23 January 2021

News Flash

बंदा रुपया : शेतकऱ्यांचा सोबती..

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

प्रदीप नणंदकर

मराठी मातीतील उद्यम-व्यवसायातील नवधुमाऱ्यांचा वेध घेणारे साप्ताहिक सदर ..

ठक्कर कुटुंबीय हे मूळचे गुजरात प्रांतातील. १९४८ च्या दरम्यान लातुरात आले. हेमराज ठक्कर यांचा २१ वर्षे बारदाण्याचा व्यवसाय होता. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर घरच्या व्यवसायात लक्ष घालणे आलेच. मात्र लातूरच्या लोकांना रोजगार देता येईल व इतरांपेक्षा काही वेगळा व्यवसाय करायचा ही जिद्द मनात होती. त्यातून ज्याच्याशी दुरान्वयानेही संबंध नाही, स्व-मालकीची शेती नाही अशा वेगळ्या क्षेत्रात त्यांनी कसब आजमावून पाहिले. १६ वर्षांत १९ राज्यांमध्ये खते, किटकनाशके, बुरशीनाशके यांच्या वितरणाचे जाळे उभारत १० लाख शेतकऱ्यांपर्यंत ठक्कर यांनी नाते निर्माण केले.

प्रारंभी पाच एकर जागेत सुरू झालेला कारखाना आता ११० एकर परिसरात आहे. दोन वर्षांपासून नीलेश ठक्कर यांचे चिरंजीव कुशल ठक्कर हे इंडस्ट्रीयल डिझायनरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायात लक्ष घालू लागले. मार्केटिंग व फायनान्स विभाग कुशल सांभाळतात.

२००१ साली सर्वोच्च न्यायालयात ओला कचरा व सुका कचरा वेगळा करावा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे यासाठीच्या याचिकेवर निकाल लागला. त्यात न्यायालयाने दोन वर्षांत देशातील सरकारांनी ओला कचऱ्यावर प्रक्रिया करावी असे आदेश दिले. भारत सरकारने अजयकुमार जैन या आयएएस अधिकाऱ्याची यासाठी नियुक्ती केली होती. त्याच दरम्यान कॅनडात २१ दिवसात ओला कचरा कुजविण्याचे बीटीएम कल्चर उपलब्ध असल्याची माहिती ठक्कर यांना मिळाली. त्यांनी तेथील लोकांशी संपर्क करून महाराष्ट्रात कल्चर विक्रीचा व्यवसाय करावा असे मनात आले. त्यानंतर राज्यातील सर्व महानगरपालिका व ६५ नगरपालिकांमध्ये त्याची प्रात्यक्षिके दिली. शंभर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रात्यक्षिके के ली. अहमदनगर पालिकेच्या कचरा व्यवस्थापनाचे वर्षभर कामही ठक्कर यांनी के ले. हे करतानाच असे महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा एका ठिकाणी खताची निर्मिती करून विक्री करता येईल का, असा विचार आला आणि पाच एकर जागेत त्यांनी खतनिर्मिती सुरू केली. त्या खताला बाजारपेठेत अतिशय चांगली मागणी आली. महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स नावाने व्यवसाय सुरू केला व ब्राऊनगोल्ड असे खताला नाव दिले.

