12 November 2019

News Flash

कोचरेकरांचा ‘रिटायरमेंट प्लान’

आपले ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ ही मुलांना अप्रत्यक्षपणे दिलेली एक भेटच आहे..

|| वसंत कुलकर्णी

आपले ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ ही मुलांना अप्रत्यक्षपणे दिलेली एक भेटच आहे..

‘चाळी’त कोचरेकर मास्तरांचा सावध सज्जन असा लौकिक होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महिनाभर आधी छत्री घेऊन ते बाहेर पडत आणि पावसाळा संपल्यानंतरदेखील महिनाभर जवळ बाळगत. इतकेच नव्हे, तर थंडीच्या आधीच गळ्याला मफलर बांधून मार्चपर्यंत टिकवत. म्युनिसिपालटीच्या मराठी मुलींच्या शाळेतले जवळजवळ सगळे नंबर त्यांनी आलटून पालटून शिकवले होते. तास वाजवणाऱ्या शिपायाच्या अगोदर शाळेत हजर राहणारा, रोज हजेरीपट भरणारा, नियमित दाढी करणारा आणि वर्गातल्या सगळ्या मुलांनी नखे कापली आहेत की नाही हे पाहणारा.. शिक्षण पेशाचे ते एकमेव जागरूक प्रतिनिधी होते. मास्तर रस्त्यावरून उजव्या बाजूने कधी चालले नाहीत. ट्राम कंडक्टरचे लक्ष गेले नाही तरी, टाळ्या वाजवून, हाका मारून, प्रसंगी आपल्या बाकावरून त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांनी तिकीट घेतल्याची आठवण जुने चाळकरी अजून काढतात. मास्तरांचा मुलगा अरुण याला डिफेन्स अकाऊंट्स सव्‍‌र्हिसेसमध्ये नोकरी लागल्याने मास्तरांची एक शाखा पुण्यात स्थलांतरित झाली. मागील पन्नास वर्षे मास्तरांचा मुलगा नारायण पेठेत मुंजोबाच्या बोळात वास्तव्यास आहे. त्याचा मुलगा रोहित कोचरेकर हा विवाहित असून एका आयटी कंपनीच्या पुण्यातील डेव्हलपमेंट सेंटरमध्ये नोकरी करतो. त्याची बायकोसुद्धा एका आयटी कंपनीत आहे. रोहित ३६ वर्षांचा झाला. एका मुलाचा बाप. तरी त्याला ‘फायनान्शियल डिसिजन्स’ घेता येत नाहीत, असे अरुण कोचरेकरांचे मत. रोहितला वेळ नसल्याने अरुण कोचरेकरच मुलाच्या वतीने त्याच्या सर्व गुंतवणुका पाहतात. वडिलांकडून आलेला मध्यमवर्गीय सावधपणा आणि पन्नासहून अधिक वर्षे ‘गावात’ वास्तव्याने आलेला पुण्याच्या पेठांमध्ये उपजत असलेला चिकित्सकपणा त्यांच्या नसानसांत भिनला आहे. यामुळे त्यांच्या वित्तीय सल्लागाराने कोणतेही उत्पादन गुंतवणुकीसाठी सुचविले तरी सखोल विश्लेषण केल्याशिवाय अरुण कोचरेकर गुंतवणूक करायला तयार होत नसत.

‘‘आमचे निवृत्तीपश्चातच्या आयुष्यात चांगली पेन्शन असल्याने फारशा आर्थिक विवंचना नाहीत. आमच्या पिढीने कर्जाचे हप्ते कमी आणि एलआयसीच्या पॉलिसीचे हप्ते जास्त भरले. रोहितच्या बाबतीत कर्जाचे हप्ते अधिक आणि बचतीच्या नावाने बोंब अशी परिस्थिती आहे. कारण घरातली प्रत्येक गोष्ट सुलभ हप्त्यांवर घेतलेली. परत कर्ज घेण्यात कमीपणा वाटत नाही किंवा आपण काही चुकतो आहोत याचा लवलेशही नाही. ‘चाळीत’ बाबलीबाईच्या पाटल्या गहाण पडल्याची बातमी, गहाण खतावरची शाई वाळण्यापूर्वी सर्वाच्या तोंडी पसरल्यावर बाबलीबाई सोकाजी त्रिलोकेकरांना झावबावाडीपासून आंबेवाडीपर्यंत तोंड लपवायला जागा नव्हती. आज बँकेने कर्ज मंजूर झाल्याची मेल वाचल्यावर रोहितच्या तोंडावर विजयी वीराचे हास्य उमटलेले मी पाहिले आहे.’’

‘‘एप्रिल महिन्यात मिळणारी पगारवाढ हाती पडण्यापूर्वी सुधारित पगाराच्या वाढीव उत्पन्नाच्या खर्चाची तजवीज हे जानेवारीत करतात. १० टक्के पगारवाढ झाली तर यांचा खर्च २० टक्क्यांनी वाढतो आणि एक कर्ज संपले की दुसरे कर्ज घेण्याची यांची तयारी असते. वयाच्या २५ व्या वर्षी ५ टक्के पगारवाढीने हे रेल्वे सोडून ओला आणि उबरने प्रवास करतात आणि वयाच्या २८ व्या वर्षी नोकरी बदलली म्हणून वाढलेल्या १० टक्के पगारवाढीवर यांना सोमवार ते शुक्रवार रस्त्यावर उभी करण्यासाठी मारुतीचे लेटेस्ट मॉडेल घ्यायचे असते. सगळ्या गोष्टींसाठी खर्च करणारी ही पिढी. तिला स्वत:ची लाइफस्टाइल वाढवायची असते, पण उंचावलेल्या जीवनशैलीला राखण्यासाठी निवृत्ती नियोजनासाठी पैसे नसतात आणि वेळही नसतो. याच्या निवृत्तीपश्चातच्या नियोजनासाठी मलाच काही तरी करायलाच हवे.’’ असा विचार अरुण कोचरेकरांना अस्वस्थ करीत असे. असा विचार मनात यायला आणि त्यांचा वित्तीय सल्लागार रोहितच्या ‘रिटायरमेंट प्लान’साठी एक गुंतवणूक प्रस्ताव घेऊनही आला.

‘‘अ‍ॅडल्वाईज म्युच्युअल फंडाने अलीकडे गुंतवणूकदारांसाठी ‘रिटायरमेंट प्लान’ ही एक निवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ‘एसआयपी’द्वारे, गुंतवणूकदार त्यांच्या पसंतीच्या अ‍ॅडल्वाईज म्युच्युअल फंडातील एक इक्विटी आणि एक रोखे गुंतवणूक करणाऱ्या आणि कायम खुल्या असलेल्या (ओपन-एण्डेड) दोन योजना निवडू शकतो. गुंतवणूकदार त्याच्या वयानुसार (लाइफ सायकल) रोखे आणि समभाग यांचे विभाजन तो करू शकतो. अ‍ॅडल्वाईज म्युच्युअल फंडाच्या सहा समभाग गुंतवणूक करणाऱ्या योजनांपैकी एक आणि सात रोखे योजनांपैकी एक अशा आपल्या पसंतीच्या दोन योजनांची निवड गुंतवणूकदारांनी ‘रिटायरमेंट प्लान’साठी करायची आहे. या दोन्ही योजनांचा विकल्प वृद्धी (ग्रोथ) असेल. लाभांश पर्यायांचा समावेश ‘रिटायरमेंट प्लान’मध्ये केलेला नाही. रोखे आणि समभाग यांचे गुंतवणुकीतील प्रमाण आपल्या सोयीनुसार ठरवायचे आहे. हे प्रमाण त्याच्या जोखमींकानुसार ठरविता येईल किंवा ‘लाइफ सायकल अ‍ॅसेट अलोकेशन’ पद्धतीने ते ठरेल. ‘रिटायरमेंट प्लान’मध्ये ऑटो ऑप्शन प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी वय वर्षे १८ ते ५० वयोमर्यादा ठरविण्यात आली असून ‘कस्टमाइज’ ऑप्शनसाठी कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे आहे. ‘रिटायरमेंट प्लान’मध्ये किमान ‘एसआयपी’ पाच वर्षांसाठी निश्चित केली आहे. ऑटो ऑप्शनसाठी ‘११० वजा वय’ हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे..’’ वित्तीय सल्लागाराने लगोलग या योजनेची वैशिष्टय़े विशद केली.

