|| दीपक गोडबोले

विम्याची पॉलिसी ही विमा कंपनी आणि पॉलिसीधारक यांच्यातील एक करार आहे. भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात विमा कंपनी संरक्षित व्यक्तीला ठरावीक आपत्ती घडल्यास विशिष्ट रक्कम देण्यास बांधील असते.

जबाबदार व कमावत्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास जीवन विमा कंपनी त्याच्या वारसास ठरावीक रक्कम अदा करते व कुटुंबाला आधार मिळतो. तसेच एखादा महत्त्वाचा ऐवज, मोटार कार, व्यवसाय काही अंशी किंवा संपूर्ण नष्ट झाल्यास सर्वसाधारण विमा कंपनी करारानुसार आधी ठरलेली रक्कम त्या ऐवजांच्या मालकाला देते.

विद्यमान कायद्यांनुसार भारतात एकाच कंपनीला जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा असो, दोन्ही व्यवसाय करण्यास मज्जाव आहे. म्हणजेच, जीवन विमा व्यवसाय करणाऱ्या व सर्वसाधारण विमा करणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या असाव्या लागतात. त्याला कारणही तसेच आहे. जीवन विमा व सर्वसाधारण विमा हे दोन्ही व्यवसाय खूप बाबतीत भिन्न आहेत. सर्वसाधारण विम्याची पॉलिसी दीर्घकालीन असते, तर सर्वसाधारण विमा एक वर्षासाठीच वैध असतो व दरवर्षी त्याचे नूतनीकरण करावे लागते. जीवन विम्याचा दावा आधीच ठरलेल्या किंवा पूर्वनिर्धारित केलेल्या रकमेचा (assurance) असतो, मात्र, सर्वसाधारण विम्याचा दावा झालेल्या नुकसानीची मर्यादित भरपाई (indemnification) करणारा असतो .

कुटुंबाला आधार व मानसिक शांतता तसेच व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी विम्याची आवश्यकता आहेच; पण कर बचत, कर्जासाठी तारण इ. कारणांसाठीदेखील विम्याची उपयुक्तता आहे. भारतीय विमा क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असताना त्याबाबत व त्याच्याशी संलग्न असणाऱ्या संस्थांबद्दल माहिती करून घेऊ या.

भारतीय विमा जगतात सध्या २४ जीवन विमा कंपन्या, तर ३४ सर्वसाधारण विमा कंपन्या तसेच एक पुनर्विमा कंपनी कार्यरत आहे. जीवन विमा कंपन्या जीवन विमा व पेन्शनचा व्यवहार, तर सर्वसाधारण कंपन्या जीवन विम्याव्यतिरिक्त व्यवसाय करतात. सर्वसाधारण कंपन्यांतील काही कंपन्या आरोग्य विमा तसेच एक कंपनी कृषी विम्याचा व्यवसाय करत आहे. पुनर्विमा कंपनी भारतातील तसेच अन्य देशातील विमा कंपन्यांच्या व्यवसायाला बळकटी प्रदान करते.

विमा कंपन्यांव्यतिरिक्त भारतीय विमा क्षेत्रात अनेकविध संस्था कार्यरत आहेत. त्यात विमा नियामक, प्रशिक्षण संस्था, अन्य सेवा प्रदान करणारे घटक यांचा समावेश होतो. जसे बँकिंगसाठी भारतीय रिझर्व्ह बँक तसे भारतीय विमा विकास व नियामक प्राधिकरण (इर्डा) ही संस्था विमा क्षेत्राचे नियंत्रण करते. वेळोवेळी नियम बनवून आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करून इर्डा भारतातील विमा व्यवसायाची व्यवस्थित वाढ आणि ग्राहक संरक्षण यांची काळजी घेते. सरकारी, खासगी आणि विदेशी सहभाग असणाऱ्या, अशा सर्व विमा कंपन्यांच्या व्यवहारांचे नियंत्रण भारतीय विमा नियामकातर्फे म्हणजेच इर्डातर्फे केले जाते. इर्डातर्फे एकात्म तक्रार व्यवस्थापन यंत्रणा ‘आयजीएमएस’ सुरू केली गेली आहे. इर्डाकडून विमा ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी भारतभर विमा लोकपालाचीदेखील तरतूददेखील केली गेली आहे.

