प्रवीण देशपांडे

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचे अनुपालन करणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर खात्याने नुकतीच अनुपालनाच्या तरतुदींची मुदत वाढवत असल्याची केली आहे. या मुदतवाढीमुळे करदात्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. नेमक्या कोणत्या तरतुदींना मुदतवाढ मिळालेली आहे हे करदात्याने समजून घेतले पाहिजे.

* २०२०-२१ या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीच्या उद्गम कराचे विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ मे २०२१ ही होती आणि उद्गम कराचे प्रमाणपत्र ‘फॉर्म १६’ देण्याची मुदत १५ जून २०२१ ही होती. ती आता अनुक्रमे ३० जून आणि १५ जुलै २०२१ अशी करण्यात आलेली आहे; पण यामुळे पगारदार करदात्यांना फॉर्म १६ मिळण्यास १५ जुलैपर्यंत वाट बघावी लागेल.

*  ज्या करदात्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) बंधनकारक आहे अशांना विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२१ होती ती आता ३० नोव्हेंबर २०२१ करण्यात आली आहे. अन्य करदात्यांना ३१ जुलैपर्यंत विवरणपत्र दाखल करावे लागत होते त्यांना आता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत दाखल करता येईल.

*  विवरणपत्र भरण्याची मुदत जरी वाढवली असली तरी काही करदात्यांना कर भरण्यासाठी ही मुदतवाढ लागू नाही. ज्या करदात्यांचा देय कर (अग्रिम कर, उद्गम कर, कलम ८९ नुसार कर सवलत वजा जाता) १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा करदात्यांना मात्र त्यांचा कर ३१ जुलै २०२१ पूर्वीच भरावयाचा आहे, अन्यथा त्यांना व्याज भरावे लागेल. जे निवासी भारतीय करदाते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाचा समावेश नाही अशांनासुद्धा ही तरतूद लागू आहे आणि त्यांनी ३१ जुलैपूर्वी भरलेला कर हा अग्रिम कर म्हणून समजला जाईल. त्यामुळे अशा ज्येष्ठ नागरिकांना हे १ लाख रुपये करदायित्व गणताना ३१ जुलैपर्यंत भरलेला कर वजा करता येईल.

*  मागील वर्षीसुद्धा विवरणपत्र भरण्याच्या मुदतीत वाढ केली होती आणि कर भरण्यासंबंधी अशीच तरतूद होती. या तरतुदीची माहिती नसल्यामुळे अनेक करदात्यांनी व्याज भरले होते. या वर्षी असे करदाते कर वेळेत भरून व्याज वाचवू शकतात.

*  या वर्षीच्या अंदाजपत्रकात सुचविलेल्या बदलानुसार मुदतीनंतर दाखल करण्यात येणारे विवरणपत्र (विलंब शुल्क भरून) किंवा सुधारित विवरणपत्र दाखल करण्याची मुदत कमी करून ३१ डिसेंबर करण्यात आली होती. २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी (अपवाद म्हणून) ही मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढविली आहे.

याशिवाय एक नवीन घोषणा करण्यात आली. सध्याचे प्राप्तिकर खात्याचे विवरणपत्र भरण्यासाठीचे संकेतस्थळ १ ते ६ जून २०२१ या कालावधीसाठी बंद राहणार आहे आणि ७ जूनपासून नवीन सुविधा असलेले संकेतस्थळ वापरता येईल.

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांकडे वळू या.

’ प्रश्न : मी काही कारणाने २०१९-२० या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र भरू शकलो नाही. ते मला भरता येईल का?

  – रमेश बापट

उत्तर : २०१९-२० या आर्थिक वर्षांचे विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपली; परंतु टाळेबंदीमुळे ही मुदत आता ३१ मे २०२१ करण्यात आलेली आहे. त्यामुळे उरलेल्या आठवडय़ाभराच्या कालावधीत आपण विलंब शुल्क भरून विवरणपत्र दाखल करू शकता. तसेच ज्या करदात्यांना २०१९-२० या वर्षांचे सुधारित विवरणपत्र भरावयाचे आहे तेदेखील ३१ मेपर्यंत सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतात.

’ प्रश्न : माझ्याकडे दोन घरे आहेत. एक राहते घर आणि दुसरे घर मी भाडय़ाने दिले आहे. मला दरमहा १५,००० रुपये भाडे मिळते. दोन्ही घरांच्या खरेदीसाठी मी गृहकर्ज घेतले आहे. या दोन्ही गृहकर्जावरील व्याजाची वजावट उत्पन्नातून मला घेता येईल का? याला काही मर्यादा आहे का?

 – एकनाथ पांडे

उत्तर : आपल्याला दोन्ही गृहकर्जाच्या व्याजाची वजावट उत्पन्नातून घेता येईल. जे आपले राहते घर आहे त्यासाठी आपल्याला २ लाख रुपयांपर्यंत वजावट घेता येईल (३१ मार्च १९९९ पूर्वी घेतलेल्या कर्जासाठी ही मर्यादा ३०,००० रुपये इतकी आहे). जे दुसरे घर आपण भाडय़ाने दिले आहे, त्या घराच्या गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीवर कोणतीही मर्यादा नाही; परंतु दोन्ही घरांसाठी ‘घरभाडे उत्पन्न’ या स्रोतातील तोटा २ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर फक्त २ लाख रुपयांचा तोटा आपल्याला इतर उत्पन्नातून वजा करता येईल आणि बाकी शिल्लक तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करावा लागेल.

’ प्रश्न : मला २०२०-२१ या आर्थिक वर्षांत समभागाच्या विक्रीतून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला तसेच अल्प मुदतीचा भांडवली तोटा झाला आहे. मी हा अल्प मुदतीचा भांडवली तोटा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकतो का?

– सुरेश पाटील

उत्तर : दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. मात्र अल्प मुदतीचा भांडवली तोटा हा अल्प मुदतीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. त्यामुळे आपल्याला अल्प मुदतीचा तोटा दीर्घ मुदतीच्या नफ्यातून वजा करता येईल. या वर्षी तोटा पूर्णपणे वजा होत नसेल तर तो पुढील वर्षी कॅरी-फॉरवर्ड करावा लागेल.

’ प्रश्न : मी एक डॉक्टर आहे आणि नुकताच वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातील २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील माझी उलाढाल २० लाख रुपये इतकी आहे. भाडे, पगार, औषधे, इत्यादी खर्च १२ लाख रुपये इतका आहे आणि नफा ८ लाख रुपये आहे. मला लेखे ठेवणे बंधनकारक आहे का?

– एक वाचक

उत्तर : आपला व्यवसाय, प्राप्तिकर कायद्यानुसार ‘ठरावीक व्यवसाय’ म्हणून समजला जातो म्हणून आपल्याला ‘कलम ४४ एडीए’नुसार किमान नफा उलाढालीच्या ५० टक्के दाखविणे अपेक्षित आहे. या कलमानुसार नफा उलाढालीच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दाखविल्यास आपल्याला लेखे ठेवणे बंधनकारक नाही. नफा उलाढालीच्या ५० टक्कय़ांपेक्षा कमी दाखविल्यास आपल्याला लेखे ठेवणे बंधनकारक तर आहेच शिवाय आपल्याला लेख्यांचे परीक्षण (ऑडिट) करून घेणेसुद्धा बंधनकारक आहे.

* लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com