|| अजय वाळिंबे

ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही सुप्रसिद्ध ल्युमॅक्स समूहाच्या डी. के. जैन समूहाची कंपनी. गेली तीस वर्षे कंपनी वाहनांच्या विविध सुटय़ा भागांचे उत्पादन करीत असून ती ओईएमना पुरवठा करते. कंपनीचे पाच राज्यांत १३ उत्पादन प्रकल्प असून एक स्वतंत्र संशोधन विभागदेखील आहे. कंपनीने १९८१ मध्ये महाराष्ट्रात दुचाकी वाहनांसाठी दिव्यांचे उत्पादन सुरू करून आपला पहिला प्रकल्प सुरू केला. त्यानंतर गेल्या २७ वर्षांत कंपनीने जैविक (ऑरगॅनिक) विस्तार केला आहे. आज कंपनी तिच्या साहाय्यक आणि उपकंपन्यांद्वारे दोन, तीन आणि चार-चाकी वाहनांच्या विविध प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती करते. भारतातील काही एकीकृत स्वयंघटक उत्पादकांपकी एक म्हणून ती ओळखली जाते, ज्यात मजबूत आर अँड डी क्षमता, तांत्रिक कौशल्य, डिझाइन कौशल्य आणि पर्याप्त उत्पादन क्षमतेचा समावेश आहे. उल्लेखनीय म्हणजे इलेक्ट्रिक कारसाठी गिअर लीव्हर्सची निर्मिती आणि पुरवठा करण्याची क्षमता असलेली ही एकमेव भारतीय कंपनी आहे. आपल्या विविध उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी कंपनीने अमेरिका, इटली, जपान, स्पेन, कोरिया आणि इस्रायल या देशांतील सहा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी भागीदाऱ्या केल्या आहेत. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत होंडा, बजाज, मारुती, फोक्सवॅगन, मिहद्र, टाटा, टोयोटा, फियाट, जनरल मोटर्स, टीव्हीएस इ. नामांकित कपन्यांचा समावेश होतो. कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करीत असून डिसेंबर २०१८ अखेर संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने २००.८६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८.८७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षांतील याच तिमाहीच्या तुलनेत तो २० टक्क्य़ांनी जास्त आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील युद्धाचे पडसाद आणि भारतातील निवडणुका यामध्ये शेअर बाजार होरपळून निघत आहे. इतर स्मॉल कॅपप्रमाणेच गेले काही दिवस ल्युमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीजच्या शेअरच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीचा शेअर खरेदीसाठी आकर्षक वाटत असला तरीही कंपनीचे मार्च २०१९ तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर ते तपासून मगच खरेदीचा निर्णय घ्यावा. आपल्या पोर्टफोलियोमध्ये मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी विचार करायला लावणारा हा स्मॉल कॅप शेअर आहे.

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत कंपनीचे मार्च तिमाही तसेच वार्षकि आर्थिक निकाल जाहीर झाले असतील. हा निकाल अभ्यासून मगच निर्णय घ्यावा आणि ज्या वाचक गुंतवणूकदारांना कुठलीही जोखीम घ्यायची नाही त्यांनी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कुठलीही गुंतवणूक टाळावी.

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.