विमा क्षेत्रात अनेक जण कार्यरत असतात. त्यात अ‍ॅक्च्युअरी, अंडररायटर, क्लेम्स मॅनेजर, एजंट, ब्रोकर, थर्ड पार्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेटर (टीपीए), सर्व्हेयर आदींचा समावेश होतो.

अ‍ॅक्च्युरिअल सोसायटी ऑफ इंडियाच्या परीक्षेत सफलता मिळाल्यावर विमा कंपनीत ‘अ‍ॅक्च्युअरी’च्या पदावर विराजमान होता येते. ‘अ‍ॅक्च्युअरी’ हा विमा कंपनीसाठी एक महत्त्वाचा घटक असून विम्याच्या नवनव्या पॉलिसींची रचना करण्याची महत्त्वाची भूमिका ते निभावतात. नवीन विमा पॉलिसी निर्माण करण्याचे व पॉलिसीला नवीन रूप देण्याचे काम अंडररायटर पाहतात, तर क्लेम सेटलमेंटचे काम क्लेम्स मॅनेजर पाहतात. अंडररायटर व क्लेम मॅनेजरना विम्याविषयी सखोल ज्ञान असणे अपेक्षित आहे. पात्र पदवीधारकच हे काम करू शकतात. भारतात काही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये विम्याविषयीचा अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिकवला जातो आणि विमा कंपन्या अशा उमेदवारांना प्राधान्याने नोकरी देऊ पाहतात. पुणे येथील नॅशनल इन्शुरन्स अ‍ॅकॅडमी (एनआयए) तर्फे  दोन वर्षांचा विम्यातील विशेषज्ञता असणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणाऱ्या नॅशनल इन्शुरन्स अ‍ॅकॅडमी (एनआयए) आणि इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आयआयआय) सारख्या संस्था कार्यरत असल्याने विम्याची इत्थंभूत माहिती असलेले कर्मचारी भारतीय विमा कंपन्यांमध्ये आपली कामगिरी चोख निभावत आहेत. बँक कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या व्यावसायिक ज्ञानविकासासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (आयआयबीएफ) तर्फे  जशा जेएआयआयबी व सीएआयआयबी परीक्षा घेतल्या जातात, त्याप्रमाणेच विमा क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आयआयआय) तर्फे licentiate, Associateआणि fellowship परीक्षांचे आयोजन केले जाते.

विम्याचे महत्त्व व पॉलिसीची माहिती संभाव्य ग्राहकाला विमा एजंट व ब्रोकर करून देतात. त्यांना विम्याविषयीची माहिती करून देणारे वाचनसाहित्य निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व कामकाज सुरू करण्याआधी त्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी विमा नियामकाने इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आयआयआय)वर सोपविली आहे. काही वेळा विम्याच्या दाव्याबाबत छाननी करणे गरजेचे ठरते व ते काम चिकित्सा परीक्षक/ सर्वेक्षण अधिकाऱ्याकडे (सर्व्हेयर, लॉस असेसर) सोपविले जाते. मोटर, फायर, मरीन इ. दाव्यांचे निरीक्षण करून सर्व्हेयर आपला अहवाल विमा कंपन्यांना सादर करतात. ज्याद्वारे कंपन्यांना क्लेम सेटलमेंट करण्यास मदत मिळते. भारतात विमा सर्व्हेयरची ‘इस्ला’ नावाची संघटना आहे व इस्लाच्या सदस्य सर्व्हेयरनादेखील नॅशनल इन्शुरन्स अ‍ॅकॅडमी (एनआयए) आणि इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (आयआयआय) कडून प्रशिक्षण घेणे व परीक्षा उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे.

लेखक भारतीय विमा संस्थान, मुंबईचे सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यरत

secretarygeneral@iii.org.in

लेखातील विचार ते प्रतिनिधित्व करत असलेल्या संस्थेचे नसून लेखकाचे स्वत:चे आहेत.