niyojanचहू वर्णा नामाधिकार।
नामी नाही लहानथोर।।
जड मूढ पलपार।
पावती नामे।।
म्हणौनी नाम अखंड स्मरावे।
रूपमनी आठवावे।
तिसरी भक्ती स्वभावे निरोपिले।।
समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधातील चौथ्या दशकातील तिसऱ्या समासातील या दोन शेवटच्या ओव्या. तत्कालीन चातुर्वण्र्य व्यवस्थेमध्ये परमेश्वराचे नामस्मरण करण्याचा कोणाला अधिकार आहे अशी शंका असल्यास शंकानिरसन करण्याच्या हेतूने समर्थानी ही ओवी लिहिली असावी. समाजरचनेच्या दृष्टीने त्याकाळी चातुर्वण्र्य व्यवस्था होती. या चारही वर्णाच्या लोकांना देवाचे नाव घेण्याचा अधिकार असल्याचे समर्थानी सांगितले. समाजामध्ये नेहमीच विषमता असते. आधुनिक समाजव्यवस्थेमुळे सार्वजनिक व्यवस्थेतून वर्ण नाहीसे झाले असले तरी आíथक स्थितीवर आधारित वर्ग निर्माण झाले आहेत. या प्रत्येक वर्गातील माणसाला स्वप्नं आहेत, आर्थिक आशा-अपेक्षा आहेत. म्हणून साहजिकच तो आपल्या मिळकत आणि गुंतवणुकीचे नियोजनही करून घेऊ शकतो. आजच्या भागात महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळात चालक असलेल्या सुरेश गाढवे यांचे नियोजन पाहू.

मुलींच्या शिक्षणासाठी दीर्घकालीन बचत असे माफक वित्तीय उद्दिष्ट, पण महिन्याकाठी मोठय़ा मुश्किलीने साधारण हजारभर रुपये राहणारी शिल्लक ही बाब जमेस धरून सुरेश गाढवे यांना केलेली शिफारस..
* वार्षकि एक हजार रुपये भरून २० लाखांचे सुरक्षा कवच मिळणारा एसबीआय जनरल कंपनीचा विमा खरेदी करावा.
* १५ वर्षे मुदत असलेले सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते उघडावे आणि दरमहा ५०० रुपये खात्यात जमा करावे.

7सुरेश गाढवे हे मूळचे सातारा जिल्ह्य़ातील दहिवडी तालुक्यातील बिजवडी गावाचे आहेत व सध्या महामंडळाच्या फलटण आगारात कर्तव्यावर आहेत. कमावत्या वयाचे झाल्यावर पहिल्यांदा ट्रकवर क्लीनर, नंतर ड्रायव्हर झाले. जेएनपीटी ते दमण, वापी अशी मालवाहतूक करीत असतानाच २००८ मध्ये अचानक बेस्टचा संप झाल्याने तत्कालीन व्यवस्थापनाने चालक व वाहक भरती करण्याचे ठरविल्याने ते बेस्टच्या वडाळा आगारात चालक म्हणून दाखल झाले. पुढे महामंडळाने चालक व वाहकांच्या केलेल्या महाभरतीतून ते एसटीच्या सेवेत दाखल झाले आणि नंतर त्यांची फलटण आगारात नेमणूक झाली. ‘शिवनेरी’ ही व्होल्वो बस सध्या फलटण डेपोत नाही, परंतु त्यांची बदली भविष्यात पुण्यातील स्वारगेट किंवा शिवाजीनगर आगारात झाली तर ‘शिवनेरी’चे सारथ्य करणे हे त्यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या ओढीने एकदा ते बेळगावला महामंडळाची बस घेऊन गेले असताना व्होल्वोच्या चालक प्रशिक्षण केंद्राला ते भेट देऊन आले आहेत. ते विवाहित असून पत्नी गृहिणी आहे. त्यांना स्वरलता व वैष्णवी या दोन मुली असून थोरली नुकतीच जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ लागली आहे. गावाकडे बिजवडी येथे सहा एकर शेतजमीन आहे. तसेच फलटण तालुक्यात दुधवडी गावी १२ एकर जमीन आहे. घरी दोन म्हशी असून हे दूध ते रामराजे िनबाळकर दूध संकलन केंद्राला विकतात. त्यांची जमीन असलेले सातारा जिल्ह्य़ातील फलटण व दहिवडी हे दोन्ही तालुके दुष्काळी तालुके आहेत. जमीन असूनही मागील दोन्ही पावसाळे कोरडे गेल्याने जमिनीवर काहीही पिकत नाही. पावसावर अवलंबून ज्वारी-हरभरा ही पिके घेतली जातात. त्यांचे वेतन ९,५०० रुपये असून वजावटीपश्चात ७,५०० हातात येतात. दूध विक्रीतून होणारा नफा व महामंडळातून मिळणारे वेतन यातून त्यांचा घरखर्च चालतो. महिन्याकाठी साधारण हजारभर रुपये मोठय़ा मुश्किलीने शिल्लक उरतात. परंतु पुन्हा कधी तरी खर्च होतात. म्हणून मुलींच्या शिक्षणासाठी दीर्घकालीन बचत हे एकच वित्तीय उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मुलींनी शिकून सरकारी अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.
देशातील रस्ते अपघाताची जी आकडेवारी प्रसिद्ध होते त्या आकडेवारीत महाराष्ट्र हे चौथ्या क्रमांकाचे अपघाती राज्य आहे. गाढवे हे आपल्या कामाच्या वेळेपकी १०० टक्के वेळ रस्त्यावर बस चालवत असतात. रात्री-अपरात्री ट्रक बसेसने गजबजलेल्या महामार्गावर प्रवाशांची सुरक्षित ने-आण करीत असतात. त्यांची प्राथमिकता प्रवाशांच्या सुरक्षिततेला असते. एखादा अपघात झाला व दुर्दैवाने जिवावर बेतले तर आपल्या पश्चात कुटुंबाची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे. म्हणूनच अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई मिळणारा विमा त्यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी घेणे आवश्यक आहे. या विमा प्रकारात अत्यल्प हप्ता देऊन मोठे सुरक्षा कवच मिळविता येते. वार्षकि एक हजार रुपये भरून २० लाखांचे सुरक्षा कवच मिळणारा एसबीआय जनरल कंपनीचा विमा खरेदी करावा.
बचतीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते उघडावे. या खात्याची मुदत सुरुवातीला १५ वष्रे असते. पहिल्या १५ वर्षांनंतर दर पाच वर्षांनी या खात्याची मुदत वाढविता येते. सध्या या खात्यात जमा असलेल्या रकमेवर ८.७५ टक्के करमुक्त व्याज मिळते. हे खाते सुरू ठेवण्यासाठी वार्षकि किमान पाचशे रुपये भरणे जरुरी आहे. हे पसे न भरल्यास दरवर्षी पन्नास रुपये दंड आकाराला जातो. एक हजार रुपयांच्या बचतीपकी दरमहा ५०० रुपये या खात्यांत दीर्घकालीन बचतीसाठी जमा करावे. या खात्यात पत्नीचे वारसदार म्हणून नामांकन करावे. एसटी महामंडळ सुरेश गाढवे यांचे मासिक वेतन स्टेट बँकेच्या फलटण शाखेतील त्यांच्या खात्यात जमा करीत आहे. अपघाती मृत्यू झाल्यास संरक्षण देणारी विमा पॉलिसी व पीपीएफ या दोन्ही गोष्टी स्टेट बँकेच्या फलटण शाखेतच करावयाच्या आहेत.

