या सुरुवातीपर्यंत दणदणीत वाढल्या. त्यामुळेच या कालावधीला ‘कमॉडिटी सुपर सायकल’ असेही म्हटले जाते. हळूहळू जगातील सर्वच प्रमुख कमॉडिटी एक्स्चेंजेस भारताची री ओढू लागले आणि ट्रेडिंग रिंग एकामागोमाग बंद पडू लागल्या. शेवटी शिकागो एक्स्चेंजनेदेखील ओपन आउटक्राय पद्धत बंद केली आणि भारताप्रमाणे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २३ तासांहून अधिक काळासाठी व्यापारासाठी एक्स्चेंज खुले केले.

कमॉडिटी मार्केटच्या या यशाने बऱ्याच प्रादेशिक स्वरूपाच्या आणि छोटय़ा प्रमाणात उत्पादित होणाऱ्या कमॉडिटीजना मोठे महत्त्व प्राप्त झाले. व्यापारइच्छुक लोकांमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या किमतीमध्येदेखील मोठी वाढ झाली. त्यामुळे त्याचे उत्पादक, तो प्रदेश किंवा राज्य यांना मोठा आर्थिक फायदा झाला. उदाहरण द्यायचे तर मसालावर्गीय पिकांमध्ये वेलची आणि मेंथा ऑइल किंवा कॅस्टर, गवार बिया आणि गवार गमसारख्या पदार्थानी त्यांच्या टंचाईच्या काळात विक्रमी शिखरे सर करताना शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही मालामाल केले आहे. विशेष म्हणजे या तीनही पिकांनी मागील दोन दशकांत आंतरराष्ट्रीय बाजारात जोरदार मुसंडी मारली मारली आहे. तसेच सरत्या दशकात पीक-टंचाईमुळे तीनही पदार्थाच्या वायद्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या वर्षांत गडबड निदर्शनास आली असून त्यांच्या किमतीने त्या त्या वेळी मोठमोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. उदाहरणार्थ, २०११ मध्ये साधारणपणे २०-२५ रुपये किलो असलेली गवार बी ३०० रुपये किलोवर गेली होती, तर गवार गम ४० रुपयांवरून १,१०० रुपयांवर. या स्तंभातून दोन वर्षांपूर्वी वेलची वर सातत्याने लिहिले गेले होते तेव्हा या मसाला पिकाचे केरळ-तमिळनाडूमध्ये खूप नुकसान झाल्यामुळे किंमत किरकोळ बाजारात २,००० रुपयांवरून ६,५०० रुपये किलो इतकी झाली होती. असे असले तरी या पिकांच्या वायद्यांमुळे त्या त्या भागातील अर्थव्यवस्थेला झालेला फायदा आणि शेतकऱ्यांचे एकंदरीत जीवनमान बऱ्यापैकी उंचावल्याचे दिसून येते. त्याच पठडीमधील मेंथा ऑइल या कमॉडिटीबद्दल आज आपण माहिती घेतानाच त्यात मर्यादित गुंतवणूक करण्याची संधीदेखील पडताळून पाहू.

तसे पाहता आपल्यापैकी बहुतेक जण नित्याच्या व्यवहारात मेंथा ऑइलचा वापर करीत असतात. फक्त त्याबद्दल त्यांना माहिती नसते. हे तेल काढले जाते तेच मुळी जपानी पुदिना म्हणजे आपण चटणी करतो त्या पुदिन्याच्या एका विशिष्ट जातीपासून. पुदिन्याची ही शेती मूलत: उत्तर प्रदेशात केली जात असे. बाराबांकि, चंदौसी, संभल, रामपूर, मुरादाबाद, बदायून या भागात प्रामुख्याने मे महिन्यात काढणी केले जाणारे हे तीन-चार महिन्यांचे पीक असून त्यापासून मेंथा क्रिस्टल बनवले जातात. या क्रिस्टलचे विविध पदार्थात आणि तेलामध्ये रूपांतर केले जाते. दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाणारा व्यापार आणि वाढणाऱ्या किमती यामुळे या पिकाचे महत्त्व वाढून हळूहळू उत्तर प्रदेशला लागून असलेल्या बिहार राज्यामध्येदेखील याची शेती पसरली असून तेथील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीचा हा ठोस पर्याय उपलब्ध झाला आहे. नव्वदीमध्ये ५,००० ते ६,००० टन असलेले मेंथा ऑइल उत्पादन मागील काही वर्षांत ३५,००० ते ४०,००० टन या कक्षेत पोहोचले असून एकंदरीत उत्पादनाच्या ८० टक्के भाग उत्तर प्रदेशात तर १५ टक्के बिहारमध्ये होताना दिसत आहे.

आपल्या दैनंदिन व्यवहारात अनेक खाद्यपदार्थ, चॉकलेट्स, गोळ्या, केक-बिस्किटे आणि टूथ पेस्ट इत्यादीमध्ये किंवा अगदी पानवालासुद्धा थंडक म्हणून मेंथा क्रिस्टल वापरत असतो. औषधे, वेदनाशामक बाम आणि तेले इत्यादींमध्येदेखील मेंथा ऑइल वापरले जाते. थोडक्यात ज्या ज्या पदार्थामध्ये आपल्याला थंडा थंडा कूल कूल परिणाम दिसतो त्यात मेंथा ऑइल असते असे आपण म्हणू शकतो. त्यामुळे एकंदरीत या कमॉडिटीची मागणी वाढत जाताना दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारात या पदार्थाना प्रचंड मागणी असून पुरवठा प्रामुख्याने भारतातूनच केला जातो. निर्यात प्रामुख्याने चीनमध्ये साधारणपणे ६० टक्के, तर अमेरिकेला २० टक्के एवढी असून बाकीची सिंगापूर, आणि जर्मनी-नेदरलँड्ससारख्या युरोपीय देशांत होताना दिसते. देशाच्या दृष्टीने विचार केल्यास मेंथा ऑइल आणि तत्सम पदार्थाच्या निर्यातीचे मूल्य २० वर्षांत २० पटीने वाढून आज ४,००० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.

किंमतीचा विचार केला तर २००५-२०१० या वर्षांत घाऊक बाजारात ३५०-६५० रुपये किलोला उपलब्ध असणारे तेल २०१२ मध्ये २,६०० रुपयांवर गेले होते, तर २०१५ साली परत ६५० रुपये, २०१८ मध्ये १,८०० रुपयांवर जाऊन आज ते १,००० रुपयांवर आले आहे. तसे पाहता पुरवठय़ातील थोडीशी कपात किंवा वाढदेखील किमतीत मोठी वाढ किंवा घसरण घडवून आणणाऱ्या या कमॉडिटीच्या व्यापारावर देशातील काही विशिष्ट व्यापाऱ्यांचे नियंत्रण असून या बाजाराबद्दलची अचूक आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध होऊ न देण्यात त्यांचा मोठा फायदा असतो. त्यामुळे या व्यापाराशी गुन्हेगारी प्रवृत्तींचा संबंधदेखील बऱ्याच प्रमाणात आढळतो. अर्थात किमतीतील एवढी मोठी अस्थिरता किंवा चढउतार यामुळे सटोडियांचा यावर मोठा पगडा असला तरी एकंदर देशाचे नुकसानच झाले आहे. कारण अशा वस्तूंच्या किमती अति प्रचंड प्रमाणात वाढतात तेव्हा त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करणारे उद्योजक पर्याय शोधण्यासाठी संशोधनावर भर देऊन नव्या पदार्थाचा कृत्रिम किंवा नैसर्गिक स्रोत विकसित करतात. तसेच होऊन २०१२ नंतर बिगर-अन्न क्षेत्रात कृत्रिम मेंथॉलचा वापर वाढताना दिसू लागला. यामध्ये जर्मनी मधील प्रसिद्ध बीएएसएफ या कंपनीने मोठे संशोधन करून कृत्रिम मेंथॉल निर्मितीत मोठी आघाडी घेतली आहे. अगदी अशीच परिस्थिती २०११ मध्ये गवार गमच्या किमतीत आलेल्या वाढीमुळे निर्माण होऊन त्यातून झन्थन गम या पर्यायाची निर्मिती झाली.

