29 November 2020

News Flash

अर्थ वल्लभ : परिघाबाहेरचा फंड

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

डीएसपी इक्विटी फंड

वसंत माधव कुळकर्णी

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचे दोन मुख्य टप्पे आहेत. पहिली योग्य फंड निवडून त्या फंडात नियमित गुंतवणूक करणे आणि दुसरे नियमित अंतराने आपल्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करणे. ‘लोकसत्ताकर्ते म्युच्युअल फंड’ यादीसाठी निकष ठरलेले असून त्या निकषांत बसणाऱ्या फंडाची शिफारस होत असते.

फंडांच्या तिमाही कामगिरीचा आढावा घेताना एखादा फंडाच्या सुधारलेल्या कामगिरीचा सुळका लक्ष वेधून घेतो. बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेत आपल्या गुंतवणुकीत अधिकाधिक जोखीम समायोजित परतावा मिळविण्यास अशा सुळक्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे असते. ‘टाटा पी/ई’ फंडाची कामगिरी अचानक सुधारली आणि अचानक खालावलीही, हे उदाहरण देता येईल. परंतु एखाद्या फंडाच्या बाबतीत हे सातत्याने घडत असेल तर कर्त्यांच्या यादीत समावेश झाला नसला तरी परिघाबाहेरील एखादा फंड लक्षवेधी ठरतो. आजची शिफारस असलेला डीएसपी इक्विटी फंड हा असाच परिघाबाहेरचा फंड आहे. यादीत नसला तरी दखल घेण्याजोगा वाटल्याने सणासुदीच्या दिवसांतील खरेदीची संधी म्हणून ही शिफारस.

फंड घराण्यांचा अभ्यास करताना गुंतवणूक पद्धती व्यक्तिसापेक्ष बदलताना दिसते. एखादा फंड त्या व्यक्तीच्या नावावर (एचडीएफसीचे फंड) विकला जातो. व्यक्ती आणि गुंतवणूक पद्धती यांच्यात व्यक्ती श्रेष्ठ की फंडाच्या गुंतवणुकीसाठी समभाग निवडीमागचे व्यक्तिसापेक्ष न बदलणारे निकष श्रेष्ठ हा नेहमीच वादाचा मुद्दा असतो. गुंतवणूक पद्धती (इन्व्हेस्टमेंट फिलोसॉफी) का महत्त्वाच्या असतात हे समजून घ्यायचे असेल तर डीएसपी फंड घराण्याच्या गुंतवणूक निकषांचा अभ्यास करायला हवा. मागील काही वर्षांत डीएसपीच्या गुंतवणूक व्यवस्थापनात अनेक बदल झाले. गेल्या काही वर्षांत एस. नागनाथ (मुख्य गुंतवणूक अधिकारी), अनुप माहेश्वरी (नागनाथ यांच्यानंतरचे मुख्य गुंतवणूक अधिकारी), हरीश झवेरी आणि अगदी अलीकडेच गोपाल अग्रवाल यांसारखे निधी व्यवस्थापनातील यशस्वी मोहरे गमावूनसुद्धा डीएसपी फोकस्डसारख्या फंडाची कामगिरी खालावण्याचा अपवाद वगळता अन्य फंडांच्या कामगिरीत विशेष घसरण झालेली नाही. डीएसपी इक्विटी फंडाच्या निधी व्यवस्थापकांत मागील पाच वर्षांत दोन वेळा बदल झाले. भूतपूर्व निधी व्यवस्थापक अपूर्व शहा, जुलै २०१५ मध्ये डीएसपी फंड घराण्यातून बाहेर पडले. विद्यमान निधी व्यवस्थापक अतुल भोळे फंड घराण्यात दाखल होण्यापूर्वी या फंडाची तात्पुरती जबादारी संयुक्तपणे हरीश झवेरी आणि विनित सांबरे यांच्यावर सोपविली गेली होती. २०१६ पासून या फंडाची जबाबदारी अतुल भोळे यांच्यावर सोपविण्यात आली. हा मल्टिकॅप फंड असून अतुल भोळे यांची शैली गुंतवणुकीसाठी खूपच पोषक ठरते. ते मानदंडसापेक्ष अज्ञेयवादी निधी व्यवस्थापक आहेत. त्यांचे समभाग निवडीचे निकष कठोर असल्याने वृद्धीक्षम समभागांची निवड करताना मूल्यांकनाला कायम केंद्रस्थानी ठेवलेले दिसते.