देशात सेंद्रीय खत तयार करून त्याची विक्री करणारा पहिला कारखाना ठक्कर यांनी सुरू केला. या खतासाठी लागणारा कच्चा माल साखर कारखान्यातील प्रेसमड, अ‍ॅग्रोवेस्ट असे उपलब्ध करून त्यावर प्रक्रिया सुरू केली. खताचा लाभ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारातील मागणी लक्षात घेऊ न मोठय़ा प्रमाणावर त्याचे उत्पादन करावे ही कल्पना पुढे नेली. कॅनडातील सहकार्यानी सर्व प्रकाराचे तांत्रिक सहाय्य व अल्पशी गुंतवणूकही या व्यवसायात केली. केवळ खताचे उत्पादन करून भागणार नाही तर शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन बुरशीनाशक, किटकनाशक असे अन्य उत्पादनही तयार केले. त्यालाही प्रतिसाद मिळाला. सेंद्रीय मालाची मागणी होती. मात्र व्याप वाढत चालल्याने नफा गाठीशी येत नव्हता. २००९ पर्यंत तोटा वाढत चालल्याने त्याच दरम्यान सेंद्रिय शेतीची गरज असली तरी केवळ सेंद्रिय खतांवर म्हणावे तसे उत्पादन मिळत नाही. त्याला रासायनिक खतांचीही जोड देण्याची गरज असून एकात्मिक विचार करून समन्वय साधून शेती केली तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल, हे अनुभवांती लक्षात आले व सेंद्रिय उत्पादनाबरोबर  रासायनिक उत्पादनेही हाती घेण्याचे ठरविले.

बाजारपेठेत अन्य उत्पादने कोणती आहेत, शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे याचे सल्लेही थेट शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या पध्दतीमुळे मिळत गेले. लोकांचा विश्वास संपादन करताना बाजारपेठेत जी उत्पादने पाठवू ती दर्जेदार असली पाहिजेत. त्याच्या वापरातून शेतकऱ्यांना लाभ व्हायला हवा हे लक्षात घेऊन उत्पादनाच्या बाबतीत गुणवत्तेत कोणतीही तडजोड करायची नाही, अत्याधुनिक शिक्षण असणारे लोक उत्पादन करण्याच्या सोबत असायला हवेत हे लक्षात घेऊन एमएससी बायोटेक्नॉलॉजी, एमएससी रसायनशास्त्र, एमएससी जीवशास्त्र, एमएससी वनस्पती क्रियाशास्त्र, वनस्पती विकारशास्त्र अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच औषध कंपन्यात काम केलेल्या अनुभवी लोकांचीही मदत घेण्यात आली. त्यातून उत्पादनाची गुणवत्ताही दर्जेदार राखली गेली. उत्पादन केवळ चांगले असून चालत नाही तर शेतकऱ्यांपर्यंत ते नीटपणे पोहोचण्याची विपणन यंत्रणा मजबूत असायला हवी. केवळ महाराष्ट्रापुरते उत्पादित केलेल्या मालाची विक्रीची व्यवस्था उभी केली व नैसर्गिक आपत्तीत सापडलो तर पुन्हा विविध अडचणी निर्माण होतील हे लक्षात घेऊन संपूर्ण देशभर विक्रीची व्यवस्था उभी करण्याचे लक्ष्य ठेवून विपणन जाळे रचणे सुरू केले. पहिल्या टप्प्यात गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध केली. प्रतिसाद मिळाला आणि सध्या देशातील १९ राज्यात विक्रीची व्यवस्था आहे. एकूण ८० उत्पादने विकली जातात. तणनाशक, किटकनाशक, पाण्यात विरघळणारी खते, बुरशीनाशक अशी विविध उत्पादने आहेत. त्यात सेंद्रिय २० प्रकारचे तर ६० रासायनिक प्रकारचे आहेत. नवीन उत्पादन केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी त्याची मोफत प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन द्यायची. शेतकऱ्यांना विश्वास पटल्यानंतरच ते खरेदी करतात असा लाखो शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला गेला.

माती परीक्षण करून कोणत्या शेतीत कोणत्या प्रकारची खते वापरली पाहिजेत, हे ठरविले जाते.  शेतकऱ्यांच्या शेतीतील नेमकी गरज लक्षात घेऊन त्या पध्दतीची उत्पादने त्यांनी वापरावीत असा थेट सल्ला दिला जातो. एकदा उत्पादने वापरल्यानंतर त्याचा लाभ झाला, शेतकऱ्यांचे नुकसान वाचले, उत्पादनात भर पडली असा अनुभव आला की त्यातून मागणी वाढत जाते. खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामाबरोबरच बागायतदार, कोरडवाहू, भाजीपाला, फळे अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लागणारी यच्चयावत उत्पादने एमबीएफडे उपलब्ध आहेत. एका अर्थाने शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजनाच एमबीएफने सुरू केली.

