News Flash

अर्थ वल्लभ : धोरण बदलाचा लाभार्थी

डीएसपी फोकस फंडाचा ‘एस अँण्ड पी बीएसई ५०० टीआरआय’ हा मानदंड निर्देशांक आहे

निधी व्यवस्थापक : गोपाळ अग्रवाल

वसंत माधव कुळकर्णी

डीएसपी फोकस फंड

डीएसपी फोकस फंडाचा ‘एस अँण्ड पी बीएसई ५०० टीआरआय’ हा मानदंड निर्देशांक आहे. हा फंड मानदंडसापेक्ष गुंतवणूक करणारा फंड आहे. १ ऑक्टोबर २०१८ पासून फंडाची सूत्रे हरीश जव्हेरी यांच्याकडून गोपाळ अग्रवाल यांच्याकडे आली. आधीच्या निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगात मानदंडापेक्षा केलेली अधिक गुंतवणूक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला गुंतवणुकीतून पूर्णपणे वगळणे फंडाच्या हीन परताव्यास कारण ठरले. या काळात ‘ऑटो निर्देशांका’त ३५ टक्के घसरण झाली तर ‘आयटी निर्देशांक’ १०० टक्क्यांनी वधारला. या दोन्ही चुका विद्यमान निधी व्यवस्थापकांनी सुधारल्या असल्याने फंडाच्या परताव्यात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात निधी व्यवस्थापकांनी वाहन उद्योगातील गुंतवणूक कमी करून एचडीएफसी लाइफ आणि एसबीआय लाइफ या कंपन्यांत गुंतवणूक केली. मागील वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मात्रेत सातत्याने केलेली वाढ फंडाच्या कामगिरी सुधारणेस एक कारण ठरली. आधीच्या निधी व्यवस्थापकांचे धोरण फोकस्ड फंड असल्याने समभागकेंद्रित ‘हाय रिस्क, हाय रिटर्न’ या प्रकारचे होते. साहजिकच ज्या उद्योग क्षेत्रांची चलती होती त्या उद्योग क्षेत्रात ते अधिक गुंतवणूक करीत असत. विद्यमान निधी व्यवस्थापकांचे धोरण फंडाची गुंतवणूक ‘डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड’ या प्रकारची असल्याने निधी व्यवस्थापक मानदंडसापेक्ष कोणत्याही उद्योग क्षेत्रात अवास्तव गुंतवणूक करीत नाहीत किंवा नकारात्मक दृष्टिकोन असूनदेखील एखादे उद्योग क्षेत्र गुंतवणुकीतून पूर्ण वगळत नाहीत. गुंतवणुकीचे सुधारित धोरण समभाग केंद्रित, परंतु उद्योग क्षेत्र विकेंद्रित प्रकारचे आहे. याचे परिणाम फंडाच्या कामगिरीत दिसू लागले असून सहा महिने, तीन महिने आणि एक महिना कालावधीत फंड पहिल्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असून फंड अनुक्रमे पाचव्या आणि बाराव्या क्रमांकावर आहे. फोकस्ड फंड गटाच्या मागील एका वर्षांच्या ‘एसआयपी’ कामगिरीत अव्वलस्थानी असलेल्या या फंडाची नवीन वर्षांची पहिली शिफारस करीत आहे.

गुंतवणुकीचे ध्रुवीकरण %

नोव्हें. २०१९    ऑक्टो. २०१९   सप्टें.२०१९

समभाग संख्या             ३०                ३०             २९

आघाडीच्या पाच गुंतवणुका ३९.७७        ४२.२२          ४४.४४

आघाडीच्या १० गुंतवणुका  ५९.५५         ६१.७१         ६३.५५

आघाडीच्या १५ गुंतवणुका  ७३.९६        ७४.५०        ७५.९८

एकरकमी गुंतवणुकीवरील वार्षिक परतावा*

गुंतवणुकीची तारीख      %

१ जानेवारी २०१५        ९.२४

१ जानेवारी २०१६       १०.७८

१ जानेवारी २०१७        १२.६४

१ जानेवारी २०१८        ५.९१

१ जानेवारी २०१९        १७.३६

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंबंधित माहिती देणारे साप्ताहिक सदर

shreeyachebaba@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 4:02 am

Web Title: dsp focus fund gopal agarwal abn 97
Next Stories
1 अर्थ वल्लभ : ध्रुवीकरणाचा अतिरेक झालेले वर्ष
2 क.. कमॉडिटीचा : सोयाबीन, मोहरीची पाच हजारी मुसंडी?
3 नियमित वेतन, तेही सेवानिवृत्तीपश्चात!
Just Now!
X