‘‘काही फंड घराण्यांनी याआधीच सेवानिवृत्ती योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. अ‍ॅडल्वाइजच्या या प्लानचे वय-आधारित मालमत्ता वाटप आणि मालमत्तेचे संतुलन हे वैशिष्टय़ आहे. दीर्घकाळ संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा देणारी योजना निवडल्यास ही योजना आपल्या सेवानिवृत्ती पोर्टफोलिओचा एक हिस्सा बनू शकते. ‘रिटायरमेंट प्लान’मध्ये गुंतवणूक ही एखाद-दोन फंडांत केंद्रित होण्याची जोखीम आहे. कारण ‘रिटायरमेंट प्लान’मध्ये केवळ दोन फंड आहेत. मागील वर्षांपासून म्युच्युअल फंडात एक लाखावरील भांडवली लाभांवर कर भरावा लागतो. पोर्टफोलिओचे नियमित संतुलन केल्यास आणि भांडवली लाभ एका लाखांपेक्षा अधिक असल्यास प्रत्येक वेळी केलेला बदल दीर्घकालीन भांडवली लाभ समजून त्यावर नफा कर लागू होईल..’’ वित्तीय सल्लागार म्हणाला.

सावध पण चिकित्सक विचार करणाऱ्या कोचरेकरांना ‘रिटायरमेंट प्लान’मधील गुंतवणूक कलम ८० (सी) अंतर्गत करलाभांसाठी पात्र नसली तरी अ‍ॅडल्वाईज म्युच्युअल फंडाच्या ‘लाँग टर्म इक्विटी फंड’ या करलाभ असलेल्या योजनेची निवड करून गुंतवणूकदार ‘रिटायरमेंट प्लान’मधील अंशत: गुंतवणूक कलम ८० (सी) अंतर्गत मिळणारा लाभ पदरात पाडून घेऊ  शकतात. एखादा कुशल म्युच्युअल फंड विक्रेता ‘रिटायरमेंट प्लान’मधील दर वर्षी एक लाख करमुक्त भांडवली लाभ पोर्टफोलिओच्या नियमित संतुलनासाठी वापरू शकेल. रोहितच्या निवृत्ती नियोजनासाठी हा एक पर्याय नक्कीच वाईट नाही.

‘रिटायरमेंट प्लान’ आपल्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र राहण्यासाठी पुरेसा निधी जमा करण्यास मदत करते. तुमची सेवानिवृत्ती वयाची रक्कम ठरवते, सेवानिवृत्तीदरम्यान तुमच्या मासिक खर्चासाठी किती पैशांची आवश्यकता आहे आणि किती वर्षांपासून सेवानिवृत्तीच्या वर्षांसाठी ती रक्कम एकत्रित करण्यासाठी तुम्हाला बाजूला ठेवण्याची गरज आहे, हे निश्चित करते. आपले ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ ही मुलांना अप्रत्यक्षपणे दिलेली एक भेटच आहे. सेवानिवृत्ती योजनेसाठी विविध गुंतवणूक उत्पादने आहेत. आयुर्विज्ञानात सतत नवीन शोध लागत असल्याने भारतीयांच्या सरासरी आयुर्मानांत वाढ होत आहे. ही वाढ होत असल्याने सेवानिवृत्तीदरम्यान तुमच्या मासिक खर्चासाठी पूर्वीपेक्षा अधिक निधीची गरज भासणार असल्याचे चाणाक्ष कोचरेकरांच्या लक्षात आले. कमावत्या वर्षांतच आपल्याला अधिक निधी संकलनाची आवश्यकता आहे. भविष्यासाठी योजलेल्या निधीत कालांतराने महागाईमुळे सतत वाढ होत असते. याव्यतिरिक्त, वयोवृद्ध आरोग्यविषयक आव्हानांना तोंड द्यावे लागते म्हणून वैद्यकीय खर्चदेखील वाढतो. आपले ‘रिटायरमेंट प्लॅनिंग’ ही मुलांना अप्रत्यक्षपणे दिलेली एक भेटच आहे.

shreeyachebaba@gmail.com

First Published on June 23, 2019 11:36 pm

Web Title: retirement plan