निधी व्यवस्थापन चमूत बदल होणे आणि सेबीने फंडांचे सुसूत्रीकरण केल्यापश्चात फंडाची मल्टिकॅप गुंतवणूक पद्धतीत बदल झालेला नाही. बदल आहे तो विद्यमान आणि भूतपूर्व निधी व्यवस्थापकांच्या शैलीत. अतुल भोळे यांची गुंतवणूकशैली अपूर्व शहांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. मूलभूत संशोधन हे अतुल भोळे यांच्या गुंतवणुकीच्या केंद्रस्थानी आहे. निधी व्यवस्थापक होण्यापूर्वी अतुल भोळे यांनी बराच कालावधी मूलभूत संशोधक या नात्याने व्यतीत केलेला असल्याने त्यांना बाजारातील भावना, बातम्या आणि वेगवेगळे प्रवाह यांच्यापासून फंड गुंतवणुकीला अलिप्त ठेवून आपल्या संशोधन कौशल्याच्या बळावर गुंतवणुकीसाठी समभाग निवडणे (किंवा विकणे) यासाठी होत असतो. तर अपूर्व शहा हे गुंतवणुकीचे काही निर्णय बाजारातील प्रवाहांनुसार (मोमेंटम) घेत असत.

विद्यमान निधी व्यवस्थापकांच्या हाताखालील फंडाची कामगिरी एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ हा कालावधी वगळता समाधानकारक असल्याचे दिसत आहे. फंडांच्या कामगिरीत एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत घसरण झाली असली तरी, वेळीच साहसी गुंतवणुकीला वेसण घातल्याचे प्रतिबिंब जानेवारी २०१९ पासून दिसायला लागले. परिघाबाहेरील (मानदंडाबाहेरील) बजाज फायनान्स, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्ससारखे उच्च मूल्यांकन असलेले परंतु वृद्धीक्षम समभागांच्या समावेशाने जानेवारी २०१९ पासून फंडांच्या कामगिरीत कमालीचा फरक दिसून आला. तर मानदंडात समावेश असलेले रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि इन्फोसिससारख्या समभागांनी कामगिरीत योग्य वाटा उचलला. मागील पाच वर्षांत १ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीतील तीन वर्षांच्या चलत सरसरीत फंडाने निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करण्याची टक्केवारी ६२ टक्के आहे. तर १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या एक वर्षांतील चलत सरासरीची निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करण्याची टक्केवारी १०० टक्के आहे. बाजार १ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०२० या पाच वर्षांतील घसरणीच्या टप्प्यात मुद्दलाची सुरक्षितता राखण्यात (डाऊनसाइड कॅप्चर रेशो) या फंड गटात पराग पारीख लाँग टर्म इक्विटी आणि पीजीआयएम इक्विटी डायव्हर्सिफाइड फंड पुढे आहेत. तर तेजीच्या कालावधीत निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देण्याच्या क्रमवारीत (अपसाइड कॅप्चर रेशो) डीएसपी इक्विटी हा फंड चौथ्या क्रमांकावर आहे. मागील दोन तिमाहीत क्रिसिल क्रमवारीत (सीपीआर) हा फंड ‘अपर मिडल क्वारटाइल’मध्ये राहिला असून या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या क्रिसिल क्रमवारीत फंडाच्या क्रमवारीत एका पायरीने सुधारणा अपेक्षित आहे. कदाचित या फंडाचा समावेश पुढील तिमाहीत ‘कर्त्यां’च्या यादीत होण्याची शक्यता वाटल्याने फंड गुंतवणुकीची ही आगाऊ शिफारस आहे.

निधी व्यवस्थापन खर्चाचा विचार केल्यास हा फंड, त्याच्या फंड गटातील एक महागडा फंड जरूरच आहे. अधिक व्यवस्थापन शुल्क आकारणाऱ्या फंडात गुंतवणूक करणे म्हणजे गुंतवणुकीवरील कमी परताव्याला आमंत्रण देणे होय. मल्टिकॅप फंड गटातील अन्य फंडांच्या जोखीम परतावा गुणोत्तराचा विचार करता महाग व्यवस्थापन खर्चाचे (रेग्युलर ग्रोथ २.०४ टक्के) समर्थन करता येत नाही. फंड घराण्याने पुढील तिमाहीसाठी व्यवस्थापन खर्चात किमान दोन दशांश टक्क्यांनी (०.२० टक्के) कपात केली तरच फंडाच्या जवळपास कामगिरी असलेल्या फंडाच्या व्यवस्थापन खर्चाच्या तुलनेत सुसह्य़ पातळीवर तो असेल. गुंतवणूकदारांनी गांभीर्याने स्पर्धकांपेक्षा अधिक व्यवस्थापन खर्च असल्याचे विचारात घेऊन हा खर्च समर्थनीय वाटल्यास गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

shreeyachebaba@gmail.com

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 12:04 am

Web Title: dsp equity fund review mutual fund information zws 70
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे : दीपोत्सवानिमित्त दहा मंत्र!
2 बंदा रुपया : क्लासिक कहाणी!
3 माझा पोर्टफोलियो :  कर्जमुक्ततेसाठी पडलेली पावले आश्वासक