आजचा अर्थबोध :-
आíथक स्तर व नियोजन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येकाला आíथक नियोजन योग्य पद्धतीने करता येते व  प्रत्येकाच्या खिशाच्या आवाक्यात असलेली व त्यांची गरज भागवू शकतील अशी उत्पादने उपलब्ध आहेत.

पाईनब्रिज इंडियाच्या योजनांचे कराल काय?
या स्तंभातून पाईनब्रिज इंडियाच्या प्रामुख्याने पाईनब्रिज इंडिया इक्विटी, पाईनब्रिज इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर इकॉनॉमिक रिफॉर्म फंड व पाईनब्रिज इंडिया शॉर्ट टर्म फंड या तीन योजनांची शिफारस केली गेली होती. पाईनब्रिज म्युच्युअल फंडाच्या योजनांचे कोटक मिहद्र म्युच्युअल फंडाने अधिग्रहणास सेबीने १९ डिसेंबर २०१४ रोजी मंजुरी दिली असून ३१ डिसेंबर २०१४ ते २९ जानेवारी २०१५ या कालावधीत ज्या गुंतवणुकदारांना आपल्या गुंतवणुका काढून घेण्याची इच्छा असेल ते आपल्या गुंतवणुका निर्गमन शुल्क न देता आपली युनिट्स विकू शकतील. हे अधिग्रहण झाल्यानंतर पाईनब्रिजच्या काही योजना कोटक म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये विलीन करण्यात येतील. याचा तपशील पाईनब्रिज म्युच्युअल फंडांच्या विद्यमान गुंतवणूकदारांना कळविण्यात आला आहे. पाईनब्रिजची समभाग गुंतवणूक पद्धती व कोटक महिंद्रची गुंतवणूक पद्धती या पूर्णपणे वेगळ्या आहेत. साहजिकच जोखीम व गुंतवणुकीत नफा नुकसान होण्याच्या शक्यताही पूर्णपणे निराळ्या आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आपल्या प्रकृतीला झेपेल अशा फंडाची निवड करणे योग्य ठरेल. नवीन गुंतवणूक करण्यास उत्सुक गुंतवणूकदारांनी ‘लोकसत्ताकर्त्यां म्युच्युअल फंडा’पकी सोयीच्या म्युच्युअल फंडाची निवड जरूर करावी.
पाईनब्रिज इंडिया शॉर्ट टर्म फंड हा यापुढे ‘कोटक लो डय़ुरेशन फंड’ या नावाने ओळखला जाईल. या फंडाच्या गुंतवणुका प्रामुख्याने सहा महिने ते एक वर्ष मुदत शिल्लक असलेल्या रोख्यांत करण्यात येतील. तेव्हा या फंडातून तातडीने बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. भविष्यात नवीन व्यवस्थापन या फंडाचे निर्गमन शुल्कात वाढ करते की नाही, रोख्यांचा दर्जा (क्रेडिट रेटिंग) इत्यादी कशी राखते हे पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल.