गेल्या काही दिवसात बाजार खूप खाली गेला त्याची कारणमीमांसा करताना, आगामी काळ हा गुंतवणूकदारांनी काळजी करण्याइतपत जोखीमेचा आहे की, तो नव्या सुसंधीचा राहील याचा हा परामर्श. बाजार खाली गेला तर शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतात ही सुसंधी असते. पण बाजाराची तेजीही अनंतकाळासाठी नसतेच. म्हणून जोखमीचा अंदाज घेऊन आपल्या आíथक क्षमतेनुसार व्यवहार करावे, असा सावध सल्लाही..
परदेशी गुंतवणूक संस्था, म्युच्युअल फंड यांचे आíथक वर्ष ३१ डिसेंबर रोजी संपते. वर्ष संपल्यानंतर देण्यात येणारा लाभांश हा झालेल्या नफ्यातून द्यावा लागतो. नफा नुसता कागदोपत्री असून चालत नाही तर तो शेअर्स विकून हातात यावा लागतो (इ‘ी िढ१ऋ्र३२). म्हणून सर्व संस्था डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळात शेअर्सची विक्री करतात. परंतु ३१ डिसेंबरला वर्ष संपताना शेअर्सच्या किंमती खाली असतील तर निव्वळ मालमत्ता मूल्यदेखील खाली जाईल. मग डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात खरेदी करून बाजार वर जाईल असे प्रयत्न केले जातात.
यावर्षी पहिला भाग व्यवस्थित झाला; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भांडणात रशियाचे चलन रुबल अधिक खाली जाऊ नये म्हणून एका दिवसात रशियाने व्याज दर १०.५० टक्क्य़ांवरून थेट १७ टक्क्य़ांपर्यंत वाढवले. याचा परिणाम बाजार अजून खाली जाण्यात झाला. भारताचा रुपया या परिस्थितीत खाली जाणे अपेक्षित नव्हते; परंतु डॉलर इतर सर्व चलनांबरोबर मजबूत झाल्याने रुपया नरम झाला.
जगातील सर्व बाजार एकमेकांशी निगडित झाल्याने एक बाजार खाली गेल्यावर इतर देशांतील बाजारांवर त्याचा परिणाम होतो. सर्व बाजार खाली येऊ लागतात. सध्या बाजार खाली जाण्यासाठी प्रमुख कारणापकी एक कारण अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता हे आहे. म्हणून सर्व संस्था गुंतवणुका मोडून डॉलर्स खरेदी करत आहेत. अमेरिकी कर्ज रोखे हे सर्वात सुरक्षित समजले जातात. त्या प्रमाणात इतर कोणतीही गुंतवणूक जोखीमयुक्त ठरते.
जागतिक गुंतवणुकीचा ओघ ब्रिक्स देशांच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात असतो. त्यामध्ये चीनच्या उत्पादन क्षेत्राने मागील सात महिन्याचा नीचांक गाठला. चीनची आíथक मदार उत्पादन क्षेत्राच्या निर्यातीवर अवलंबून आहे. नवीन निर्यात मागणी कमी झाली आहे.
ब्राझील व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा परिणाम भारतावर होऊ शकतो. भारतात रिझव्‍‌र्ह बँकेने व्याज दर कमी करावे म्हणून सर्व बाजूने दबाव वाढत असताना ही परिस्थिती उद्भवली आहे. २०२४ साली मुदत संपणारे ८.४०% व्याजाचे रोखे रु. १०३.३० ने खरेदी/विक्री होत होते. त्याचे मूल्य कमी होऊन रु. १०२.७२ झाले. मागील काही महिन्यात परदेशी संस्थांनी शेअर बाजारात ६०,००० कोटी रुपये गुंतवणूक केली आहे व सरकारी कर्ज रोख्यात रु. १,६०,००० कोटी केली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी विचारपूर्वक व्याज दर कमी केलेले नाहीत. आज व्याजदर कमी झाले असते तर हे सर्व कर्जरोखे विकण्यास सुरुवात झाली असती व ऑगस्ट २०१३ ची परिस्थिती पुन्हा उद्भवली असती. त्या सुमारास परदेशी संस्थांनी मोठय़ा प्रमाणावर विक्री करून रोखे बाजार हलवून सोडला होता. त्याच सुमारास डॉलर खरेदी करून त्याचा नवीन उच्चांक गाठला होता. तेलाच्या किंमती कमी होणे भारताच्या फायद्याचे आहे; परंतु हा सर्व फायदा सोन्याची आयात वाढून गिळंकृत झाला. आयात-निर्यात व्यापार तुट कमी होण्याऐवजी वाढली आहे.
महागाई आटोक्यात आली म्हणून व्याजदर कधीही कमी होऊ शकतात. या कारणामुळे सध्या रोख्यांच्या किंमती वाढल्या आहेत. अमेरिकेत व्याजदर वाढले तर भारतात ऑगस्ट २०१३ ची पुनरावृत्ती होऊ शकते. आज अमेरिका व्याजदर वाढवण्याची शक्यता खूप जास्त आहे. आíथक गरज म्हणून नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग म्हणून तसे झाल्यास डॉलर रु. ७० पर्यंत वर जाऊ शकतो.
