|| अजय वाळिंबे

शुक्रवारचा बंद भाव – रु. ४७१.१०

काही कंपन्यांची गणना ब्ल्यू चिप म्हणून होत नसली तरीही या कंपन्या गेली अनेक वर्षे उत्तम कामगिरी करून आपल्या भागधारकांना खूश ठेवत आहेत. आज सुचवलेली नेस्को लिमिटेड ही अशीच एक कंपनी. पूर्वी न्यू स्टँडर्ड इंजिनीयरिंग कंपनी या नावाने केवळ एक अभियांत्रिकी कंपनी म्हणून ओळख असलेली ही कंपनी आज इंजिनीयरिंगखेरीज रियल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, एक्झिबिशन अशा अनेक व्यवसायांत ‘नेस्को’ या नावाने यशस्वी ठरली आहे. गेल्या ६० वर्षांत कंपनीने बदलत्या काळाप्रमाणे आपला व्यवसायदेखील विस्तारत नेला. सुरुवातीला भारतातील एक मोठी फौंड्री व्यवसाय असलेल्या या इंजिनीयरिंग कंपनीने १९८६ मध्ये रियल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. सध्या मुंबईत प्रदर्शनासाठी २ लाख चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध करून देणारी ही एकमेव खासगी कंपनी असेल. २०१५ मध्ये खाद्य व्यवसायात पदार्पण करून आपण काळाबरोबर आहोत हे तिने दाखवून दिले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वाढता पसारा पाहून कंपनीने आयटी पार्क सुरू केले आहे. २०१९ मध्ये कंपनीचा आयटी पार्कमधील चौथा टॉवर वाणिज्य वापरासाठी खुला होत असून त्यामुळे ३९ कार्यालयांसाठी साधारण १७ लाख चौरस फूट जागा उपलब्ध होईल. पाचव्या टॉवरचे बांधकाम चालू असून त्यामुळे आगामी काळात १२ ते २० लाख चौरस फूट जागा उपलब्ध होईल. नाव आणि गुणवत्तेमुळे कंपनीच्या वाणिज्य वसाहतीत केपीएमजी, पीडब्ल्यूसी, एचएसबीसी, ब्लॅकरॉक इ. अनेक नामांकित कंपन्यांची कार्यालये आहेत. कुठलेही कर्ज नसलेल्या ‘नेस्को’ने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. सप्टेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने १००.०४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ४९.३१ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गोरेगाव येथील प्रदर्शनासाठी असलेल्या मोकळ्या जागेत कंपनी ४५० खोल्यांचे हॉटेल बांधत आहे. हे काम सध्या प्रगतिपथावर आहे. अनुभवी प्रवर्तक, कामगिरीतील सातत्य आणि आगामी प्रकल्पामुळे नेस्को मध्यम कालावधीसाठी एक फायद्याची गुंतवणूक ठरू शकते.