सुधीर जोशी

करोनावर नियंत्रण येता येता दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ आणि लगोलग तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. याचे आर्थिक परिणाम आगामी सहा महिन्यांत पाहायला मिळतील, तूर्त बाजाराचे वर्तन सारे काही आलबेल असल्यासारखे आहे. २०२० सालापेक्षा यावर्षी उद्योगजगताला झळ कमी बसणार असली तरी बाजाराच्या अतिउत्साही उसळीत नफावसुलीची संधी घेतलीच पाहिजे.

करोना रुग्णांच्या मुंबईतील वाढीवर मिळविले गेलेले नियंत्रण, बायडेन सरकारकडून भारताला लसीसाठी मिळणाऱ्या कच्या मालावरील बंदी शिथिल करण्याचे संकेत अशा उत्साही बातम्यांनी, तसेच आयसीआयसीआय बँकेपाठोपाठ इतर खासगी बँका व अनेक दिग्गज कंपन्यांनी जाहीर केलेल्या दमदार निकालांमुळे गेल्या सप्ताहात बाजारात तेजीचा माहोल तयार झाला. पण शेवटच्या दिवशी झालेल्या नफावसुलीमुळे बाजाराने सप्ताहातील निम्मी कमाई गमावली. तरीही बाजाराचे प्रमुख निर्देशांक दोन टक्क्यांनी तर बँक निफ्टी तीन टक्क्यांनी वर गेला.

औषधनिर्मिती क्षेत्रात डिव्हीज् लॅब तर वित्तीय संस्थात बजाज फिनसव्‍‌र्हने आघाडी घेतली होती. चीनने प्रदूषणविषयक नियम कडक केल्यामुळे तेथील काही पोलाद कारखाने बंद झाले आहेत. तसेच चीनने पोलाद आयातीवरील शुल्क माफ केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढत आहेत. त्याचा परिणाम भारतातील पोलाद कंपन्यांना मिळेल या आशेवर या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांच्या समभागात मोठी तेजी अनुभवायला मिळाली. धातू क्षेत्राचा निर्देशांक ९ टक्क्यांनी वधारला.

अ‍ॅक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसव्‍‌र्हसारख्या वित्तीय क्षेत्रातील कंपन्या, निपॉन, एचडीएफसी तसेच यूटीआयसारख्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी गेल्या वर्षांच्या तुलनेत मिळकतीत व नफ्यामध्ये घसघशीत वाढ जाहीर केली. बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स व आयशर मोटर्सने चौथ्या तिमाहीतील उत्पन्नात उत्तम वाढ जाहीर केली. दुचाकींना मिळणाऱ्या वाढत्या पसंतीचा फायदा या कंपन्यांना मिळेल. कंपन्यांच्या निर्यातीत वाढ झाली व येत्या काळातही ती टिकणे अपेक्षित आहे. या कंपन्यांच्या समभागात थोडी घसरण झाल्यावर केलेली गुंतवणूक वर्षभराच्या मुदतीसाठी फायदेशीर ठरेल. मारुती सुझुकीने विक्रीत २७ टक्के वाढ होऊनही नफ्यातील घसरणीमुळे बाजाराची निराशा केली. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, करोनाकाळात सुटय़ा भागांची कमतरता, वाहतुकीवरील र्निबध अशा कारणांमुळे पुढील सहा महिने तरी कंपनीची नफाक्षमता मर्यादित राहील. हातातील समभाग राखून ठेवून, या समभागांत मोठय़ा घसरणीमध्येच नव्याने गुंतवणूक करता येईल.

हिंदुस्तान युनिलिव्हर या ग्राहकोभोग्य वस्तूंच्या आघाडीच्या स्थानावरील कंपनीच्या उत्पन्न व नफ्यात १८ टक्के वाढ झाली. घरी असताना वापरायच्या तयार खाद्य व आरोग्य रक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या मागणीचा कंपनीने करोनाकाळाचा यशस्वी मुकाबला करून फायदा करून घेतला. सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीतील तूट ही ग्लॅक्सो स्मिथक्लाईनच्या अधिग्रहणाने मिळालेल्या बूस्ट व हॉर्लिक्स यासारख्या उत्पादनांच्या मिळकतीने भरून काढली. कंपनीच्या उत्पादन विविधतेमुळे कुठल्याही कठीण काळात कंपनी तग धरू शकते.

बजाज कन्झ्युमरच्या मार्चअखेर संपलेल्या वार्षांतील मिळकतीत आठ टक्के तर नफ्यात चौदा टक्के वाढ झाली आहे. कंपनी आमंड ड्रॉप ऑइलसाठी प्रसिद्ध आहे पण आता आमला, अ‍ॅलोव्हेरा अशा इतर केश तेलाच्या बाजारातील आपली हिस्सेदारी वाढवत आहे. ग्रामीण भागातील विपणन व्यवस्था मजबूत करून कंपनीने तेथील बाजारातील हिस्सा वाढवला आहे. कंपनीचे उदार लाभांश धोरण व इतर एफएमसीजी कंपन्यांच्या तुलनेत असलेले बाजारमूल्य गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीच्या मार्चअखेर संपलेल्या तिमाहीतील नफ्यामध्ये आधीच्या तिमाहीच्या तुलनेत मोठी घट झाली पण मिळकतीचे प्रमाण कायम राहिले. तरीही वित्तीय विश्लेषक कंपनीच्या हातातील कंत्राटे विचारात घेऊन कंपनीच्या भविष्याबाबत आशावादी आहेत. या तिमाहीत केल्या गेलेल्या काही एकरकमी खर्चामुळे नफ्याचे प्रमाण घटले आहे. या निकालांमुळे होणारी घसरण खरेदीची संधी असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

या सप्ताहातील बाजाराचे वर्तन काहीसे अनपेक्षित व सारे काही आलबेल असल्यासारखे राहिले. सेन्सेक्स व निफ्टी हे प्रमुख निर्देशांक परत एकदा पन्नास व पंधरा हजारांची पातळी गाठून आले. देशातील व परदेशी वित्तीय संस्थांनीही खरेदीचे धोरण ठेवले. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आगामी सहा महिन्यांत बघायला मिळेल. सध्या जाहीर होणारे निकाल हे मागील वर्षांच्या तुलनेत चांगले वाटले तरी मागच्या वर्षी मार्च महिन्यात कडक टाळेबंदीमुळे कारखानदारी व विक्री व्यवस्था ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे निकालांची तुलनात्मक आकडेवारी असमान काळासाठी आहे. २०२० सालापेक्षा यावर्षी उद्योगजगताला झळ कमी बसणार असली तरी बाजाराच्या अतिउत्साही उसळीत नफावसुलीची संधी घेतलीच पाहिजे. कारण करोनावर नियंत्रण येता येता दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ व तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे.

sudhirjoshi23@gmail.com