|| तृप्ती राणे

जीवनाच्या शर्यतीमधे आपण सगळे इतके व्यस्त झालो आहोत की ‘उमर पतीस की, दिल पचपन का’ असं म्हणायची वेळ आली आहे. आणि म्हणूनच निवृत्तीचं वय आता पन्नाशीकडे झुकायला लागलंय!

गेल्याच आठवडय़ाची गोष्ट! रविवार असल्यामुळे सगळं कसं आरामात चाललं होतं. परीक्षेचा काळ असल्यामुळे आम्ही सगळेच माझ्या मुलाचा अभ्यास करत होतो. त्याची अल्जेब्राची गणितं कोणत्या पद्धतीने त्याला शिकवायची यावर आमच्या घरात इतकी तीव्र आणि गहन चर्चा चालली होती की जणू देशाचं आर्थिक धोरण बनवायचंय!

तितक्यात फोन वाजला. दुसरीकडे माझी मत्रीण होती. वाटलं की काही तरी इमर्जन्सी म्हणून फोन केला असेल, कारण रविवारी दुपारच्या आधी उठणं म्हणजे त्यांच्या घरी गुन्हा आहे! मी काही म्हणायच्या आत तिने सुरू केले – ‘‘अगं, ऐक ना! हा अमेय बघ काय म्हणतोय! मी त्याला समजावलं, पण तो काही ऐकतच नाहीये. असं कसं वागू शकतो तो? कुणाचाच विचार नाही केला त्याने. गेले दोन दिवस आम्ही दोघे यावर नुसते भांडतोय. पण काही कळतंच नाहीये. शेवटी तुला त्रास द्यायचं ठरवलं. सांग ना मी काय करू? झोपच उडून गेली आहे माझी..’’

थोडा श्वास घेण्यासाठी ती थांबली आणि मला मध्ये बोलायची एक संधी मिळाली. म्हटलं – ‘‘स्वरा, जरा सांगशील का नक्की काय करतोय अमेय? तू जेवढं काही म्हणालीस त्यात हे नाही सांगितलंस.’’

त्यावर पटकन ती म्हणाली – ‘‘अगं, सॉरी-सॉरी. तुला मूळ मुद्दाच सांगितला नाही. हा अमेय ना गेले काही दिवस सारखा म्हणतोय की रिटायर होतो. नोकरीचा खूप कंटाळा आला आहे. म्हणे स्वतचा काही तरी बिझनेस करावासा वाटतो. मला समजत नाहीये कुठून मेली ही दुर्बुद्धी सुचतेय त्याला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून काय त्या बिझनेसचं खूळ डोक्यात घेऊन बसलाय. बरं, आपली दोन मुलं आहेत ज्यांचं सगळं शिक्षण व्हायचंय, पुढे लग्न, माझी हौस-मौज तर जाऊ दे, कशाचा त्याने विचार केला नाही. असं वागतो का एखादा कुटुंब असलेला माणूस? असं म्हणून तिने फोनवर चक्क रडायला सुरुवात केली.’’

मामला चांगलाच गंभीर असल्याने मी तिला फोनवर सल्ला द्यायचा टाळला आणि संध्याकाळी भेटू या म्हणून आश्वासन दिलं. अमेय आणि स्वरा ही दोघंही मत्रीच्या नात्याने माझी खूप जवळची. स्वतचं असं काहीही नसताना, अतिशय जिद्दीने दोघांनी त्यांचा संसार उभा केला. त्यामुळे असं काही अमेयच्या डोक्यात इतक्यात येईल हे माझ्यासाठीसुद्धा एक आश्चर्य होतं.

संध्याकाळी जेव्हा दोघांना भेटले, तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं. अमेयला स्वतचं काही तरी करायची इच्छा खूप आधीपासून होती. परंतु खिशात पसे नाही म्हणून त्याने नोकरीला पहिलं प्राधान्य दिलं. गेली २० र्वष कुणाचाही आधार किंवा मार्गदर्शन नसताना नोकरी सांभाळून त्याने कुटुंबाची व्यवस्थित सोय बघितली. पण आता तो कंपनीमध्ये एका अशा ठिकाणी येऊन पोहोचला होता की, जिथून पुढे त्याला फार काही वाढ दिसत नव्हती. आणि म्हणून त्याची चुळबुळ सुरू झाली. आणि त्याने अगदी मनापासून कबूल केलं की, इतकी र्वष सातत्याने काम करून त्याला वीट आला होता. रोज ऑफिसला जाऊन तेच प्रॉब्लेम, तीच मारामारी हे सगळं नकोसं झालं होतं. आणि त्यात भर पडली ती ‘अर्ली रिटायरमेंट’ घेतलेल्या काही सहकाऱ्यांची. त्या लोकांनी नोकरी सोडून स्वतचे छोटे-छोटे व्यवसाय सुरू केले होते आणि त्यांचं सगळं कसं मस्त चाललंय ही भावना अमेयच्या डोक्यात घर करून होती. स्वराने त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला, पण दोघांचे स्वभाव रागीट असल्यामुळे काही केल्या त्यांच्यात नीट संभाषण होत नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्या घरातलं वातावरण बिघडलेलं होतं.