आता गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचे झाले तर मेंथा ऑइल वायदे व्यवहार एमसीएक्स या एक्स्चेंजवर उपलब्ध आहेत. यामध्ये एकंदर व्यवहार पूर्वीइतके राहिले नसून करोनाचा प्रभाव आणि इतर काही गोष्टींमुळे कृषी वायद्यांमधील व्यवहार थोडे कमी झाल्याचा फटका यालाही बसला आहेच. त्यामुळे मर्यादित स्वरूपात गुंतवणुकीच्या दृष्टीनेच याकडे बघितल्यास उत्तम. साधारणपणे किमतीचा आलेख पाहता थंडीमध्ये या किमती वाढून मार्च-एप्रिलमध्ये हंगाम संपताना त्या चांगल्याच वाढलेल्या दिसतात. मागील काही आठवडे ९००-९५० रुपये कक्षेत राहिल्यानंतर अलीकडेच त्या १,००० रुपये प्रति किलोदरम्यान स्थिर झालेल्या दिसत आहेत. ऐतिहासिक चार्ट आणि बाजार सूत्रांच्या माहितीनुसार मेंथा ऑइल किमती मार्चपर्यंत किमान १,२५० रुपये सहज होतील. त्यामुळे सध्या ९९८ रुपयांवर असलेला जानेवारी वायदा ९७५-९८२ रुपयांच्या कक्षेत खरेदी करून १,०४० रुपयांचे लक्ष ठेवावे अशी शिफारस बाजारातील जाणकार करताना दिसतात. मात्र ९५१ रुपये ‘स्टॉप लॉस’ लावण्यास विसरू नये असेही ते सांगतात. याच रणनीतीने एप्रिलपर्यंत या कमॉडिटीमध्ये व्यवहार करावेत. मेंथा ऑइलचा वायदा १,०८० किलोचा असून सध्याच्या किमतीप्रमाणे अंदाजे १०,८०,००० रुपयांचा होतो. परंतु यात व्यवहार करण्यासाठी फक्त १२-१५ टक्के एवढे मार्जिन द्यावे लागते. आपण एकदा व्यवहार केल्यानंतर किमतीमध्ये होणारी प्रत्येक १ रुपयाची घट किंवा वाढ म्हणजे १,०८० रुपयांचा तोटा किंवा फायदा असे वायदेबाजारातील सर्वसाधारण गणित असते. आपापल्या जोखीम पत्करायच्या वकुबाप्रमाणेच यात गुंतवणूक करताना आपल्या ब्रोकरकडून अधिक माहिती घेणे फायदेशीर ठरेल.

मार्चपर्यंत १,२५०चा भाव सहज!

गुंतवणुकीच्या दृष्टीनेच मेंथा ऑइलकडे बघितल्यास, साधारणपणे किमतीचा आलेख पाहता थंडीमध्ये या किमती वाढून मार्च-एप्रिलमध्ये हंगाम संपताना त्या चांगल्याच वाढलेल्या दिसतात. मागील काही आठवडे ९००-९५० रुपये कक्षेत राहिल्यानंतर अलीकडेच त्या १,००० रुपये प्रति किलोदरम्यान स्थिर झालेल्या दिसत आहेत. ऐतिहासिक चार्ट आणि बाजार सूत्रांच्या माहितीनुसार मेंथा ऑइल किमती मार्चपर्यंत किमान १,२५० रुपये सहज होतील.

(खुलासा : वाचकांनी लक्षात घ्यावे की लेखकाचे या कमॉडिटी व्यापारात कुठल्याच प्रकारचे संबंध नाहीत. हा लेख म्हणजे गुंतावणुकीचा सल्ला न मानता त्याकडे कमॉडिटी बाजारविषयक माहिती एवढय़ाच मर्यादित अर्थाने पाहावे.)

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

ksrikant10@gmail.com