अजय वाळिंबे

हुतामाकी पीपीएल लिमिटेड म्हणजे पूर्वाश्रमीची पेपर प्रोडक्टस लिमिटेड. हुतामाकी पीपीएल लिमिटेड (एचपीपीएल) वार्षिक ३०० दशलक्ष  युरोसह प्रायमरी कन्झ्युमर पॅकेजिंग आणि लेबिलग मटेरियलची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी आहे. जपानवगळता मोठय़ा आफ्रिका-भारत-एशिया पॅसिफिक प्रदेशातील तयार फ्लेक्सिबल पॅकेजिंगच्या क्षेत्रातील सर्वात मोठी बहुराष्ट्रीय उत्पादक कंपनी आहे.

एचपीपीएलने २०१२ मध्ये फार्मास्युटिकल्स क्षेत्रातील वेबटेकच्या लेबल उत्पादक कंपन्यांमध्ये भारतातील आघाडीच्या उत्पादक कंपनीत ५१ टक्के हिस्सेदारी संपादन केली, तर २०१५ मध्ये एचपीपीएलने पॉझिटिव्ह पॅकेजिंग इंडिया लिमिटेडचे १०० टक्के अधिग्रहण करून ती कंपनी ताब्यात घेतली.

कंपनीने पॅकेजिंग सोल्यूशन्सची विस्तृत श्रेणी तयार केली असून त्यात फ्लेक्सिबल पॅकेजिंग तसेच विविध प्रकारचे पाऊचिंग सोल्यूशन्स, लेबिलग तंत्रज्ञान, आकुंचन सोल्यूशन्स, विशेष कार्टन, पॅकेजिंग मशीन, टय़ूब लॅमिनेट्स, प्रमोशनल, होलोग्राफिक आणि सिक्युरिटी सोल्यूशन्स, सिलेंडर्स इ. चा समावेश होतो.

एचपीपीएलची अंबरनाथ, बेंगळुरू, गुवाहाटी, हैदराबाद, खोपोली, नवी मुंबई, परवानू, रूद्रपूर, सिक्कीम, सिल्व्हासा, तळोजा, ठाणे अशा देशभरात १५ ठिकाणी संपूर्णपणे एकत्रित उत्पादन सुविधा आहेत. २०१८ मध्ये कंपनीने सिक्कीम आणि गुवाहाटी येथे करमुक्त झोनमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प उभारले आहेत. तांत्रिक उत्कृष्टता आणि उत्कृष्ट गुणवत्ता तसेच नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स विकसित करण्याच्या हातोटीमुळे कंपनीच्या मुख्य ग्राहकांच्या मांदियाळीत ब्रिटानिया, गोदरेज, कोका-कोला, फेरेरो, ग्लॅक्सो स्मिथक्लाइन, मॅरिको, मोन्डेलेझ, नेस्ले, पेप्सिको, पी अ‍ॅण्ड जी, हिंदुस्तान युनिलिव्हर आदिंचा समावेश होतो.

गेल्या दोन वर्षांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती तसेच रुपयाची झालेली घसरण याचा विपरीत परिणाम कंपनीच्या कामकाजावर झालेला दिसतो. मात्र यंदाच्या वर्षांत कंपनीची स्थिती सुधारत असून जून २०१९ साठी संपलेल्या सहामाहीत कंपनीने विक्रीत १० टक्के वाढ करून ती १,२६३.१६ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ११८ टक्के वाढ होऊन तो ६९.९६ कोटींवर गेला आहे. एफएमसीजी उद्योगातील फ्लेक्सिबल पॅकेजिंगची वाढती मागणी, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम अनुभवी प्रवर्तक यामुळे आगामी कालावधीत देखील कंपनीची वाटचाल उत्तम राहील,अशी आशा वाटते. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून हुतामाकी पीपीएल आकर्षक खरेदी ठरू शकेल.

हुतामाकी पीपीएल लि.

शुक्रवारचा बंद भाव : रु. २४५.००

(बीएसई कोड – ५०९८२०)

स्मॉल कॅप समभाग

प्रवर्तक : हुतामाकी समूह, फिनलंड

व्यवसाय : पेपर, पॅकेजिंग

बाजारभांडवल:  रु. १,८५२ कोटी

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक:     रु.  २९०/१५५

भागभांडवल:  रु. १५.१ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक  ६६.९४

परदेशी गुंतवणूकदार  ५.६७

बँका/ म्यु. फंड  ०.५३

जनता    २६.३६

पुस्तकी मूल्य : रु. ७९.३०

दर्शनी मूल्य :   २/-

लाभांश :  १५०%

प्रति समभाग उत्पन्न :    रु. ९.०८

पी/ई गुणोत्तर : २५.४

समग्र पी/ई गुणोत्तर :    ६

डेट इक्विटी गुणोत्तर :    ०.०८

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ५.३७

रिटर्न ऑन कॅपिटल :     १५.२२

बीटा :    ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.