आगामी दोन महिन्यात आणखी नवीन २० उत्पादने बाजारात दाखल होत आहेत. ब्राऊनगोल्ड खताची वर्षभरात १५ हजार टनाचे उत्पादन होते. बाजारपेठेत भरपूर मागणी असली तरी उत्पादनाच्या मर्यादा असल्याने याचे मर्यादित उत्पादन केले जाते. आगाऊ  नोंदणी केल्यानंतरच हे खत उपलब्ध होते. ठक्कर सांगतात — स्वत:ची शेती नाही, शेतीतील काही कळत नाही. अशा स्थितीत आपण व्यवसाय सुरू केला व उच्च विद्याविभूषितांसह गुणवत्तेची उत्पादने निर्माण करून त्याच्या विक्रीची व्यवस्था उभी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकता येते याचे समाधान आपल्याला आहे.

कुटुंबातील व्यावसायिक पार्श्वभूमी व चार जणांना एकत्र घेऊन काम करण्याची सवय याचा लाभ आपल्याला व्यवसायवृध्दीत झाला. अपयशाने खचून न जाता जिद्दीने उभे राहिले पाहिजे. अडचणी तर प्रत्येक क्षेत्रात असतात मात्र त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याची ईर्षां मनात असली पाहिजे. सुखवस्तू घरात जन्मलेले असतानाही आहे त्यात समाधान न मानता आपण काही वेगळे करावे या ध्यासातून व्यवसाय सुरू झाला. खरेच वेगळे करू शकलो व लातूर परिसरातील लोकांच्या हातांना काम देऊ शकलो याचे समाधान असल्याचे ठक्कर सांगतात.

देशातील सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यपर्यंत आगामी पाच वर्षांत पोहोचण्याचा कुशल ठक्कर यांचा मानस आहे. या क्षेत्रात आव्हाने मोठी आहेत. मात्र शेतकरीच आपल्याला नेमके काय हवे आहे हे एखाद्या शास्त्रज्ञापेक्षाही योग्य पध्दतीने सांगतो. त्यातून शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी नवी उत्पादने जन्म घेतात. शेतकरी मेहनती आहे.

वेगवेगळ्या आपत्तीवर मात करत उत्पादनक्षमता वाढवण्याच्या जिद्दीने तो प्रयत्नशील असतो. त्यांच्या प्रयत्नात आपल्याला सहभागी होता येते व त्यात यश मिळते हा आनंद आहे. २०२३ पर्यंत ५०० कोटी रुपयांची उलाढाल व्हावी यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे कुशल यांनी सांगितले.

नीलेश ठक्कर

महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स

’ व्यवसाय : सेंद्रिय खत, किटकनाशके, बुरशीनाशके उत्पादन

’ कार्यान्वयन : सन २००३

’ मूळ भांडवल : रु. ३० लाख

’ सध्याची वार्षिक उलाढाल : रु. १३० कोटी

’ कामगार  : ५६०(कायम)+३०० (हंगामी)

’ डिजिटल अस्तित्व  : www.mbfindia.net

– प्रदीप नणंदकर,

 लेखक ‘लोकसत्ता’चे लातूर प्रतिनिधी आहेत.)

आपणासही या सदरासाठी नवउद्योजकाची शिफारस, सूचना ई-मेल :  arthmanas@expressindia.com वर कळविता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:09 am

Web Title: marathi entrepreneurs maharashtra bio fertilizers nilesh thakker zws 70
Next Stories
1 नावात काय ? : ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ)
2 बाजाराचा तंत्र कल : आगामी तिमाही निकालांचा वेध..
3 थेंबे थेंबे तळे साचे : वॉरेन बफे उवाच!
Just Now!
X