जोखीम (रिस्क) हा शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या नजरेसमोर काय येते? धोका, भीती, काळजी का सुसंधी? मित्र हो, आधी सर्व सांगितले ते धोके, भीती या स्वरुपातील होते. बाजार खाली गेला तर मला शेअर्स स्वस्तात खरेदी करता येतात ही सुसंधी असते. चांगले ब्ल्यू चीप शेअर्स ५-१० टक्के सवलतीत मिळाले तर!  ‘आज मॉलमध्ये सेल आहे. सर्व वस्तू १० टक्के स्वस्त.’ ही जाहिरात पाहून आपण तिकडे धावत सुटतो आणि नको असलेल्या वस्तू घरी साठवून ठेवतो आणि शेअर बाजारात बरोबर उलटे करतो. शेअर्स साठवण्याची संधी दवडू नका.

तेजीमध्ये येणारा मंदीचा काही काळ आणि मंदीमध्ये येणारा तेजीचा काही काळ यात फरक समजून घ्या. सध्या एका मोठय़ा तेजीमध्ये आलेला हा मंदीचा ‘पॅच’ आहे, असे मला वाटते. मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे ८ वर्षांच्या तेजीचे वर्तुळ अजून संपलेले नाही. साधारणत: अजून एक वर्ष बाकी आहे.
तसे पाहिल्यास आता तेजीला सुरुवात होते.
प्रत्येक मोठय़ा तेजीला एक संकल्पना (थीम) असते. त्यात मोठा सट्टा होतो. जसे १९९२ मध्ये ‘ओल्ड इकॉनॉमी स्टॉक्स’ मध्ये सट्टा झाला. २००० साली ‘सॉफ्टवेअर’ आणि ‘टेक स्टॉक्स’मध्ये सट्टा झाला व २००८ मध्ये सट्टय़ाची संकल्पना ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ ही होती. २०१५-१६ च्या सट्टय़ाची संकल्पना अजून जाहीर झालेली नाही. पूर्वीची संकल्पना पुन्हा सहसा निवडली जात नाही किंवा तशी निवडली गेलेली नाही. नवीन सट्टय़ाची संकल्पना काय असू शकते? बँक, वित्त किंवा सेवा क्षेत्र, वीज उत्पादन आणि वितरण, उत्पादन क्षेत्र (मोदींच्या ‘मेक इन इंडिया’मुळे). असे काहीही असू शकते. सध्या म्युच्युअल फंडाच्या ‘फॅक्ट शीट’मध्ये योजनांमधील गुंतवणूक कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आहेत ते पाहा. सर्वसाधारणत: (थोडय़ाफार फरकाने) ३० टक्के बँक व वित्त, १५ टक्के माहिती व तंत्रज्ञान आणि १० टक्क्यांच्या जवळपास वाहन क्षेत्रामध्ये गुंतवणूक आढळते. एकदा संकल्पना स्पष्ट झाली की त्या फुग्यात हवा भरली जाईल आणि तो फुगा डिसेंबर २०१५च्या आसपास फुटेल व मंदीला सुरुवात होईल.
बाजारात खऱ्या तेजीला सुरुवात १ मार्चनंतर (अर्थसकंल्प मांडल्यानंतर) होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पामध्ये कोणत्या क्षेत्रास जास्त सवलती मिळतील त्या क्षेत्रात हवा भरली जाण्याची शक्यता आहे. गृहनिर्माण क्षेत्रास सवलती मिळण्याची शक्यता आहे. यात १००% परकीय गुंतवणुकीस मान्यता मिळेल (याची चर्चा सुरू झाली आहे. कदाचित अध्यादेशावर सही होणे फक्त शिल्लक असावे.). गृहनिर्माण क्षेत्रात सध्या इतकी प्रचंड हवा भरली आहे की त्यात अजून किती हवा भरणार! परंतु ती भरली जाईल व फुगा टाचणी न लावतासुद्धा फुटू शकेल. अर्थातच त्याचा परिणाम शेअर बाजार कोसळण्यात होईल. पण त्या आधी मोठी तेजी येईल हे फार महत्त्वाचे आहे.
माझ्या पूर्वीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे, तेजीचा उच्चांक डिसेंबर २०१५ च्या आसपास असू शकेल. त्या सुमारास निर्देशांक काय असेल? सेन्सेक्स ४०००० किंवा ४५००० किंवा ५००००? सर्व अंदाजच आहेत. (राकेश झुनझुनवालाने निफ्टी २०३० साली १,२५,००० असेल, असे सांगितले आहे.) निर्देशांक जो नवीन उच्चांक गाठेल तिथून तो मंदीत (पूर्णत्वास गेल्यावर) अध्र्यावर येतो (किंवा त्याहूनही खाली) म्हणजे कदाचित २०००० च्याही खाली.
मित्रहो, हे सर्व अंदाज आहेत. अंदाज घेऊन पुढे जायचे असते. जोखमीचा अंदाज घेऊन आपल्या आíथक क्षमतेनुसार व्यवहार करावे.
या परिस्थितीत सोने गुंतवणूक फायद्याची ठरेल का? सोने अमेरिकेत एका औन्ससाठी १,१३० डॉलरवरून १,२३० डॉलर पर्यंत गेले. ते कदाचित १,३३० डॉलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डॉलरची किंमत वर गेल्यामुळे भारतात सोने वर जाईल; परंतु सोन्यातील सट्टा संपला आहे म्हणून सोने रु. तोळ्यासाठी २९,००० ते ३०,००० ची सीमारेषा ओलांडून पुढे जाण्याची शक्यता कमी आहे. कदाचित रशिया हा देश व्यापार तुट भरून काढण्यासाठी सोने विकण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सोने आणखी खाली जाईल.
(लेखक ‘सेबी’कडे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)