|| वसंत माधव कुळकर्णी

एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड

‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल व्हॅल्यू’ हे फंडाच्या यशाचे सूत्र..मिड कॅप फंड असल्याने चौकटीबाहेरच्या काही वेगळ्या समभागांत गुंतवणूक करण्याचे धारिष्टय़ निधी व्यवस्थापकांनी दाखविल्याचे आढळते. समभाग निवडीत निधी व्यवस्थापक अत्यंत चोख आणि चोखंदळही!

जानेवारीपासून लार्ज कॅप निर्देशांकाच्या तुलनेत मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अधिक घसरण झाली आहे. सध्याचे मिड कॅप मूल्यांकन नव्याने गुंतवणुकीचा विचार करण्याच्या पातळीवर आले आहे. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’च्या सुधारित यादीत नव्याने समाविष्ट झालेल्या एचडीएफसी मिड कॅप अपॉच्र्युनिटीज फंडाची ही ओळख. वटवृक्षाच्या छायेत अन्य झाडे रुजत नाहीत. म्हणूनच कदाचित प्रशांत जैन नावाच्या लार्ज कॅप गुंतवणुकीतील कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या छायेत असल्याने, मिड कॅप, स्मॉल कॅप फंडांची लखलखीत कामगिरी असतानाही चिराग सेटलवाड हे फारसे माहितीतील नाव बनलेले नाही. एचडीएफसी फंड घराणेदेखील चिराग सेटलवाड यांचे एचडीएफसी मिड कॅप अपॉच्र्युनिटीज आणि एचडीएफसी स्मॉल कॅप फंडांची फारशी जाहिरात करत असल्याचे दिसत नाही. म्युच्युअल फंडांशी संबिंधत वेगवेगळ्या मंचावर किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर एचडीएफसी फंड घराण्यांचे प्रतिनिधित्व प्रशांत जैन करीत असतात. परंतु मिड कॅप गुंतवणुकीतील कसबी निधी व्यवस्थापक म्हणून जाणत्या गुंतवणूकदारांमध्ये चिराग सेटलवाड हे ओळखले जातात. एचडीएफसी मिड कॅप अपॉच्र्युनिटीज फंडाची पहिली एनएव्ही २५ जून २००७ रोजी जाहीर झाली. या फंडात सुरुवातीपासून दरमहा १,००० रुपयांच्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या १.३७ लाखाचे १ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.१५ लाख रुपये झाले आहेत. या गुंतवणुकीवरील परताव्याचा वार्षिक दर १५.५२ टक्के आहे.

निधी व्यवस्थापक म्हणून समभाग निवडण्यात चिराग सेटलवाड हे अत्यंत चोखंदळ आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत मागील वर्षभरात ६५ समभागांचा समावेश राहिला आहे. समभाग निवडीसाठी निधी व्यवस्थापकांचा भर प्रामुख्याने समभाग संशोधन, कंपनीचा ताळेबंद, व्यवसाय वृद्धीची आणि उत्सर्जनाची शाश्वतता यावर आहे. एखाद्या कंपनीत गुंतवणूक करून दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यावर निधी व्यवस्थापनाचा भर आहे. सुंदरम फास्टनर्स, बालकृष्ण इंडस्ट्रीज या आघाडीच्या गुंतवणुका निधी व्यवस्थापकांच्या दूरदृष्टीची प्रचीती देतात. ‘ग्रोथ अ‍ॅट रिझनेबल व्हॅल्यू’ हे फंडाच्या यशाचे सूत्र आहे. मिड कॅप फंड असल्याने मानदंड निर्देशांकात असलेल्या समभागांपेक्षा वेगळ्या समभागांत गुंतवणूक करण्याचे धारिष्टय़ निधी व्यवस्थापकांनी दाखविल्याचे आढळते. रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्ससारख्या आपल्या नजीकचा स्पर्धक असलेल्या म्युच्युअल फंडाला गुंतवणुकीत स्थान देण्याचा उमदेपणा निधी व्यवस्थापकांनी दाखविला आहे. समभाग मूल्यांकन हा निकष असल्याने हे शक्य झाले असावे. एचडीएफसी फंड घराण्याला गुंतवणुकीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे असलेले आकर्षण या फंडाच्या गुंतवणुकीतसुद्धा दिसून येते. युनियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक मागील दहा वर्षांपासून या फंडाच्या गुंतवणुकीत आहेत. मागील वर्षभरातील बालकृष्ण इंडस्ट्रीज आणि अरविंद लिमिटेड, अपोलो टायर्ससारख्या गुंतवणुकांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. फंडाचा मानदंड निर्देशांक ‘निफ्टी मिड कॅप १०० टीआरआय’ आहे. ‘सेबी’च्या फंड प्रमाणीकरणानंतर समभागाच्या नवीन वर्गीकरणानुसार एकूण गुंतवणुकीच्या ७५ टक्के गुंतवणूक मिड कॅप समभागात केली आहे. फंडाच्या परताव्याची चलत सरासरी, परताव्यातील सातत्य आणि मिड कॅप गटातील अन्य फंडाच्या तुलनेतील कामगिरीचा अंदाज बांधता येतो. फंडाच्या ३, ५ आणि ७ वर्षांच्या चलत सरासरीवरून फंडाची कामगिरी अन्य मिड कॅप फंडांपेक्षा उजवी असल्याचे दिसून येते. पाच वर्षांची सर्वाधिक चांगली कामगिरी या फंडाने १० मार्च २००९ ते ९ मार्च २०१४ या कालावधीत केली आहे. या कालावधीत फंडाने ३५ टक्के वार्षिक दराने परतावा दिला आहे. तर ७ जानेवारी २००८ ते ६ जानेवारी २०१३ या कालावधीत सर्वात सुमार कामगिरीची नोंद केली आहे. या कालावधीत फंडाने केवळ ७.१४ टक्के वार्षिक परतावा दिला. चिराग सेटलवाड यांच्या निधी व्यवस्थापनाच्या कालावधीत २५ जून २००७ रोजी केलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे १ नोव्हेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ५.१५ लाख रुपये झाले आहेत. या कालावधीत फंडाने १५.२२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. याचा दुसरा अर्थ असा की दर ४.५ वर्षांत फंडात गुंतविलेली रक्कम दुप्पट झाली आहे.

वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर या फंडाचा समावेश नव्याने तयार केलेल्या ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’च्या सुधारित यादीत केला आहे. या फंडाची निवड करण्यामागे फंडाने परताव्यात राखलेल्या सातत्याबरोबरीने जोखीम परतावा गुणोत्तर (शार्प रेशो) हा त्याच्या समावेशाचा महत्त्वाचा निकष आहे. समभाग गुंतवणुकीतील मिड कॅप गुंतवणूक ही सर्वाधिक जोखमेची असते. परंतु कमी कालावधीत गुंतवणूक दुप्पट करण्याची क्षमता मिड कॅप फंडातच असते. योग्य फंड निवड करून मिड कॅप गुंतवणुकीतील जोखमीची तीव्रता कमी करता येते. मिड कॅप फंडाची एकूण गुंतवणुकीत मात्रा किती असावी हे गुंतवणूकदाराच्या जोखमांकावर ठरते. त्यानुसार या फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करावयाचा आहे.