05 March 2021

News Flash

नावात काय ? : ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ)

भारत सरकारचे कर्ज व्यवस्थापन रिझव्‍‌र्ह बँकेच्या माध्यमातून केले जाते.

कौस्तुभ जोशी

रिझव्‍‌र्ह बँकेच्या मौद्रिक धोरणांमध्ये सीआरआर, एसएलआर, रेपो आणि रिव्हर्स रेपो याव्यतिरिक्त समाविष्ट असलेले महत्त्वाचे अस्त्र म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन (ओएमओ) हे होय. रिझव्‍‌र्ह बँकेची धोरणे दोन मुद्यांशी संबंधित असतात. पहिला मुद्दा व्यवस्थेतील चलनाची उपलब्धता आणि दुसरा मुद्दा देशातील महागाईचा दर. पाहायला गेल्यास चलनाचा पुरवठा आणि महागाईचा दर यांच्यात घनिष्ठ संबंध आहे.

अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह गरजेपेक्षा जास्त अधिक असेल तर महागाई डोके वर काढू लागते व अशावेळी व्याजदर नियंत्रित करून रिझव्‍‌र्ह बँक महागाईचा दर आटोक्यात आणते. अल्पकाळात व्यवस्थित चलनाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी रेपो आणि रिव्हर्स रेपो याचबरोबर ओपन मार्केट ऑपरेशन्स केली जातात. यामध्ये सरकारी कर्जरोखे व ट्रेझरी बिल्स यांचा समावेश असतो.

भारत सरकारचे कर्ज व्यवस्थापन रिझव्‍‌र्ह बँकेच्या माध्यमातून केले जाते. सरकारला आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी वेळोवेळी बाजारातून पैसा उभा करावा लागतो. हा पैसा अल्पकाळात ट्रेझरी बिल विकून उभा केला जातो.

दीर्घकाळात कर्जरोखे (बॉन्ड) विकून उभा केला जातो. हे सर्व कर्जव्यवस्थापन रिझव्‍‌र्ह बँक करते. रिझव्‍‌र्ह बँकेला सरकारची बँक म्हणतात. रिझव्‍‌र्ह बँक सरकारसाठी करत असलेल्या कामांपैकी प्रमुख काम हेच असते.

ओपन मार्केट ऑपरेशन्समध्ये बाजारातील ज्यादा पैसा नियंत्रित करणे आणि कमी असेल तर पैसा खेळवणे हे दोन्ही उद्देश साध्य केले जातात. जर व्यवस्थेत पैशाची  गरज असेल, चलनाचा पुरवठा कमी पडत असेल तर रिझव्‍‌र्ह बँक कर्जरोखे खरेदी करते म्हणजेच बँक कर्जरोखे घेते आणि तेवढे पैसे व्यवस्थेत सोडते.

यात जो कर्जरोखे विकतो त्याला रिझव्‍‌र्ह बँक पैसे देते.

याउलट, जेव्हा व्यवस्थेत पैसे अधिक असतात तेव्हा रिझव्‍‌र्ह बँक कर्ज रोख्यांची विक्री करते, म्हणजेच जो कर्जरोखे विकत घेतो तो रिझव्‍‌र्ह बँकेकडे पैसे जमा करतो.

हे व्यवहार रिझव्‍‌र्ह बँकेच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे होतात त्याला ‘ई कुबेर कोर बँकिंग नेटवर्क सोल्युशन’ असे म्हणतात.

ऋतुमानानुसार शेतीची होणारी कामे, विविध सणोत्सव यानिमित्ताने बदलणारी उलाढाल यामुळे भारतात अर्थव्यवस्थेत पैशाची आवश्यकता वर्षांच्या वेगवेगळ्या कालावधीत वेगवेगळी असते, ओएमओद्वारे पैशाचा प्रवाह वेळोवेळी नियंत्रित केला जातो.

नजीकच्या काळातले उदाहरण विचारात घ्यायचे झाल्यास, २७ एप्रिल २०२० रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने दहा हजार कोटी रुपयांचे ओपन मार्केट ऑपरेशन्स (ओएमओ) केले.

आधार तक्ता

ओएम्ओ मध्ये होणारा व्यवहार                         पैशाचा प्रवाह कोठून कोठे जातो?                                 परिणाम

रिझर्व बँकेने सिक्युरिटी विकत घेतल्या       बँका सिक्युरिटी विकतात आणि पैसे घेतात         व्यवस्थेत पैशाचा प्रवाह खेळवला  जातो!

रिझर्व बँकेने सिक्युरिटी विकल्या             बँका सिक्युरिटी विकत घेतात आणि पैसे देतात            व्यवस्थेतून पैसे काढून घेतले जातात

संदर्भ : रिझव्‍‌र्ह बँक प्रसिद्धी पत्रक, रिझव्‍‌र्ह बँक संकेतस्थळ

https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx?prid=49730

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 1:08 am

Web Title: open market operations zws 70
Next Stories
1 बाजाराचा तंत्र कल : आगामी तिमाही निकालांचा वेध..
2 थेंबे थेंबे तळे साचे : वॉरेन बफे उवाच!
3 अर्थ वल्लभ : अतक्र्य ना झालें काहीं, जरी अकस्मात..
Just Now!
X