खरं पाहायला गेलं तर आजच्या या तणावपूर्ण वातावरणात डोकं शांत ठेवून सातत्याने नोकरी करणं, हे एक मोठं आव्हान झालेलं आहे. आला दिवस माणूस नुसता जणू रगडला जातोय. स्वतचं स्टेट्स वाढवायच्या शर्यतीमधे आपण सगळे इतके व्यस्त झालो आहोत की,  ‘उमर पतीस की, दिल पचपन का’ असं म्हणायची वेळ आली आहे. आणि म्हणून रिटायरमेंटचं वय आता पन्नाशीकडे झुकायला लागलंय! अमेयसारखी अशी अनेक मंडळी आपल्या आजूबाजूला दिसतात जी ‘अर्ली रिटायरमेंट’चा पर्याय पत्करायच्या विचारात आहेत. तर अशा मंडळींसाठी आजचा हा लेख.

  • अर्ली रिटायरमेंटचं सर्वात पहिलं आव्हान आहे ते पुरेसा निवृत्ती निर्वाहनिधी असणं. आपण साठीत रिटायर होतो तेव्हा पुढे साधारणपणे २०-२५ वर्षांच्या काळासाठी सोय करतो. परंतु जर रिटायरमेंट पन्नाशीत घ्यायची असेल, तर पुढे ३०-३५ वर्षांचा मोठा काळ लक्षात घ्यायला हवा.
  • साधारणपणे साठीपर्यंत कौटुंबिक जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, त्यामुळे नंतर आरोग्याव्यतिरिक्त कुठलेही मोठे खर्च नसतात. पण आजकाल लग्न आणि मुलं दोन्ही उशिरा झाल्याने तसंही हे समीकरण बदलत चाललंय. त्यात जर मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं, स्वतचं घर असे सगळे खर्च रिटायरमेंटनंतर भागवावे लागले तर तारेवरची कसरत. जर व्यवस्थित आर्थिक नियोजन केलेलं नसेल तर पसे कमी पडण्याची शक्यता जास्त असते.
  • आर्थिक नियोजन करताना आपण काही अंदाज बांधून मग आकडेमोड करतो. परंतु दीर्घावधीसाठी अंदाज बांधताना कमी जास्त होऊ शकतं. तेव्हा ३०-३५ वर्षांसाठी नियोजन करताना सेफ्टी मार्जनि जास्त ठेवावं लागतं. उदाहरणार्थ, घरखर्च जर २५,००० रुपये असेल तर ३०,००० रुपये इतका धरावा आणि मग त्यावर महागाई लावावी.
  • जे कुणी नवीन व्यवसाय करू इच्छितात त्यांनी तर पहिला निर्वाह निधी बाजूला काढून, मग व्यवसायासाठी तरतूद करावी. शिवाय व्यवसायाला किती पसा लागणार यासाठी तर अजून चांगलं आर्थिक नियोजन व्हायला हवं. व्यवसायात यश मिळालं तर छान. परंतु काही कारणाने अपयश आलं तर किमान पुढच्या आयुष्यासाठी तरतूद आहे याची खात्री असणं महत्त्वाचं.
  • प्रत्येक व्यवसायात जोखीम ही आलीच. आणि उडी मारल्याशिवाय दुसरा पर्याय नसतोच. तेव्हा उडी मारायच्या आधी, आपल्याला पोहता येतं का? – हा प्रश्न नक्की विचारा. पुढचं पुढे बघू म्हणून सगळंच नशिबावर सोडू नका. ‘शक्य अशक्य विचार सुज्ञे करावा निरंतर’ हे श्री गजानन महाराजांचे बोधवाक्य नेहमीच ध्यानात ठेवा आणि जोखीम कशी हाताळता येईल याचा पुरेपूर आढावा घ्या.
  • तुमच्या व्यवसायातील देयकांचा तुमच्या वैयक्तिक निधीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घ्या. त्यानुसार तुमचं वैयक्तिक आणि व्यवसायाचं आर्थिक नियोजन करा. नाहीतर सगळं कमावलेलं गमवायची वेळ येऊ शकते!

तेव्हा ‘अर्ली रिटायरमेंट’चा पर्याय निवडताना वरील सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार करा आणि त्या अनुषंगाने पुढचं पाऊल उचला. शेवटी आयुष्यात पशाबरोबर आनंद आणि समाधान दोन्ही आवश्यक आहेत.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)